Homeवैशिष्ट्येतीळगुळाची कथा

तीळगुळाची कथा

तीळ घ्या गूळ घ्या आणि गोड गोड बोला!हे शब्द ऐकले की मला अनेक वर्षांपूर्वी घडलेली एक घटना आठवते.ही घटना पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी घडलेली आहे.त्यावेळी एखादा सणासुदीचा पदार्थ नव्याने शिकायचा म्हणजे मोठ्ठी गोष्ट होती.
घरात कोणी मोठी स्त्री(सासू) असेल तर तिच्या हाताखाली उमेदवारी करावी लागायची. सुरुवातीची काही वर्षे फक्त कच्ची तयारी करण्यात घालवावी लागायची. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर देखील म्हणजे अगदी सुनेला सुन आली तरीही तो पदार्थ सुनेला एकटीच्या मर्जीने व स्वबळावर करायला मिळायचाच असे नाही.अशाप्रकारचे वातावरण जवळपास सगळ्याच घरात असल्याने फारसे काही वाटायचे नाही. काही ठिकाणी असे घरात कोणी मोठे नसायचे मग शेजारच्या पोक्त कर्त्या बाईला विचारून किंवा एखाद्या सुगरण वहिनीला वगैरे विचारून पदार्थ शिकले जायचे. अन्नपूर्णा,रुचिरा सारखी काही पुस्तके बाजारात आली होती. पण त्यात पाहून एकटीच्या जीवावर पदार्थ करून बघणे फारसे व्हायचे नाही.एकतर महागामोलाचा पदार्थ वाया जायची शक्यता आणि चारचौघीत हसे व्हायची शक्यता. बरं चाळीत कोणतीही गोष्ट गुपचूपपणे करणे जवळपास अशक्य!बाजारातून विकतचे पदार्थ आणायचे म्हणले तर असे तयार पदार्थ मिळायचेच नाहीत आणि मिळत असतील तरी असे पदार्थ विकत आणले तर त्या बाईच्या माहेरच्या सात पिढ्यांचा उद्धार केला जाण्याची खात्रीच होती.
हे इतके सविस्तर सांगण्याचे कारण म्हणजे,आजच्या पिढीसाठी ही वस्तुस्थिती म्हणजे सुरस आणि चमत्कारिक कथा वाटण्याची दाट शक्यता आहे.
आमच्या शेजारच्या दादाचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते.दादाचे आईबाबा काही कामानिमित्त गावी गेले होते.नेमकी संक्रांत जवळ आली होती. संक्रांत म्हटली की तिळगुळ बनवणे आलेच.गावी जाताना काकूंनी वहिनीला तिळगुळ कसा बनवायचा ते अगदी नीट समजावून सांगितले.”जमतील ना तुला की ताईला सांगू?”असे वहिनीला विचारले देखील होते.पण वहिनीने तसे माहेरी आणि मागच्या वर्षी सासरी तिळाचे लाडू बनवताना पाहिले होते.थोडे लाडू वळले पण होते.पण एकटीच्या जीवावर लाडू काही बनवले नव्हते. तरीही ताईमावशींना लाडू करायला सांगितले तर आपल्याला आणि आपल्या सासूला भरपूर टोमणे ऐकावे लागतील याची वहिनीला खात्रीच होती.त्यात ताई मावशींच्या नणंदेच्या पुतणीचे स्थळ नाकारून दादाने वहिनींशी लग्न केल्याने वहिनीचा पाणउतारा करायची एकही संधी ताई मावशी सोडायची नाही.हे वहिनी मनोमन जाणून होती. शेजारीपाजारी विचारावे किंवा‌ कोणाला मदतीला‌ बोलवावे तर वहिनीचा अभिमान आड येत होता.आपण ग्रॅज्युएट असल्याचा तिला भारी गर्व होता. त्यामुळे ती शेजारीपाजारी फारशी मिसळायची नाही.
तर… सांगायची गोष्ट अशी की वहिनीने एका रात्री सगळीकडे निजानीज झाल्यावर लाडू बनवायला घेतले. तशी तयारी छानच जमली होती. तीळ, शेंगदाणे आणि खोबरे भाजून ,कुटून सुके सारण तयार झाले होते आणि गुळही बारीक चिरुन तयार ठेवला होता.
दादा रात्री घरी आल्यावर ,”आज आपण तिळगुळ बनवायचा का गडे?तुम्ही कराल‌ नं मला मदत?”असे वहिनीने लाडात येऊन विचारल्यावर दादाची पण काय बिशाद होती वहिनीला नाही म्हणायची!
जेवणे झाली आणि बाकीची आवराआवरी झाल्यावर वहिनीने गुळाचा पाक करायला घेतला.गुळाचा पाक एकदम गोळीबंद झाला पाहिजे हे तिला काकूंनी सांगितले होते पण गोळीबंद म्हणजे नक्की काय हे काही वहिनीला नीटसे माहिती नव्हते.इथे दादा तिच्या मदतीला धावून आला. त्याने आईला वाटीत पाणी घेऊन गुळाचा पाक घालून पाक झाला का हे पाहिल्याचे आठवत होते.त्याने सांगितल्यावर वहिनीला पण आपली आई असेच करायची याची आठवण झाली.तिने दोनतीनदा पाक तपासून पाहिला पण पाक काही हवा तसा कडक वाटेना.शेवटी तिने आणखी काही मिनिटे झाल्यावर आता पाक झाला असेल असे मनोमन ठरवले आणि तिळाचे सारण पाकात घातले वरुन वेलदोड्याची पूड घालून मिश्रण हलवायला घेतले.मिश्रण तर बरे दिसत होते आणि सुवासही छानच येत होता.
वहिनीने हाताला तूप लावून गोळा करायला घेतला. पहिले पंधरा‌ वीस लाडू हात भाजत भाजत तिने आणि दादाने सावकाश मन लावून अगदी छान गोलाकार वळले.
“बघा मी म्हटले होते की‌‌ नाही ,मला तिळगुळ जमेल म्हणून .जमला की नाही .”वहिनी म्हणाली आणि तिने उरलेले सारण टोपाबाहेर काढायला घेतले!आणि….
हाय रे दैवा! सारण टोपाला घट्ट चिकटले होते आणि कालथ्याला पण सारणाने आपल्यात सामावून घेतले होते. जणू सारण ,टोप आणि कालथा यांची युतीच झालेली होती.वहिनीने जरा जोर लावून पाहिला. तिच्याच्याने जमेना मग ,”दे इकडे ,मी बघतो म्हणेन दादाने टोप अगदी दोन्ही पायात घट्ट पकडून कालथा खेचायचा प्रयत्न केला.पण फेविकॉलच्या मजबूत जोडाप्रमाणे कालथा ,सारण आणि टोप एकमेकांपासून दूर जायला काही तयार नव्हते. दादाने अगदी दात ओठ खाऊन प्रयत्न केले .शेवटी कंटाळून त्याने खलबत्त्यातील छोटा बत्ता त्या कालथ्यावर हळूहळू ठोकायला सुरुवात केली.रात्रीच्या शांततेत हा आवाज मोठाच वाटला.
इथे शेजारी आम्हाला वाटले की चोर आलाय आणि तो दरवाजाच्या कडीवर हत्याराने घाव घालतो आहे.
बाबांनी काठी घेतली, आईने धुणं धुवायचे धोपाटणे आणि आमच्या अण्णाने त्याची क्रिकेटची बॅट हातात घेतली. सगळा जामानिमा करुन बाबांनी आमच्या घराची कडी उघडली. बाहेर कॉमन गॅलरी होती. तिथे तर कोणीच नव्हते. पण घाव घातल्याचा आवाज तर येतच होता.
आमच्या पलिकडले शेजारी पण आवाज ऐकून बाहेर आले. तेही आमच्या सारखीच शस्त्रे पाजळत होते. नीट कान देऊन ऐकल्यावर लक्षात आले की दादा वहिनीच्या घरातून आवाज येतोय. बहुतेक चोर त्यांच्या घरात शिरले असतील.त्यांनी या दोघांना बांधून घातलं असेल आणि कपाटातील कडी तोडत असतील असा विचारविनिमय अगदी कुजबुजत्या आवाजात करून बाबा आणि पलिकडले काका यांनी दोघांनी दादाचा दरवाजा ठोठावला. दादाने दरवाजा उघडला .आतले दृश्य एकदम प्रेक्षणीय होते.
भर‌ थंडीत घाम फुटलेला दादा, रडवेली वहिनी , तो सारणाचा टोप,ताटातले सुबकरित्या वळलेले तिळगुळाचे लाडू व बत्ता बघून काय झाले असावे याचा अंदाज आई व काकूंना आलाच.त्या दोघींनी एवढ्या रात्री त्या संपूर्ण प्रकरणाचा ताबा घेतला.पुन्हा गॅस पेटविला. मिश्रणाचा टोप गॅसवर चढवला. इतका वेळ कशालाही दाद न देणारा कालथा मोकळा झाला आणि मिश्रण ही थोडे मऊसर झाले. आई,काकू, आम्ही सगळे आणि अर्थातच दादा वहिनींनी मिळून पाच मिनिटांत लाडू वळले. वहिनींनी कितीतरी वेळा आईचे आणि काकूंचे आभार मानले.
आई काकूंनी देखील ‘नवीननवीन असे चालायचेच. पुढच्या वर्षी बघ कशी एक्स्पर्ट होशील असे म्हणून सावरून घेतले.”
आपापल्या काठ्या,बॅटी, आणि इतर हत्यारे घेऊन सगळे घरी परतले.
रात्री सगळी नीजानीज झाली.

सकाळी सकाळी दादा ,”काकू, तुमच्याकडे अडकित्ता आहे का हो?”असे विचारत आला. “काय रे ,सकाळी सकाळी कोण सुपारी खायला आलंय?”असे आईने म्हणताच दादा हळू आवाजात म्हणाला,” नाही हो वासंतीचा कालचा तिळगुळ फोडायला हवाय.अहो लाडू एवढा कडक झालाय की बंदूकीत गोळीऐवजी वापरता येईल!काल खरोखरचेच चोर आले असते तर प्रात्यक्षिक करून बघता आले असते!”

यानंतर कित्येक वर्षी संक्रांत आली की या घटनेची आठवण निघायचीच.एव्हाना वहिनी खरेतर सगळेच पदार्थ उत्तम करायला शिकली होती तरीही दरवर्षी ,”तिळगुळ बरा झालाय ना?की अडकित्ता हवाय लाडू फोडायला?”
अशी विचारणा आमच्या घरातून हमखास व्हायचीच!

तिळगुळ घ्या आणि गोड बोला!!

डॉ.समिधा ययाती गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular