Homeमुक्त- व्यासपीठनवीन वर्षाचेेे जुने नवे संकल्प

नवीन वर्षाचेेे जुने नवे संकल्प

नवीन वर्षाचे स्वागत आपण कसे करता? असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे मिळतील. 31 st ला पार्टी करतो. मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्याबरोबर धम्माल करतो. कुठेतरी फिरायला जातो, गाण्याच्या कार्यक्रमाला जातो. चक्क घरी बसून रोजच्या वेळेला झोपतो! किती आणि काय उत्तरे मिळतील.
नवीन वर्षाचे स्वागत आपल्याला का बरं करावेसे वाटत असेल?
“नित्य नवे ते मला हवे, “हा तर मनुष्याचा मूळ स्वभाव आहे त्यामुळे असेल कदाचित किंवा नवीन वर्ष काहीतरी वेगळे चांगले घेऊन येईल अशी आशा बाळगून त्या स्वप्नांचे स्वागत करायची ती पद्धत असावी.
1 जानेवारी च्या मुहूर्तावर आणखी एक गोष्ट हमखास केली जाते “नवीन वर्षाचे नवीन संकल्प”करायचे.
या वर्षी आपण रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणार या संकल्पाचे स्थान सर्वात वरचे असेल. हा संकल्प हा एकच संकल्प नसून जोड संकल्प आहे.
एक तर सकाळी लवकर उठणार आणि दुसरा व्यायाम करणार. यातल्या कोणत्याही एका कारणाने हा संकल्प हमखास बारगळतो. अगदी नवीन बुट, व्यायामाचे खास कपडे आणि वर्षभराची जिमची फी इतकी जय्यत तयारी केली जाते. साधारणपणे पाचसहा दिवस हा उत्साह टिकून राहातो. भारीतभारी म्हणजे 15 दिवस . मग हळूहळू हा उत्साह कमी कमी होत जातो केव्हा सकाळी उठायचा कंटाळा येतो तर कधी हातपाय दुखत असतात. रोज नवीन कारणे दिली जातात. मग व्यायामाच्या कपड्यांचा नाईट ड्रेस होतो तर बुट कधी कधी फिरायला जाताना वापरले जातात. आणि फीचे पैसे अक्कलखात्यात जमा होतात.

दुसरा संकल्प असतो डायरी लिहिण्याचा! यातही एक मजा असते सुरुवातीचे लिखाण एक तारखेच्या पानावरून दोन तारखेचे पानही व्यापून टाकते. हाही उत्साह दहाबारा तारखेपर्यंत अर्ध्या पाव पानापर्यंत कमी होतो. मग हळूहळू पानं मोकळी राहायला लागतात. एखाद्या प्रेमी युगुलाचे लग्न झाल्यावर लग्नाआधी तासंतास एकमेकांशी गुलुगुलू बोलणाऱ्या नवऱ्याच्या हातात भाजीची पिशवी आणी बायकोच्या हातात कालथा आणि झारा यावा त्याप्रमाणे सुरुवातीला कविता लिहिलेल्या डायरीच्या पुढच्या पानावर चक्क रोजचा हिशोब लिहिलेला दिसतो.
इतर काही संकल्प पण केले जातात यांना विद्यार्थी स्पेशल म्हणावे लागेल जसे रोज अभ्यास करणार, आपली होस्टेलची रूम रोज झाडणार, मोबाईल वर कमी गेम खेळणार, कट्ट्यावर टाईमपास करणार नाही, काय आणि किती मोठी लिस्ट देऊ!
काही संकल्प हे टिपिकल व्यसनमुक्ती करु इच्छिणाऱ्या लोकांसाठी असतात. नवीन वर्षापासून बघच तू मी दारूला हातही लावणार नाही. बहुधा हे सांगताना हातात मात्र ग्लास असतो! सिगरेट सोडायची ईच्छा असणाऱ्याच्या हातात सिगरेट असते असो.
काही संकल्प हे करायचे म्हणून केले असे असतात.ते नक्की मोडणार हे सर्वज्ञात असते. अशा संकल्पांना अशक्यप्राय वर्गातले म्हणावे . जसे नविन वर्षात अजिबात शॉपिंग करणार नाही, नवऱ्याशी /बायकोशी अजिबात भांडणार नाही. रात्री वेळेवर झोपणार इत्यादी इत्यादी… सगळ्या संकल्पांची जंत्री दिली तर अख्खे पुस्तक होईल.

हे संकल्प का मोडतात याचा विचार केला की जाणवते की असे संकल्प मोडण्यासाठीच असतात. ज्याला एखादी गोष्ट करायचीच असेल तर तो अशी एक तारखेची वाट पहात नाही. अशांसाठी मनाचा निश्चय लागतो फक्त.

आपण कोणत्या कॅटेगरीत मोडतो याचा विचार मनातल्यामनात करूया आणि यावर्षी कोणता संकल्प करायचा (आणि मोडायचा) हेही ठरवूया.

नवीन संकल्प करण्यासाठी आणि ते कसोशीने पाळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular