Homeमुक्त- व्यासपीठतिलाही थोडसं स्वातंत्र्य हवे !

तिलाही थोडसं स्वातंत्र्य हवे !

कोरोनाने अवघ्या जगाची जीवनशैली बदलून गेली आहे. बाहेर फिरण्यापासून, गर्दीत जाण्यापासून सर्वच बाबीवर निर्बध आलेत. त्यामुळे सामाजिक वा सार्वजनिक जीवनातल्या हालचाली मंदावल्यात. छोट्या-मोठ्या उद्योग-धंद्यापासून ते शेतीवरही याचे विपरीत परिणाम झालेत. शाळा, महाविद्यालये ठप्प, अॉनलाईन झालीत. शहरापासून ते खेड्या पर्यंत या कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे एकूणच दैनंदिनीवर टाच आलीय.

या सर्व उलथापालथीत शहरातल्या आणि ग्रामीण भागातील मुलींना नेमकं काय फेस करावे लागते ?कोणत्या समस्यांमुळे त्या हतबल होताहेत ? यावर कोणीही बोलताना दिसत नाही. मुळात स्त्री ही व्यवस्थेच्या शेवटच्या स्तरातील घटक असल्याने, तिला हीन वा तुच्छ मानले गेल्यामुळे कदाचित तिच्याकडे दूर्लक्ष होत असावे यात शंका नाही. स्त्री ही माणूस आहे आणि तिच्याकडे माणूस म्हणून पहायला हवे हा विचार कोणाच्या मानाला स्पर्शतही नाही. कारण इथली बदफैली व्यवस्था !

आपल्याकडे स्त्रियांवर कौटुबिक हिंसाचार होणे हे म्हणेज अगदी सहज. हे तर होणारच, अश्याच पद्धतीने सारेकाही घडत असते. जणू स्रीचे शोषण करणे हा पुरुषांचा आद्यधर्म आहे असेच पुरुषसत्ताक व्यवस्था वागताना दिसते. केवळ ती एक स्त्री आहे म्हणून तिला दुय्यम वागणूक देणं, छोट्या छोट्या शुल्लक कारणावरून तिला टार्गेट करणं हे नित्याचेच. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून पाहिले तर पुरुषी विकृत मानसिकतेचा तिला नेहमीच सामना करावा लागलाय. या कोरोनाच्या कालखंडात तर मुलींची – स्त्रियांची घुसमट कमालीची वाढल्याचे आपल्याला पहायला मिळते. शहरी भागातील जी व्यथा मुलींची स्त्रियांची आहे तीच वेदना ग्रामीण मुलींची – स्त्रियांची आहे. मात्र इथे तीची तीव्रता अधिक असल्याचे जाणवते !

कोरोनाच्या या कालखंडात शहरी आणि ग्रामीण भागातील मूलींशी – स्त्रियांशी संवाद साधल्यानंतर आणि प्रत्यक्षात वस्तुस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर मुलींना – स्त्रियांना जगताना किती हरप्रकारे कसरत करावी लागते आहे यांचा अंदाज आल्यावाचून रहात नाही. शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या ऑनलाईन बदलाने ग्रामीण मुलींना अनेक गोष्टीना फेस करावे लागते. ग्रामीण भागात पहिला मुद्दा येतो तो नेटवर्कचा. नेटवर्क जर नसेल तर मुले इतर ठिकाणी जाऊन म्हणजे बाहेर ( जिथे नेटवर्क असेल तिथे) जावून लेक्चर अटेंड करु लागली. मुलींना मात्र हे स्वातंत्र्य होते काय ? ज्या मुलींना घराबाहेर जाऊन लेक्चर अटेंड करण्याचे स्वातंत्र्य होते त्यांच्याकडे पाहण्याचा ॲप्रोच कुटुंबाचा व सभोवतालच्या नजरांचा काय होता, हेही समजून घ्यायला हवे. समाजामध्ये प्रत्येक गोष्टीच्या जागा ठरलेल्या असतात. साधारणतः गावामध्ये सार्वजनिक ठिकाणावर पुरुषांचीच मक्तेदारी असते. मुले कितीही उशीर घराबाहेर आपला वेळ घालवू शकतात पण मुलीचे कार्यक्षेत्र हे घरापुरतेच मर्यादित असते, त्यातल्या त्यात शाळा किंवा कॉलेजच्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडण्याची एक चांगली संधी असते. पण कोरोना काळात शिक्षण ऑनलाईन असल्यामुळे तशी सोयच नाही. त्यामुळे मुलीना त्यांची अशी स्पेस उरली नाही. आता ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी त्यांना बाहेर जाणे आलेच. म्हणजे जिथे नेटवर्क असेल, जिथे मुले लेक्चर अटेंड करतात अशा ठिकाणी. अश्या ठिकाणी लेक्चर ऐकणे, खेड्यात हे चित्र कितीजणांना रुचणारा हा प्रश्न आहे. म्हणजे इथे मुलीला एका मोठ्या दिव्यातूनच जावे लागते.

ऑनलाईन शिक्षणामुळे नेटवर्कसाठी मुलगी गावातल्या एखाद्या ठिकाणी उभी राहून वा थांबून लेक्चर अटेंड करु लागली तर गावातील टवाळ फिरणारी मुले आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुष मंडळीच्या नको नको त्या नजरांना तिला सामोरे जावे लागते. मुळात ग्रामीण भागातील मानसिकता मोबाईलच्या बाबतीत अगदी वेगळी आहे. म्हणजे मोबाईल हि चैनीची वस्तू आहे आणि अश्या वस्तू जर मुली वापरत असतील तर सहज बोलेले जाते “मोबाईलवर काय टाइमपास, नको ते धंदे चालू आहेत आताच्या मुलींचे !” काही मुलींना तर घरापासून काही किलोमीटर दूर अंतरावर येऊन लेक्चर अटेंड करावे लागते. अश्या वेळी त्यांच्याकडे एक तर पायी चालत येणे किंवा मग गावातील कोणाच्या तरी गाडीवर येऊन आपला अॉनलाईन अभ्यास करणे, अशी कसरत करावी लागते.
पुढचे दिव्य असे आहे की, आजकाल कॉलेजमधील काही महत्वाच्या सूचना देण्यासाठी विद्यार्थ्याचे व्हाटसअप ग्रुप तयार केले जातात. सर्व सूचना ह्या व्हाटसअप ग्रुपवर येत असतात. ग्रामीण भागातील नेटवर्कचा प्रश्न फार भयंकर असल्यामुळे त्या सूचना व्हाटसअप ग्रुपवर येतात. आपण घरातच असल्यामुळे त्या सूचना किंवा ज्या काही चर्चा व्हाटसअप ग्रुपवर होतात. तो मेसेज पाहण्यासाठी त्या मुलीला आपल्या घरातील किंवा वाडीतील एखादी व्यक्ती नेटवर्क एरिया मध्ये रात्रीच्या वेळी जाणार असेल तर फक्त मेसेज येण्यासाठी त्यांच्याजवळ मोबाईल द्यावा लागतो. जेणेकरून आपल्याला त्या ग्रुपवर आलेले सगळे मेसेज मिळावेत आणि जी काही चर्चा व सूचना आल्या असतील त्या तिला कळाव्यात. आपल्या हातात सतत मोबाईल असतो आणि मोबाईलवर येणारे प्रत्येक मेसेज आपण तातडीने चेक करतो आणि लगेच एका सेकंदात जी काही बातमी असेल त्याबाबत आपल्याला माहिती मिळते. पण ग्रामीण भागातील मुलींना ही माहिती सहज भेटत नाही. त्यांना आपला मोबाईल इतरांना द्यावा लागतो. खरंतर, इथे हे लक्षात घ्यायला हवे, आपला मोबाईल एखाद्या व्यक्तीकडे सोपविणे हे पण काही योग्य नाही. यातून काही अनुचित प्रकार ही घडण्याची शक्यता जास्त आहे.

एका बाजूला अशी परिस्थिती तर दुसऱ्या बाजुला कोरोना काळात मुलींवर कौटुंबिक जबाबदाऱ्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यात हेही दूर्लक्षून चालणार नाही. वास्तविक, मुलगी कॉलेजला गेली तर इतके प्रश्न उभे राहत नाहीत. अभ्यास करायलाही वेळ घरातले देतात. कोरोना काळात मुलगी घरातच आहे तिला कॉलेजला बाहेर जायचे नाही त्यामुळे होतेय असे की, घरातल्यांना वाटते तिने घरातल्या आणि शेतातल्या सर्व कामात पुढाकार घ्यावा. आता घरातच आहे, मग काम केलेच पाहिजे, असा आग्रह धरला जातो. कोरोनाच्या काळात मुंबईत राहणारे जे गावातून नोकरीच्या निमित्ताने शहरात गेले होते. त्यांची या काळात नोकरी गेली आहे असे सदस्य गावी आले आहेत. कुटुंबातील सदस्यसंख्या त्यामुळे वाढली आहे. याचाही भार हा स्त्री आणि मुलीवरच पडत आहे. अश्या स्थितीत घरातली सर्व कामे करत राहिल्यामुळे शैक्षणिक नुकसानही होतंय. एक किस्सा इथे शेअर करायला मला आवडेल. त्यावरून बरंच आपल्या लक्षात येईल. काही मुली लग्न झाल्यानंतर ही आपले शिक्षण घेत असतात त्यांची तर परवड ऐकायलाच नको असे वाटते. माझ्या एका विवाहित विद्यार्थिनीने विचारले “मॅडम कधी जाईल हा कोरोना. जगणे मुश्कील झाले आहे.” मी म्हटले का काय झाले? “मॅडम मी नेटवर्कसाठी बाहेर अंगणात किंवा आमच्या विहिरीजवळ बसले तरी येणारे जाणारे विचित्र नजरेने बघतात. शिवाय दिवसभर आपले लेक्चर असतात घरातल्या सासू आणि जाऊबाई यांना वाटते मी काम करत नाही, मुद्दाम फोन घेऊन बसते. जेव्हा माझे कॉलेजमध्ये एखाद्या विषयावर प्रेझेंटेशन असते त्यावेळी मला शहरातल्या आमच्या नातेवाईकांकडे जाऊन तिथून प्रेझेंटेशन द्यावे लागते. कारण तेथे फुल नेटवर्क असते. त्यामुळे काही तांत्रिक अडचणी येत नाही. मात्र आमची एकत्र कुंटुंब पद्धती आहे. माझ्या शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन राहत होतो. आता कोरोनामुळे गावी आहे. त्यामुळे कामे ही करावीच लागतात. दररोजच्या कामात माझी काहीतरी मदत व्हावी म्हणून मी इकडे परीक्षा किंवा प्रेझेटेशन साठी शहरात आली तरी गावामध्ये असलेल्या घरच्या लोकांसाठी पोळ्या तरी बनवून द्याव्या असे जाऊबाईना वाटते. मग किमान मी इथून पोळ्या तरी करून गावाला द्याव्या अशी ते अपेक्षा ठेवतातच. जगणे मुश्कील झाले आहे. पण सगळ्यात जास्त वाईट काय वाटते, माझी खरंच परीक्षा किंवा प्रेझेंटेशन आहे का नाही हे पाहण्यासाठी जाऊबाई आपल्या मुलीला मला व्हीडीओकॉल करायला लावते !

ग्रामीण भागात आजही मासिक पाळीबद्दल खूप चुकीच्या समजुती आहेतच तो वेगळाच मुद्दा आहे. परंतु आता कोरोना काळात आलेली सर्वात मोठी अडचण म्हणजे सॅनेटरी पॅडची अनुपलब्धता होय. सहसा सॅनेटरी पॅडची खेडोपाड्यातील छोट्या छोट्या दुकानात (किराणा स्टोअर्स) उपलब्धता नसते. कारण याबाबत तेवढी जागरुकता नाही. ती वस्तू मुलीच्या गरजेची आहे आणि ग्रामीण भागात त्यांची उघड विक्री झाली पाहिजे अशी मानसिकता अजून ग्रामीण समाजात नाही. बऱ्याचदा मुली शहरातल्या ठिकाणच्या एखाद्या मेडीकलमधून हे सॅनेटरी पॅड विकत घेतात पण आता कोरोना काळात लॉकडाऊनमुळे मुलीचे घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. याकाळात शाळा कॉलेज बंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता न आल्यामुळे सॅनेटरी पॅडची कमतरता भासत आहे. ग्रामीण भागात जर मासिक पाळीविषयीचे चुकीच्या समजुती नसत्या तर त्यांना ते सहज उपलब्ध झाले असते. त्यामुळे मुलीच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे. गावातील महिला आणि मुली आपल्या आरोग्याकडे तितक्या लक्ष देत नाही. बरीच दुखणी अंगावर काढतात. पुढे त्याचे रूपांतर गंभीर स्वरुपात होऊन जाते. या सर्व प्रकाराकडे समाजाने अंतर्मूख होऊन पहायला हवे आणि मुलीला – स्रीलाही तिच्या वेदना मुक्तपणे – उघडपणे बोलण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे. असे झाले तरच स्त्री मुक्तीची वाट अधिक सूकर होण्यास मदत होईल !

  • प्रा. पूनम गायकवाड
    स्त्री चळवळीच्या अभ्यासिका
    मुंबई विद्यापीठ.
    B.A., M.A., M.S.W., M.PHIL., NET., PH.D ( SCHOLAR )
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular