Homeमुक्त- व्यासपीठतुमच्या नावाचे पत्र हरवले …….

तुमच्या नावाचे पत्र हरवले …….

प्रिय वाचक,….
प्रथम सर्वाना नमस्कार बऱ्याच दिवसानंतर वेगळा विषय घेऊन आलीय, आज तुम्हा सर्व वाचकांना पत्र लिहिण्याची इच्छा होती, म्हणून लागलीच शब्द रेखाटायला सुरुवात केली.

बरं
“पत्र” म्हणजे काय आठवत का ?  कधी लिहिले आहे का कुणाला ? मला तर वाटत सध्या पत्र हा शब्द देखील बऱ्याच मुलांना माहित हि नसावा केवळ शालेय पुस्तकात पत्राचा आराखडा शिकता आला असावा .

आम्हालाही शाळेत असाच आराखडा शिकवला गेला होता , अजूनही आठवत माझ्या भादवन गावात आमच्या गुरुजींनी पत्र म्हणजे काय आणि त्याच महत्व सांगितलं होत तेंव्हा त्याच दिवशी आम्ही पोस्टातून पिवळ्या रंगाचं एक छोटस पत्राचा नमुना  आणि निळ्या रंगाचं अंतर्दर्शीय विकत घेऊन आपल्या च वर्ग मित्रांना , मैत्रीणीना मनात जे प्रेमाचे ४ शब्द असतील ते रेखाटून पोस्ट केलं होत आजही चांगलंच आठवत आमच्या पोस्ट मास्टर काकांना दुसऱ्या दिवशी मात्र खूप काम लागलं होत. आम्हा सर्वांच्या घरोघरी जाण्याचं.

माहित आहे का एकाच गावात मित्र मैत्रिणी जवळ राहत असूनही जेंव्हा एखाद पत्र आपल्याला येत आणि त्याच्यावर आपलं ओबड धोबड कोणत्याही अक्षरात का असेना निळ्या शाहिने नाव कोरलेलं असतं. ते पाहून गगनात आनंद मावत नव्हता. पत्र ओपन केल्यावर प्रिय हा मायना वाचल्यानंतर चेहऱ्यावर जे तेज येत मला वाटत ते आता व्हाट्स ॲप चे गुड मॉर्निग आणि गुड नाईट च्या मॅसेज ने येत नाही .

माझे वडील आर्मी त होते त्यावेळी मी आणि माझी आई ही बरेच पत्र पाठवत असे. निळ्या अंतर्दर्शीय पत्रात जागा कमी पडायची आपल्या भावना रेखाटण्यास , ‘पपा आज असे झाले आज तसे झाले , आमच्या शाळेत हे झाले , तसे घडले , इकडे सहल गेली होती , तुमची आठवण येते तुम्ही कधी येणार वगैरे वगैरे …

खूप सुंदर दिवस होते ते , त्या काळात सोशल मीडिया नव्हती कि अँड्रॉईड मोबाइल नव्हता कि त्यांचा चेहरा विडिओ कॉल वर पाहता यावा . पण त्या पत्रात  नमूद असलेल्या शब्दात त्यांचा चेहरा दिसून जायचा अलगद पाण्याचा थेम्ब डोळ्यातून निघून गालावरून तरळून जायचा. त्या आठवणी होत्या . आपल्या माणसाची आठवण येत असायची. ते पत्र फक्त एकदाच वाचल म्हणजे झालं नसायचं . कधीतरी संध्याकाळी कातरवेळी त्या पत्रांची उजळणी व्हायची . नीट सांभाळून ठेवली जायची.

आजच्या सोशल मिडिआ च्या जगात वावरणं अयोग्य आहे असे मी  म्हणणार नाही कारण काळ बदलेल तसे आपल्याला हि बदलावं लागेल पण बदलत्या वेळेत हि हे नाही विसरलं पाहिजे कि आपण काहीतरी  गमावत चाललो आहोत. आपल्या जवळच्या व्यक्ती सुद्धा आपल्याला दिसत नाहीत इतके आपण हरवत चाललो आहोत . आयुष्य बॅलन्स करायला शिका.  

समोर बायको आहे , आई- बाबा , बहिण भाऊ , नातेवाईक , मुल आहेत त्यांना वेळ द्या . नात्यांना वेळेची खूप गरज आहे . तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. सोशल चाटटींग मध्ये इतके गुंतलेलो असतो कि बाजूला कोणी आहे जे आपल्या संवादासाठी वाट पाहत आहे हे हि लक्षात येत नाही . गरज आहे तुमच्या प्रेमाने बोलण्याची , संवाद साधण्याची . दूर राहूनही त्या काळात प्रेमाला खूप महत्व होत शब्दांना महत्व होत ते हरवत चालले आहे . थांबवा आपल्या नात्यांना दूर जाण्यापासून ,..

वेळ काढून लिहा एखाद पत्र मग ते एकाच घरात च राहत का असेनात  आपल्या आई – बाबाना  बायको ला , प्रियकराला , प्रियसी  ला मित्र – मैत्रिणीला , आपल्या  प्रेमळ शब्दाचा ओलावा कागदावर उतरावा  आणि पहा त्यांच्या चेहऱ्यावरचा अगणित आनंद… .. त्यांच्या मनाला भावुक करेल .

मी तर अनुभवते हा आनंद. पत्र हा प्रेमळ शब्दाची ती रचना आहे जी आयुष्यात आठवणींना उजाळा देते, प्रेम देते, प्रेम व्यक्त करत असते, आपल्या आवडत्या व्यक्तीना पाठवून.

म्हंटल तुम्हाला हि सांगावं , म्हणतात आपल्या शरीराचे अवयव दान म्हणजे  सर्वश्रेष्ठ दान आहे . याचप्रमाणे दुसऱ्याच्या चेहर्यावर आनंद देणं, आनंद पाहणं हि देखील सर्वात सुंदर गोष्ट आहे .

आठवत का  आपण  शाळेत खेळत होतो ना मामाच पत्र हरवलं मला नाही सापडलं …. खरच हरवलं आहे पत्र कारण आपण विसरलो आहोत त्याचा मायना . त्याच महत्व…..

तुम्ही विसरला आहेत  पत्र लिहायचं म्हणून समोरचे हि व्यक्ती विसरले तुम्हाला पत्र लिहिण्यास . हा बंध प्रेमाचा आहे , भावनांचा आहे , नात्यांचा आहे . त्यात समाविष्ट असलेल्या तुमच्या आनंदाचा आहे , नका हरवू देऊ अशी पत्र जी तुम्हाला एकांतात जाण्याचा मार्ग निर्माण करतील. गरज आहे संवादाची , मग त्यात कोणतीही भाषा असावी . ज्यात प्रेम असतं त्याला कोणतीही भाषा समजते. बॉर्डर वर जवान लढत असतात आपल्या व्यक्तीचे पत्र पाहून त्यांना किती आनंद होतो शब्दातही मांडता येत नाही . दूर राहूनच असं प्रेम द्यावं असं च तर नाही ना जवळ राहून ही आपण प्रेम देऊ शकतो.

नाहीतर एक एक दिवस सोशल मिडिआ करत करत एकटेच राहाल जवळचे दूर होतील  आणि स्वतःला च स्वतःसाठी एखाद पत्र लिहावं लागेल आणि त्यात लिहिलं असेल

प्रिय मी,

आज हा दिवस माझ्यामुळेच आला आहे योग्यवेळेची जाण ठेऊन आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत हरवत चाललेला संवाद  याची कल्पना असूनही मी असा वागलो . आज ते हि माझ्या पासून दूर झाले , त्यांना माझी गरज होती माझ्या प्रेमाची गरज होती तेंव्हा मी लक्ष नाही दिले . आज मी एकटा आहे. आणि हळूहळू डिप्रेशन मध्ये जात आहे.

कळावे

माझा मीच …. ,…

या पत्रापेक्षा आपल्या आवडत्या व्यक्तींना पत्र लिहणं अधिक सुंदर आहे ना . मग विचार नका करू. घ्या कोरा कागद आणि उमटवा आपल्या भावना.

गावोगावी , शहरात असणारे टपाल आता एकटेच पडले आहेत. उगाच एका ठिकाणी उभ राहून ते ही कंटाळले असतील. म्हणत असतील इतकी लोकसंख्या आहे पण दिवसे दिवस मी एकटा पडत आहे हे का बर दिसत नसाव. टपाल कडे पाहून एक शायरी म्हणावी वाटते……

आज वो खुद बेखबर है…
जो कभी दुसरो की खबर देते थें……
आज वो खुद बेखबर है…
जो कभी दुसरो की खबर देते थें……
कागज मे समाके लफजो को,…
किसी के मुस्कान के हकदार होते थें……


समजल का म्हणूनच सांगते ,,…..
गरजेचं नाही एका लेखिके पत्र ने लिहलय अस लिहावं. आपल्याला कुठे पत्राच्या स्पर्धा नाही ठेवायच्या आहेत. आपल्याला आपल्या व्यक्तींच्या जवळ राहायचं आहे, त्यांच्यावरच असणार प्रेम व्यक्त करायचं आहे त्यासाठी शब्द कसेही असो हृदयापर्यंत पोहोचले की विषय संपला नाही का…..

शब्द तर मुक व्यक्तींना ही नाही बोलता येत पण त्यांच्या भावना अगदी हृदयापर्यंत पोहोचतात. कारण प्रेमाची कोणती भाषा असत नाही. प्रेमाने जे पण बोलू तीच त्याची भाषा.

कुणाला रोजच्या दैनंदिन जीवनात वेळ नाही असे वाटत असेल तर काहीवेळ मोबाइल चा वायफळ वापर टाळून तुम्ही पत्र लिहू शकताच . …नाही का….
पत्र लिहून बघा, माझे सांगणे कृतीत करून पहा….

एक दिवस तुमच्या नावाचे पत्र तुम्हाला नक्की सापडेल … …

धन्यवाद …. !

सौ. रुपाली स्वप्नील  शिंदे

(भादवन , आजरा )

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular