Homeमुक्त- व्यासपीठथांबा !! गड किल्ल्यांवर पार्टी कराल तर याद राखा !!

थांबा !! गड किल्ल्यांवर पार्टी कराल तर याद राखा !!

मजा करायला काही कारण लागत नाही. मजा करणाऱ्या लोकांचे, पार्टी करणाऱ्यांचे दिवस पुढच्या दोन तीन दिवसांत येणार आहेत. तर या पार्टी करणाऱ्या कार्ट्यांना एक सूचना द्यावीशी वाटत आहे.
पार्टी म्हणजे जीवाची मजा नव्हे आणि हीच पार्टी जर तुम्ही तुमच्या जीवाची मजा म्हणून करणार असाल तर ती मजा करणाऱ्यांनी आपल्या घरात करावी, दारात करावी आमची काहीही आणि कसलीही हरकत नाही. शिवाय या पार्ट्या तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणावर करू शकता; त्याचा उपभोग अवश्य घेऊ शकता. हे करत असताना आमचे काहीही जात नाही, तुमची मजा, तुमचा पैसा, तुमचा जल्लोष, तुमची हौस, मौजही तुमचीच. या सर्व आनंदाच्या, तुमच्या हक्काच्या कार्यक्रमात तुम्ही घातलेल्या धिंगाण्यावर आणि पुढच्या काही दिवसांत घालणार आहात त्याही धिंगाण्यावर आमचा काहीही आक्षेप नाही. पण….
पण… जर हाच धिंगाणा आणि नागडा नाच कोणत्याही गडकिल्ल्यावर घालणार असाल तर हा लेख संपूर्ण वाचा आणि नंतरच अशी कृती करायला धजा.

तर… छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांनी जे गडकिल्ले घडविले, शत्रूच्या दाढेतून पुन्हा स्वराज्यात आणण्याचा जो पराक्रम केला आहे तो पराक्रम आम्ही वाचलेला आहे. फक्त वाचून गप्प नाही बसलो आहोत तर, आम्ही या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी आमच्या आयुष्यातील अमूल्य वेळ खर्ची घालत आहोत. हे दुर्ग ज्या स्थितीत आहेत त्याच स्थितीत कायम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहोत. याच किल्ल्यांनी महाराजांना, वेळोवेळी कुरघोडी करणाऱ्या आणि आपल्या स्वराज्याला नष्ट करू पाहणाऱ्या यवनांपासून सावधानतेने लढाई करून त्यांचा कोथळा काढण्यास खूप मदत केली आहे.
शहाजीराजे आणि आऊसाहेबांच्या स्वप्नातल्या स्वराज्याला घडवणे सोपी गोष्ट नव्हती. आई भवानीच्या चरणाला स्पर्श करून तिचे आशीर्वाद घेऊन आणि शिव-शंकराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून, शत्रूशी निकराची झुंज देऊन मिळविलेले हे स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या तलवारीच्या धारेवर दुश्मनांना खेळवून, लोळवून हे स्वराज्य मिळविले होते. गड किल्ले असणारी ही जागा मौज मजा करण्यासाठी नक्कीच नाही. या किल्ल्यांकडे पाहिले की, एक अभिमानाची भावना मनात निर्माण होते. शौर्याची धगधगती मशाल वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर लहरत आहे असा भास होतो. कर्तव्याची जाणीव होते. स्वराज्यावर प्रेम असणे म्हणजे काय हे कळते. महाराजांवर विश्वास ठेवून स्वतःचे जीवन समर्पित करणारे मावळे त्या तटबंदीकडे पाहिले की, रांगेत उभे असलेले दिसतात. आपला जीव जाणार आहे हे माहीत असूनही आपल्या राजासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या मावळ्यांच्या डोळ्यांत असणारा विश्वास दिसतो. आपल्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली त्यांच्या पाठीमागे त्यांच्या कुटुंबाला सांभाळणारे कृतघ्न हात आणि पहाडासारखा देह डोळ्यासमोर उभा राहतो. जीव गेला तरी चालेल, अंगाची लाही लाही झाली तरी चालेल पण धर्म न सोडणारा योद्धा रणांगणात तलवारीच्या पातीसारखा लखलखणारा देह उभा ठाकतो. स्वतःचे प्राण जाईपर्यंत वचनबद्ध होऊन दोन हातात तलवार घेऊन दुष्मनांशी दोन हात करणाऱ्या मावळ्याचे दोन हात आजही त्या दरीत, घोडखिंडीत दिसतात तेव्हा वचन म्हणजे काय याची प्रचिती येते.

गड-किल्ले आमचे अभिमान आणि या उभ्या महाराष्ट्राची शान आहेत. गड-किल्ले हे पावित्र्याची ठिकाणे आहेत. या ठिकाणी कोणी येऊन किल्ल्यांची नासधूस केली, किल्ल्यांवर बाटल्या घेऊन येणे आणि आणि धिंगाणा घालणे असे प्रकार घडत असतील तर शिवप्रेमी गप्प बसणार नाहीत. आत्तापर्यंत अशा प्रकारचे प्रताप करणाऱ्या भामट्यांनी अनेक वेळा रुचकर, चविष्ट असा प्रसाद अनेकांनी तो आवडीने आणि आनंदाने त्याचा स्वीकार करत चघळला आहे. अशा पवित्र ठिकाणी असे वर्तन करणारे महाभाग हे आपल्याच मातीत कसे काय जन्माला येतात याचीच कीव येते. अरे ज्यांच्यामुळे आपण आपले थोबाड वर करून आज ‘ जय महाराष्ट्र ‘ म्हणतो, तो महाराष्ट्र जगात गाजतोय ते फक्त आणि फक्त ” छत्रपती शिवाजी महाराज ” यांच्या नावामुळेच. मग असे असताना आणि आपला मेंदू जाग्यावर असूनही, शाबूत असताना अशा प्रकारच्या औलादी गड किल्ल्यांवर अशी थेरं करण्यास धजावतातच कशी ?
का ?
यांच्या मेंदूला मुंग्या लागल्या आहेत ?
डोळे तळहातावर काढून गडाची पायरी चढली जाते ?
या नालायक औलादिंना आपले पाय आपल्याला कुठे घेऊन जातायत आपण कुठे आलोय याचे भान नसते का ?
का ? यांना इतिहास माहीत नसतो ?
असतो, चांगला माहीत असतो. पण आपल्याला कोण बघणार आहे ? कोणी हटकणार नाही. कोण विचारणार नाही. म्हणूनच मिजास चढलेल्या आविर्भावात तो टोळीने गडावर जाऊन धिंगाणा घालण्यास तयार असतो.
परंतु आता बस्स !!
आता हा धिंगाणा शिवप्रेमी घालायला देणार नाहीतच; पण जो असे कृत्य करताना दिसेल कोणत्याही गडावर आढळेल त्याला ज्या पद्धतीने आवडेल जसा हवा तसा तेलात भाजून, तुपात तळून त्याच्या आवडीनुसार प्रसाद मिळेल. आठ दिवस ना उठता येणार ना बसता येणार आणि येताना पायावर चालत आलेले हे भामटे त्यांच्याच मित्रांच्या खांद्यावरून विव्हळत जातील अशी अवस्था केली जाईल. अरे, का करू नये ?
या गोष्टींसाठी महाराजांनी किल्ले बांधून ठेवले आहेत का ? नाही ना. मग अशा प्रकारच्या हरकती करायला आपली हिम्मत होतेच कशी ?
हा प्रश्न प्रत्येकाने एकदा स्वतःला नक्कीच विचारायला हवा.
आपल्या बापाने जी संपत्ती पैशाच्या जोरावर मिळविलेली आहे त्या संपत्तीवर त्या जागेवर जाऊन हा नंगा नाच प्रत्येकाने अगदी खुशाल करावा. तिकडे नाचा, लोळा, पडा तिथे कोणीही म्हणजे तुमचा स्वतःचा बापही विचारायला येणार नाही.
पण, हाच नंगा नाच गड किल्ल्यांवर कराल तर याद राखा !!

अरे, तरुणांनो लाजा बाळगा रे लाजा !!
मनाची नाही तर, जनाची तरी थोडी शिल्लक ठेवा !!
आपल्या आई वडिलांचे नाव, स्वतःचे नाव जगात अभिमानाने कसे घेतले जाईल, आपले भविष्य उज्ज्वल कसे होईल, याकडे लक्ष द्यायचे सोडून नको त्या गोष्टींत अडकून पडू नका. शिक्षण घेत असणाऱ्या मुलांनी अभ्यासाकडे लक्ष द्या. शिक्षण पूर्ण करून पदव्या मिळवलेल्या मुलांनो नोकरी नाहीतर व्यवसायाकडे वाटचाल करून आपण आपल्या कुटुंबाला हातभार लावून स्वतःच्या भविष्याची तरतूद करण्याकडे लक्ष केंद्रित करा. पैसा ही गोष्ट सर्वस्व नसली तरी उदरनिर्वाह करण्यासाठी त्याची कधी ना कधी गरज भासतेच. जीवनात असे काही करा की लोकांनी आपल्याकडे अभिमानाने पाहिले पाहिजे. फक्त जन्माला आलो आणि पुन्हा याच मातीत मिसळले गेलो असे होऊ देऊ नका. वाईट संगत सोडून चांगल्या मित्रांशी संगत जोडा. स्वतःमध्ये आत्मविश्वास जागृत करून नवीन ध्येयाकडे वळायला शिका. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत करा, कष्ट करा आणि आपले आयुष्य एक माणूस आहोत म्हणून माणसांप्रमाणे जगा. जनवरांसारखे आणि आपल्याच लोकांनी आपल्याला नावे ठेवावीत असे वागून स्वतःचा अपमान करून घेऊ नका.

आज महाराजांनी घडवलेल्या आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गड कोटांची अवस्था पाहण्यासारखी सुध्दा नाही आहे. मोठ्या प्रमाणात गरज आहे ती तुमच्या आमच्या सारख्या तरुणांची, दुर्गसेवकांची, दुर्ग सेविकांची. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात अनेक शिवप्रेमी संस्था आहेत. त्यात सामील व्हा. शिवकार्य करण्यासाठी. दुर्ग संवर्धन करण्यासाठी. शिवकाळात आपण महाराजांसोबत लढायला नव्हतो पण आता आपण आहोत. आपले हात पाय शाबूत आहेत, मजबूत आहेत. अंगात सळसळते रक्त आहे. मेहनत करण्याची धमक आहे. म्हणूनच आपणही हे गड संवर्धनाचे शिवकार्य करण्यासाठी पुढे या. यातून एक आत्मिक आनंद मिळतो. हुरूप येतो गडावर काम करताना. तिथल्या प्रत्येक वास्तूंना हाताचा स्पर्श होतो तेव्हा आपणही शिवकाळात आहोत की काय असाच भास होतो.
काही गड भग्नावस्थेत तसेच पडून आहेत. सरकार लक्ष द्यायला तयार नाही. काही किल्ल्यांची अवस्था ढासळलेली आहे. कधी कधी तटबंदी ढासळते, एखादा चिरा निखळून पडतो तेव्हा वाटते आपण स्वतः तिथे जाऊन खांदा लावून तटबंदीला रोखून धरायला पाहिजे.
आता खरी गरज आहे ती या गड किल्ल्यांना नव चैतन्य देण्याची. जर आपल्याला त्यांना पहिल्यासारखे घडवता नाही आले तरी ज्या स्थितीत आहेत जसे आहेत तसे तरी राखण्याचे कार्य आपण सर्वजण मिळून हे शिवकार्य म्हणून केलेच पाहिजे. तरच आपल्या पुढच्या पिढीला आपण या गड कोटांची माहिती सांगू शकू. या गड किल्ल्यांना आपण सही सलामत ठेवू शकलो तरच आपण महाराजांच्या चरणाजवळ त्यांच्या पायावर नतमस्तक होऊ शकु. तेव्हाच महाराजांच्या प्रतीमेसमोर ताठ मानेने हात जोडून उभे राहण्यास धन्यता वाटेल.

माझ्या तमाम मित्रांना एकच विनंती आहे; गड किल्ल्यांचा नका हो अपमान करू. जिथे महाराजांचे चरणस्पर्श झालेले आहेत, जिथे संपूर्ण स्वराज्याने भाकर तुकडा खाल्ला तिथे जाऊन वाईट कृत्य नका करू. या गड किल्ल्यांसाठी महाराजांसहित अनेक जणांनी आपले प्राण त्यागले आहेत. आपले आयुष्य फक्त स्वराज्यासाठी ज्यांनी वाहिले आहे त्यांचा असा अपमान नका करू.
आपल्या सर्वांना या एका दुर्ग सेवकाची मनापासून हात जोडून विनंती आहे.🙏🚩

🚩जय शहाजीराजे,
🚩जय जिजाऊ,
🚩जय शिवराय,
🚩जय शंभुराजे

✍️विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
🚩सह्याद्रीचा दुर्गसेवक – १७१८४
( वसई, विरार विभाग )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular