आजरा : – आजरा टोल प्रश्नावरून सुरू झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर डावे पक्ष, संघटना आणि जनचळवळीतील कार्यकर्त्यांनी आजरा येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करताना कार्यकर्त्यांनी टोलविरोधी आंदोलनाची सुरुवात आपल्या नेतृत्वाखाली झाल्याचा दावा केला.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितले की, टोलमुक्तीच्या प्रश्नावर गेली अनेक वर्षे सातत्याने आंदोलने, निवेदने आणि पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यामुळे टोल प्रश्नावरील भूमिका आणि योगदान याबाबत शंका उपस्थित करणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा राजकीय आणि वैचारिक वारसा डाव्या चळवळीशी संबंधित असल्याचे सांगत, त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून डाव्या संघटनांविषयी गैरसमज पसरवले जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मंत्री आबिटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना डाव्या चळवळीच्या इतिहासाची आणि कार्यपद्धतीची माहिती करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
टोल नाका स्थलांतरित झाला तरी संपूर्ण आजरा तालुका टोलमुक्त व्हावा, ही आमची भूमिका कायम असल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. तसेच कोणत्याही प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार सिद्ध झाल्यास सार्वजनिक जीवनातून बाजूला होण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेना शिंदे गटाने कोणतेही आधार नसलेले आरोप करू नयेत, अन्यथा त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशाराही पत्रकार परिषदेत देण्यात आला.
यावेळी कॉ. संपत देसाई, शांताराम पाटील, संजय तरडेकर, दशरथ घुरे, भीमराव माधव, प्रकाश कालेकर, युवराज जाधव, काशिनाथ मोरे, मारुती पाटील, बाळू जाधव, शंकर पाटील, व्ही. डी. जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या देण्यासाठी संपर्क – अमित गुरव 8421666667


मुख्यसंपादक



