Homeमुक्त- व्यासपीठनियती नशीब की फसवणूक ( सत्यकथा)

नियती नशीब की फसवणूक ( सत्यकथा)

आजचा दिवस तसा अस्वस्थेतच गेला.सकाळी घरुन निघालो अमरावती कोर्टात जाण्यासाठी पण एक अस्वस्थता सोबत घेऊनच.अस वाटत होत की आज काही तरी वाईट घडणार आहे,एक प्रकारची मानसिक अशांततेच वादळ घोंघावत होत.त्याच अस्वस्थेतच कोर्टाची कामे आटोपली,आणि चांदुर ला जायला निघालो. चांदुर रेल्वे कोर्टाचे काम आटोपले आणि एका वकील मित्राकडे एका प्रकरणाची चर्चा करण्यासाठी परत अमरावती जाणे भाग होते.मग काय निघालो परत अमरावती.
माझा हा वकील मित्र साईनगर भागात राहतो .पाच साडे पाच वाजता त्याच्याकडे पोहचलो.एका प्रकरणावर चर्चा करून साडे सहाला त्याच्या घरून निघालो. साईनगर समोर डिमार्ट दुकान आहे,तीथे गाडी बंद पडली. मग माझा ड्रायव्हर म्हणत होता की,”दादा तुम्ही इथच थांबा मी समोरच गँरेज आहे तीथुन एखाद्या जणाला आणतो आणि धक्का मारत गाडी गँरेज वर नेतो.मग मी पूर्ण रिकामा कुठे जाव,काय कराव काही कळत नव्हत कारण गाडी दुरूस्त व्हायला अर्धा पाऊण तास लागणार होता.मग बसलो तीथच्याच बस थांब्यावर, म्हटल तसा खुप दिवसाचा मोकळा वेळ मिळाला नाही, आज मिळाला तर मस्त रहदारीची मजा घेवु.
मी बसुन दहा एक मिनिटं झाली असतील तेवढ्यात एक चाळीस बेचाळीस वर्षाची महिला बस स्टाँँपवर आली.अंगात जुनी मळकी साडी,जुनाट ब्लाउज, केस अस्ताव्यस्त अशा अवतारात. पण ती मुळची सुंदर असावी कारण एवढ्या गबाळ्या अवतारातही तीचा मुळचा गोरा रंग दिसून येत होता. मी तीच्या कडे पाहत असतानाच ती अचानक माझ्या कडे वळली आणि काही क्षणासाठी तीची आणि माझी नजर एकच झाली. तसा माझ्या अंगावर सरसरून काटा आला.कारण मला अस जाणवत होत की मी हिला कुठ तरी पाहल आहे,नव्हे तर हिच्या सोबत आपला कुठ तरी नक्कीच काही तरी संबध आला आहे.अगदी अंर्तमनातुन ढवळून मेंदूच्या स्क्रीन वर एखादा चित्रपट सुरु व्हाव तस माझ सुरु झाल.अचानक एक ठसठशीत नाव समोर आल, वैशाली देशमुख हो नक्कीच ती वैशाली च होती.पण तीचा सध्याचा अवतार पाहून मन विचारायला धजावत नव्हत.पण शेवटी मनाचा हिय्या करून विचारायच ठरवलच, पाहू तर खर काय होईल ते होवो पण विचारलच,”आपण वैशाली देशमुख का?”तीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते.ती म्हणाली,”तुम्ही मला कसे ओळखता?”कदाचित तीने मला ओळखले नसावे,कारण काँलेज मध्ये मी काही फार प्रसिद्ध वगैरे नव्हतोच त्यामुळे तीने मला ओळखावे हि अपेक्षाच नव्हती.पण मी विचारल्यावर ती माझ्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होती,जणु जुनी ओळख आठवण्याचा प्रयत्न करीत होती.
मग मीच तीची तंद्री तोडली आणि म्हणालो,”१९९३बि.ए.भाग१,भारतीय महाविद्यालय”
मग तीला थोडी ओळख पटल्यासारखी वाटली आणि अचानक तीला ओळख पटावी आणि ती म्हणाली,”ललित तू?”
तीने सरळ नाव घेतल्याने,माझ्यावरच दडपण काहीस हलक झाल होत.मी तीला म्हटल,”अग किती दिवसांनी भेटतेस?कुठ गायब झाली होती?”
माझे एकामागुन एक प्रश्न ऐकुन ती थोडी बावरली,पण लगेच सावरून म्हणाली,”अरे किती प्रश्न विचारशील,था़ंब की थोडा.
“हो रे तब्बल विस एकविस वर्षांनी भेटतो आहे,आपण मग चहा पाजशील की फक्त कोरड्या गप्पाच करणार आहे.”
मी म्हटल,”व्वा का नाही, चल म्हटल चहा पिऊ”. तीच्या सोबत बाजुच्याच हाँटेल मध्ये चहा प्यायला निघालो.पण तीच लक्ष राहुन राहुन रस्त्यावर लागलेल्या नाश्त्याच्या गाड्या,चायनीज च्या गाड्या कडे जात होत.माझ लक्ष जाताच ती मात्र नजर चोरून घेत होती.मला ते जाणवल,मग मीच म्हटल,
“अग वैशाली, आपण चहा नंतर घेऊ,अगोदर नाश्ता करु”,पण ती नकार देत होती,पण त्यात ठामपणा नव्हता.मग मी पण बळेच जबरदस्तीने तीला नाश्त्याच्या गाडीवर घेऊन गेलो.मी म्हटल घे तुला काय पाहिजे ते..
ती म्हणत होती काही पण चालेल.मी दोन प्लेट मिसळची आँर्डर दिली,आणि बाजुच्याच बेंचवर बसलो,तीच्या कडे पाहात.
तीच परत लक्ष गेल तर ती म्हणाली, अरे काय पाहतोस कधी पाहल नाही का?
मी म्हटल,अग किती दिवसांनी भेटलो आपण ,बर तु कुठे असतेच आता?काय करते?काही पत्ताच नाही.
ती म्हणाली, अरे सगळ सांगते पण पहिले नाश्ता करू,नंतर सांगते.आमचा नाश्ता आटोपला आणि चहा घेऊन हाँटेल च्या बाहेर आलो. तर एक धक्का अजुन बसणार होता.तीने मला दहा रूपये मागीतले. मी पण विचार न करता देऊन टाकले.ती दहा रूपयाचे काय करते याची मला उत्सुकता होती.ती मात्र सरळ कोणाचीही भिड मुवर्त न ठेवता समोरच्या पान टपरी वर गेली दोन नजरच्या पुड्या घेतल्या, एक तीथेच फोडून तोंडात टाकली,दुसरी पुडी निगुतीने एखादा मौल्यवान ऐवज जपावा तशी ठेवुन दिली.
माझ पूर्ण लक्ष होतच ती देखील माझ्या कडे बेफिकीर पणे पाहत होती,जणू ह्या समाजावर सुड उगवत असल्या सारखी.
मला आज धक्क्यावर धक्के बसत होते,आणि माझ मन मात्र भुतकाळात जाण्याचा प्रयत्न करीत होत.माझी तंद्री लागत होती तेवढ्यात तीच्याच आवाजाने मी भानावर आलों, अहो मिस्टर कुठ हरवले
मी म्हटल “इथच आहे,पण मन मात्र भूतकाळात गेलय”
ती बेफिकीर पणे म्हणत होती,अरे भूतकाळात जास्त रमत नको जाऊ,सायकीक होशील”मी म्हटल अग तुझ सांग ना काय चालू आहे?,कुठे असते?,नवरा काय करतो? तीने परत एकदा मला थांबवत म्हटले,तुला वेळ आहे माझी गोष्ट ऐकायला?
मी म्हटल हो,तर मग साई मंदिरात ये तीथे निवांत बसुन सांगते,मी म्हटल सोबत जाऊ
तर तीने नकार दिला. ती म्हणाली मी समोर जाते तु मागुन ये.मी परत विचारात पडलो
कि जी मुलगी माझ्या सोबत नाश्ता करू शकते,चहा घेऊ शकते.थोडावेळ का होईना रहदारी च्या रस्त्यावर गप्पा मारू शकते.ती मात्र मंदिरात सोबत येण्यास का नकार देत असावी. मी विचारात असतानाच तीने मला साई मंदिराकडे चलण्यासाठी सांगीतले.
ती माझ्या समोर चालत होती,तीला मी पाठमोर न्याहाळताना चालत होतो.पाय साई मंदिराची वाट चालत होते.पण मन मात्र तब्बल विस वर्षे मागे जाऊन १९९३सालातल्या बि.ए.भाग १च्या वर्गात जाऊन बसल होत.
पाय साई मंदिराची वाट चालत होते,पण मन मात्र विस वर्षा मागे १९९३च्या बि.ए.भाग एकच्या वर्गात जाऊन बसल होत. सन१९९३ला मी मालखेड गावातुन बारावी पास झालो आणि पुढील शिक्षणासाठी अमरावती गाठली.तस माझ गाव अमरावती पासुन विस किलोमीटर तेव्हा एस.टी च्या फेऱ्या देखील भरपूर होत्या,म्हणून अप डाऊन करून काँलेज करायच.त्यासाठी सोईच काँलेज म्हणुन भारतीय महाविद्यालयात प्रवेश घेतला,कारण तेव्हा आमच्या गावची बस दस्तुर नगर,कंवर नगर,राजापेठ या मार्गाने येत होती.सध्या जिथे न्याहारी हाँटेल आहे तीथे थांबायची मग तीथुन पाच मिनटात काँलेज मध्ये.
नुकताच भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा झाला होता,आणि काँलेज नियमीत व्हायला सुरुवात झाली होती.काही नवीन मित्र मिळाले होते आणि मस्त फुलपाखराचे आयुष्य जगण सुरु झाल होत.एक दिवस काँलेजच्या नोटीस बोर्ड वर नोटीस लागली की, काँलेज मधून वादविवाद स्पर्धे करीता चार विद्यार्थ्यांची निवड करायची आहे.तर ज्यांना सहभागी व्हायचे त्यांनी आपली नावे संबधीत प्राध्यापका कडे नोंदवा.मी माझ नाव नोंदवील आणि स्पर्धेच्या तयारी ला लागलो..विषय मला वाटत समान नागरी कायदा..असा काही तरी होता.
काँलेज मधील स्पर्धेचा दिवस उजाडला एकुण नऊ जण बोलणार होते.एक एक विद्यार्थी आपआपले मत मांडत होता.माझा नंबर आठवा होता.प्रत्येकाला सात मिनटाचा वेळ होता.तेवढ्यात एक नाव निवेदकाने घेतल,”वैशाली देशमुख—बि.ए.भाग एक”
आणि सगळ्यांच्याच नजरा तीकडे वळल्या
एक सुंदर पाच दोन उंची असलेली, मुळात च गौर वर्णी आणि सुखवस्तू घरातील मुलगी व्यासपिठाकडे चालत येत होती.तिच्या चालण्यात एक ठामपणा होता, फँशन होती पण बिभत्सता नव्हती आणि तीने बोलायला सुरुवात केली,अवघ्या सात मिनटात आख्ख सभागृह खिशात टाकून हि मुलगी आपल्या जागेवर जाऊन बसली.हिच माझी पहिली भेट.त्याऩतर मी माझा नंबर आल्यावर बोलुन आलो.स्पर्धेचा निकाल आला चार जण़ामध्ये एक नाव माझ होत.आता महविद्यालयीन वादविवाद स्पर्धे करीता चार जणांपैकी दोन जणांची टिम जाणार होती.
असेच दिवस जात होते ,वैशाली सोबत फार काही बोलण व्हायच नाही,म्हणजे जवळपास नाहीच.पण एक दिवस आँफ पिरियड होता आम्ही दहा पंधरा मुल मुली वर्गात जोर जोरात गोष्टी करत होतो.त्यामुळे आमच्या वर्गावर प्रा.गायकवाड मँडम आल्या आणि त्यांनी आम्हला विषय दिला कीः नशीब कि कर्तृत्व या विषयावर प्रत्येकाने आपले मत मांडायच.ज्याला बोलता येत नसेल त्यांना ही त्या दिवशी बोलायला भाग पाडल मँडम नी.त्या दिवशी
मी मात्र नशीबाच्या बाजुने बोललो की,”नुसत कर्तृत्व असुन चालत नाही, तर त्या कर्तृत्वाला नशीबाची साथ मिळाली तर,आयुष्य बदलून जायला वेळ लागत नाही”.परंतु वैशाली मात्र कर्तृत्वाच्या बाजुने ठाम होती.तिच म्हणण अस होत,”नशीब किंवा नियती वगैरे हे पळपुट्या लोकांचे शब्द आहे.माणुस स्वतःच्या कर्तृत्वावर जग देखील जिंकु शकतो”.तो पिरियड संपल्यानंतर, मी बाहेर जायला निघालो तर तीने मला थांबवल आणि म्हणाली, “कि तु आज चुकीच बोललास नशीब वगैरे काही नसत असते ते कर्तृत्व”.मी तिच म्हणण शांत पणे ऐकुन घेतल आणि इतकच म्हणालो की,”वैशाली नशीब किंवा नियती हि असतेच,तीचा फेरा कसा येईल हे सांगता येत नाही”.तेव्हा ती मला म्हणाली, कि नियती,नशीब काही असो मला आय.ए.एस व्हायच आहे आणि मी होवून दाखवणार.मी तीला शुभेच्छा देऊन तीथुन निघून गेलो.
त्यानंतर जवळपास चार ते पाच स्पर्धा आम्ही टिम म्हणुन गाजवल्या. दोन तीन ठिकाणी बक्षीस देखील मिळाले. त्यामुळे सहाजिकच स्पर्धेच्या निमित्ताने विषयाच्या अनुषंगाने बोलण व्हायच.
आमची टिम पहिल्या वर्षी जेवढी सक्रिय होती.तेवढी मात्र दुसऱ्या वर्षी नव्हती.त्याला कारण वैशाली च होती.कधी यायची कधी नाही यायची मग मी दुसऱ्या पार्टनर बरोबर बोलायला जायचो.तीची माहिती काढण्याचा प्रयत्न केला पण कोणालाच तिच्या बद्दल फार काही माहिती नव्हती.एक दोन दा तिच्या कँम्प वरील घरी जाऊन माहिती काढण्याचा प्रयत्न केला,पण घरच्यांनी फार काही माहिती दिली नाही. दुसर वर्ष संपता संपता बातमी मिळाली की,वैशाली ने लग्न केल आणि ती पुण्यात असते.बस तेव्हा पासून गायब झालेली वैशाली आज माझ्या समोर अशा अवस्थेत उभी होती.काय खर काय खोट काही च कळत नव्हत.
“अहो भाऊ रस्त्यान बराबर चालना,काय बगीच्यात फिरुन रायले काय.घ्यान काय आमचा जिव”एका मोटरसायकल स्वाराच्या
तार स्वरात ओरडण्याने मी भानावर आलो,
आणि माझी पाऊले झपाझप साई मंदिराच्या दिशेनी पडू लागली.
मी साई मंदिराच्या दिशेने निघालो. मंदिरात पोहचलो तर लाँकडाऊन मुळे मंदिर बंद होत,दुरुनच साईबाबांना नमस्कार केला आणि वैशाली कुठे बसली आहे हे शोधत होतो.तर ती मंदिराच्या समोर असणाऱ्या मोकळ्या जागेत नगरसेवकांनी लावलेल्या बेंच वर बसली होती.मी तीथे जाऊन बसलो.
थोडा वेळ कोणी काहीच बोलल नाही. एक भयाण वादळा पूर्वी ची शांतता तीथ नांदत असल्याचा भास होत होता.शेवटी मीच ह्या जिवघेण्या शांततेचा भंग करत विचारल ,”अग सांग ना कुठे होती इतके दिवस?” ती मात्र चुपच होती कदाचित आपली व्यथा सांगण्या साठी शब्दाची जुळवा जुळव करत असावी.आज पहिल्यांदाच मी आख्ख सभागृह सात मिनटात खिशात टाकणाऱ्या वादविवाद पटू ला शब्द शोधतांना पाहत होतो.परत एकदा तीला हलवून विचारले ,वैशाली अग बोल ना कुठे होती इतके दिवस?तशी ती भानावर येत म्हणाली ,सांगते रे…
पहिले तु सांग तुझ काय सुरू आहे?
मी म्हटल माझ,काही नाही बि.ए.नंतर लाँ केल,आता वकीली करतो.
ती,”हो का,अन राहण
मी,”गावालाच राहतो,अजून गाव सोडलेल नाही. ती”अरे व्वा छान अन लग्न ,मुलबाळ?
मी म्हटल,हो केल ना लग्न एक मुलगी आहे,या वर्षी दहावी ला आहे.
या वर ती म्हणाली, म्हणजे एकंदरीत सुखाचा संसार चालू आहे म्हणायचा.
मी म्हटल ,”हो तस समजायला हरकत नाही”.पण तुझ काय सुरू आहे,अग सांग ना मी काकुळतीला येऊन विचारत होतो.
ती थोडी सावरून बसली आणि म्हणाली,”ललित, माझा सुखी संसार कधीचाच उध्वस्त झाला रे….”
मी म्हटल अग मला पूर्ण सांग काही तरी मार्ग काढता येईल. ती म्हणाली, त्याला खुप उशीर झाला. पण मला देखील हे कोणाला तरी सांगायच होतच,माझ नशीब चांगल की तु भेटला.मी तीची गंमत करण्याच्या उद्देशाने म्हटल,”तु तर नशीबाला मानत नव्हती आज एकदम नशीबाचा हवाला देत आहे”.यावर ती विष्णणपणे हसत म्हणाली ,”तीच तर चुक झाली”.मी म्हटलं खरच सांग तु काय करतेस,कुठे असतेस?
ती म्हणाली,”ऐक मग माझी कर्मकथा.तुला माहित असेल मी बि.ए.भाग दोन पासुन काँलेज मध्ये कमी येत होते,जवळपास येतच नव्हते.कारण मी प्रेमात ठार आंधळी झाले होते.साहिल माझ्या नवऱ्याच नाव,तो खुप प्रेम करायचा माझ्यावर.पण मी मात्र त्याला भिक घालत नव्हते.तुला आठवत आपण पहिल्या वर्षाला असताना, मी एका मुलाला काँलेज च्या गेटवर मारल होत”.मी म्हटल आठवतेना,”तो साहिलच होता.पण नंतर मात्र तो मला आवडायला लागला.मी त्याचे सोबत भटकत होते.खर तर तो मला खेळवत होता.पण मी मात्र आंधळ्या सारख प्रेम केल.मग काय सेकंड ईअर ला असताना दिवाळी नंतर पळून जाऊन लग्न केल.माझ्या ह्या निर्णयाचा धक्का माझ्या पप्पांना जास्त बसला.पण ते तरी काय करू शकणार होते.
माझीच बुद्धी गहाण पडली होती ना..”
मी म्हटल पुढ काय झाल?
ती म्हणाली,”अरे सांगते ना,नेमकी हिच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चुक नाही गुन्हा म्हणेन गुन्हा घडला.मी पळून जाऊन लग्न केल्यामुळे माझ माहेर तुटलच होत.माझ्या पप्पांनी जिवंत पणीच माझ श्राद्ध घातल होत,आणि येथुन बदली घेऊन मुंबई ला निघुन गेले.”मी म्हटल,अग मग साहिल होता ना तुझ्या सोबत” ती म्हणाली”तो माझ्या सोबत कधीच नव्हता,मी मात्र आजही त्याच्या सोबत आहे.त्याला फक्त माझ तारूण्य पाहिजे होत.मी लग्न करून त्याच्या घरी गेले तर तीथे आमचे स्वागत होईल हि अपेक्षाच नव्हती.आम्हाला त्याच्या आई वडीलांनी देखील हाकलून दिल.मग कसे तरी पैसे जमवले आणि पुण्याला गेलो.तीथे साहिल चे मित्र राहत होते.पण कोण किती दिवस आसरा देणार, शेवटी ज्याच त्यालाच पाहव लागत.आयते पैसे किती दिवस पुरणार.मग मी साहिल ला काम शोधायचा तगादा लावत होती. पण तो त्याच्या घरचा लाडात वाढलेला मुलगा त्यात शिक्षण अर्धवट,शारीरिक कष्टाचे काम कधी केल नाही. मग यावरून आमचे वाद व्हायचे.पण रात्र झाली की तो वाद मिटवायला पुढाकार घ्यायचा.अशातच त्याला जुगार,आणि दारूच व्यसन लागल.”
मी म्हटल,अग मग सोडून द्यायच ना त्याला अनेक मुली एकट्या जगतात.तस जगायला पाहिजे होत”
ती म्हणाली,”तेच माझ चुकल प्रत्येक वेळेस त्याची चुक माफ करत गेले,आणि मी मात्र उध्वस्त होत गेले. नंतर नंतर साहिल च पिण आणि जुगार खेळण इतक वाढल की माझा काहिच इलाज चालत नव्हता.कारण कोणाचाच आधार नाही, माहेर तुटलेल अशा वेळी कोणीच काही मदत करत नाही. त्यात शिक्षण अर्धवट काय करणार सैरभैर झाली होती….
आणि अशातच तो दुर्दैवी दिवस नाही रात्र उगवली साहिल दारु पिवुन घरी आला सोबत एक गुंड्या सारखा दिसणारा व्यक्ती होता….आणि जुगारात झालेल कर्ज फेडण्यासाठी मला त्याचे सोबत…..”
मी अक्षरशः हादरून गेलो,.स्वतःच सांत्वन कराव की तीला धीर द्यावा मला काही च कळत नव्हत.पण ती मात्र कोरडे पणाने सगळ सांगत होती. मला अस द्विधा मनःस्थितीत पाहून ती खळाळून हसत म्हणाली,”अबे ओय जास्त सेंटी होऊ नको”
तेव्हा मात्र मला एका कवयत्रीच्या चार ओळी नकळत आठवुन गेल्या.
हसमुख चेहऱ्यावरच्या रेषा
दुःख आपले लपवीत असतात
कशा सांगाव्या कुणास व्यथा
आतल्या आत सलत असतात.
मी जास्त विचारात पडलेल पाहून ती म्हणाली, ऐकायच आहे की मी जाऊ
मी म्हटल सांग,तर हे असच सहन करीत होते.एकवेळा आत्महत्या करण्याचा विचार देखील केला होता.पण तेव्हा माझी मुलगी पोटात होती.मुलाच्या ओढीने तरी साहिल सुधारेल हा विचार करून मी तो विचार मनातुनच काढुन टाकला.पण माझ्या दुर्दैवाचे फेरे संपायचे होते.मुलगी झाल्यानंतर काही दिवस साहिल खुप छान राहिला अगदी सुरुवातीचे दिवस आठवायला लागले.मी परत भुलली,आणि एक दिवस तो म्हणाला चला आपल्याला मुंबई ला जायच आहे.मला तीथ काम मिळाल आणि आमचा संसार पुण्याहून मुंबई ला हलला.पण माझ्या आयुष्याचे दशावतार तीथेच होणार होते.
ज्या मुलावर मी निस्सीम प्रेम केल ज्याला माझ सर्वस्व दिल,त्याने मात्र मला अवघ्या पन्नास हजारात विकुन टाकल.मी भानावर आले पण तो पर्यंत खुप उशीर झाला होता.
मी तीथुन निघण्याचा प्रयत्न केला.पण ज्या वेश्येचा नवराच दलाल असेल तर …..
मला अस वाटल आपण बहिर झालो तर ठिक होईल. तेवढ्यात ती म्हणाली ललित मी तुला गाडीतुन उतरताना पाहिल आणि तुला ओळखल.
मी म्हटल,”कस काय?”
ती म्हणाली, आपल्या दोघांचा फोटो आहे माझ्या जवळ” मी म्हटल ,मला तर काहीच आठवत नाही.
ती म्हणाली, ओय भुल्लकड तुझ्या कडे नसेल फोटो पण माझ्याकडे आहे.ब्रिजलाल बियाणी काँलेज मधील पहिल्या क्रमांकाची ढाल उचलतानांचा.बस तेवढीच आठवण आहे.त्यामुळे च मी तुला ओळखल.तु ओळखतो की नाही हे पाहयसाठी मी बस स्टाँपवर आले होते.पण तु मला मात्र लगेच ओळखल कस काय?

पण तीच्या ह्या प्रश्नाच माझे कडे काहीच उत्तर नव्हत.मी शांत बसलेला पाहुन ती म्हणाली आता आल का लक्षात मी मंदिरात का भेटायच म्हणत होती,अरे बाबा एका वेश्ये सोबत तु रहदारी च्या रस्त्यावर बोलत उभा होता.लोक तुझ्याकडे विचित्र नजरेन पाहत होते.मी म्हटल अग पण आता तरी यातुन बाहेर पड ना,एखादा जाँब शोध मिळेल ना काम.तर ती ताडकन म्हणाली,”मी तुझ्या गावाला येते,तुझ्याच घरचे धुणे-भांडे करते पैसे काही च देवु नको
फक्त दोन वेळ जेवायला देत जा,आहे मंजुर”
मी मात्र यावर काही च बोलू शकलो नाही. खरच मी काय उत्तर देणार होतो.ती म्हणाली, तु जास्त मनाला लावुन घेवु नको,हे बोलण सोप असत करण कठीण असत.पण तु वकील आहे तु मित्र म्हणुन माझ एक काम करशील? मी म्हटल कोणत?तु काँलेज मधील मुला मुल़ीना माझी हि सत्यकथा सांगशील?त्यांना सांग प्रेम आंधळ असत,पण आंधळेपणाने प्रेम करू नका.स्वतःच्या पायावय ऊभे व्हा मग जिवनाचा येथेच्छ उपभोग घ्या.मला देशील एवढ वचन एक मित्र म्हणुन..
मी नकळत तीच्या हातावर हात ठेवला,आणि साईबाबांच्या साक्षीने हि सत्यकथा समाजा समोर ठेवण्याच वचन दिल. मी तीला म्हटल,अग वैशाली,तुझा नंबर,पत्ता काही तर दे.ती म्हणाली, कशाला
बायको माहेरी गेल्यावर बोलावणार आहेस का?मी म्हटल काही पण तुझ.ती म्हणाली, अरे गंमत केली रे.पण आपली भेट व्हायची होती,म्हणुन झाली ,तु नियतीला, नशीबाला मानतो ना,मग आपली एवढीच भेट लिहली होती नियतीने. यापुढे मी कुठे असेल कशी असेल सांगता येत नाही. त्यामुळे मला शोधु नको.मी म्हटल अग तुझी मुलगी कुठ असते
ती म्हणाली, ती महिलाश्रम मध्ये शिकते बारावी झाली बाकी काही असो मी तीला या नरका पासून दुर ठेवले.आता ती एकदा तिच्या पायावर उभी झाली की मी मरायला मोकळी.माझा हात पटकन तिच्या तोंडावर हात ठेवला,तर ती म्हणाली माझे कडे किती दिवस आहे मी सांगु शकत नाही, माझ्या प्रेमाची भेट सोबत घेवून जगत आहे.मी म्हटल का काय झाल?तर ती म्हणाली, मी एच.आय.व्हि.पाँझेटिव्ह आहे.पण तु भेटला मन मोकळ झाल.अस ती म्हणाली एकदम झटकन उठून जायला लागली,तेव्हा न राहवुन माझा हात खिशात गेला एक पाचशे रूपयाची नोट काढुन तिच्या हातात ठेवली.ती हसली आणि म्हणाली कशाला?
मी म्हटल तुझ्या साठी नाही तुझ्या मुलीसाठी
आणि ती माझा हात हलकेच सोडवुन साई मंदिरातुन बाहेर पडली,मागे वळून न पाहता
मी माझ्या डोळ्या समोर नशीब किंवा नियतीच्या चक्रव्यूहात हरलेल कर्तृत्व जातांना पाहत होतो.
तेवढ्यात माझा मोबाईल वाजला,माझ्या ड्रायव्हर चा फो होता,”दादा गाडी दुरूस्त झाली, तुम्ही कुठ आहे?”मी म्हटल येतो.
पायात मना मनाच्या बेड्या,आणि डोक्यात अनेक प्रश्नाचे वारूळ घेऊन, मी साई मंदिरातुन बाहेर पडलो.साई मंदिराच्या बाजुला असलेल्या पानठेल्यावर गाण लागल होत,आणि लताजी गात होत्या,
अजीब दास्ताँ है ये…….।

अँड ललित मा. कदम
मालखेड रेल्वे
या घटनेतील संपूर्ण प्रसंग सत्य असुन फक्त नायीकेचे नाव बदललेले आहे.

सौजन्य – सोशल मीडिया

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular