Homeमुक्त- व्यासपीठदेव धर्माच्या अनौपचारिकतेत निसर्ग विज्ञानाची औपचारिकता नको!

देव धर्माच्या अनौपचारिकतेत निसर्ग विज्ञानाची औपचारिकता नको!

(१) निसर्गाच्या म्हणजेच विश्वाच्या नैसर्गिक सत्याला औपचारिक गणिती चौकटीत बसविले की त्याचे विज्ञान बनते जे नेहमी ताठर भूमिकेत असते. याच नैसर्गिक सत्याला अनौपचारिक आध्यात्मिक संस्कारात बसविले की त्याचा धर्म बनतो. निसर्ग व विज्ञान या औपचारिक ताठर जोडीला देव व धर्म या अनौपचारिक सैलसर जोडीची साथ नसेल तर मानवी जीवन नीरस होईल.

(२) माणूस सतत औपचारिक राहू शकत नाही व तो सतत अनौपचारिकही राहू शकत नाही. अर्थात तो सतत वैज्ञानिक राहू शकत नाही व सतत धार्मिकही राहू शकत नाही. अनौपचारिक देव व धर्म हे ताठर निसर्ग विज्ञानाला लवचिक करतात म्हणून ते मानवी जीवनाला आवश्यक आहेत. माणूस म्हणजे तरी काय तर मानवी मन जे मानवी मेंदूत असते. हा मानवी मेंदू मानवी शरीराचाच एक प्रमुख भाग आहे. त्यामुळे मानवी मन हे मानवी शरीरापासून अलग होऊ शकत नाही. मानवी मनाला लहानपणापासून जशा सवयी लावाव्या तशा लागतात. म्हणून तर मानवी मनावर लहानपणापासून चांगल्या सवयीचे संस्कार केले जातात.

(३) मानवी मनावर लहानपणापासून सतत केले जाणारे धार्मिक संस्कार हे चांगल्या सवयीचाच एक भाग आहे जो भाग पुढे निसर्ग विज्ञानाला पूरक होत जातो व मानवी जीवन अर्थपूर्ण करतो. मनाच्या सवयी अंगवळणी पडल्या की मग त्या सवयी शरीराकडून शारीरिक कृती घडवून आणतात.

(४) विज्ञानातून निसर्ग आकलनीय होतो पण देव आकलनीय होत नाही असे का? देव हा विज्ञानाला अनाकलनीय होतो याचे कारण मानवी मनाच्या दृष्टिकोनात असते. मानवी मन निसर्गाकडे सतत वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच बघू लागले तर त्या मनाला देव काय कळणार? हा औपचारिक वैज्ञानिक दृष्टिकोन बदलून मानवी मनाने अनौपचारिक आध्यात्मिक किंवा धार्मिक दृष्टिकोन स्वीकारला की मानवी मनाला याच निसर्गात देव दिसू लागतो व निसर्ग विज्ञानात देवाचा धर्म दिसू लागतो. याच दृष्टिकोनातून मी निसर्गात देव बघतो व विज्ञानात धर्म बघतो.

(५) पण देव कुठे असतो? तो निसर्गात असतो तसा मानवी मनातही असतो. खरं तर देवाचे देवत्व मानवी मनातूनच जागृत करता येते. मला जर कोणी प्रश्न केला की खून, बलात्कार होत असताना देव कुठे लपून बसतो? तर माझे उत्तर हेच असेल की अशावेळी देव कमकुवत समाज मनात लपून राहतो. समाज मनातील देवत्वाचा कप्पा काही काळ बंद झालेला असतो. याला मानवी मेंदू तात्पुरता रिकामा (ब्लँक) होणे असे म्हणतात. परंतु समाज मनातील देवत्वाचा तो कप्पा जागृत झाला की मग समाजाने स्थापित केलेल्या सरकारवर समाजाचा दबाव वाढतो व सरकारी यंत्रणा अशा गुन्हेगारांना अटक करून शिक्षा देण्याच्या कामाला लागतात. या दृष्टीने सामाजिक कायदा समाज मनातील देवत्वाचा आरसा आहे.

(६) धार्मिक सण व उत्सव अनौपचारिक राहिले पाहिजेत. त्यात विज्ञानाची औपचारिकता नको. कारण ती आणली की अशा सण, उत्सवातला आध्यात्मिक आनंद संपतो. अनौपचारिक धर्मातील देवालाही अनौपचारिकच राहू द्या! त्यात विज्ञानाची औपचारिकता आणली की मग पुढे देवाचा पुरावा मागण्याचा वैज्ञानिक कार्यक्रम सुरू होतो.

(७) देव धर्मात औपचारिकता आणल्याने पुढे धार्मिक कर्मकांडाचा त्रास सुरू होतो. देवाची पूजा, प्रार्थना अमूक अमूक पद्धतीनेच केली पाहिजे असे धार्मिक कर्मकांड म्हणजे काय तर देवाला गणिती मोजमापात बसवणे. यालाच तर औपचारिकता म्हणतात. पण अशा प्रकारच्या औपचारिकतेमुळे देव अदृश्य होतो (देवाला धार्मिक कर्मकांड प्रिय असते हे मिथ्यक आहे) व धर्म भरकटतो. म्हणून अनौपचारिक (सैल/ लवचिक) असलेल्या देव धर्मात निसर्गाच्या विज्ञानाचा औपचारिक गणिती ताठरपणा हा नकोच नको!

-ॲड.बी.एस.मोरे©१४.९.२०२१

टीपः
तांत्रिक विज्ञानाला मानवी चेहरा चिकटवला की विज्ञानाचा कायदा बनतो व कायद्याला देवाचा आदेश मानून त्याला देवत्व चिकटवले की कायद्याचा धर्म बनतो! -ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular