Homeमुक्त- व्यासपीठन्यूज चॅनेलवाल्यानो हे दाखवता येईल का ?- अभिनेता माने

न्यूज चॅनेलवाल्यानो हे दाखवता येईल का ?- अभिनेता माने

दोस्तांनो , अशी पोश्ट ल्हायची लै लै लै इच्छा झालीय… करू का? तुम्हीच सल्ला द्या. मग करतो पोस्ट. दोस्तलोक म्हन्त्यात, ‘किरन्या माने, तुझं चांगलं चाल्लंय ना. तू कशाला उगं कुनाशी पंगा घेतोयस?’ पन भवतालचा कहर बघून मन ऐकंना झालंय. ज्यांच्यासाठी लिहीतोय त्यांच्यात माझे काही ‘सेन्सीबल’ मित्रबी हायेत… त्यांनी समजून घ्यावं…


न्यूज चॅनलवाल्यांनो,
परीस्थिती लै बेक्कारय. लोकं किड्यामुंगीसारखी मरायला लागलीत. कामधंदे ठप्प झालेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांचे भंपक सल्ले दाखवणं बंद म्हंजे टोटल बंदच करा.. एकाकडं पन मेंदू नांवाचा अवयव नाय. येड्याबोड्याचा विरोधी पक्ष मिळालाय आपल्याला. केंद्र असो वा राज्य, फक्त सत्ताधार्‍यांशी ‘गांभीर्यानं’ बोला ! त्यांना पत्रकार परीषदा घेऊन थेट मुद्यांवर बोलायला भाग पाडा. कारण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे.

बोलताना ‘ऑरगॅजमिक’ किंचाळणं टाळा. बातम्या सुरू असताना ढॅणढॅणढॅणढॅण बॅकग्राऊंड म्युझीक लावू नका. सत्ताधार्‍यांना-मंत्र्यांना शांतपणे जनतेच्या मनातले प्रश्न विचारा. त्यांनाही सविस्तर बोलूद्या. कोरोना रूग्णांसाठी अत्यावश्यक असलेली इंजेक्शन्स नक्की कुणी दाबलीत वगैरे थेट विचारा.. सुशांत वगैरे प्रकरणात तुम्ही गुप्तहेराच्या वर एकेक धागे शोधून काढता.. ‘रेमडेसीवीर’सारख्या बाबतीत तुमची डिटेक्टिव्हगिरी दाखवा की… कुणा रताळ्याला ‘विरोधी पक्षाचा प्रवक्ता’ म्हणून तारस्वरात असंबद्ध बकबक करायचा कंड उठला असेल तर तो बाहेरच्या बाहेर जिरवा. केंद्र असो वा राज्य, कुणा सत्ताधारी नेत्याला आठ वाजता-सात वाजता-पाच वाजता जनतेला सल्ला-फिल्ला द्यायला टीव्हीवर यायची खाज आली असेल तर त्याला आहे तिथं थांबवा. त्याला चुकूनही कॅमेर्‍याचं तोंड दाखवू नका. कामं करा म्हणावं. थेट प्रशासनामार्फत निर्णय जाहीर करा म्हणावं. भाषणं नकोत.

गुजरात-युपीमध्ये मृत्यूचं तांडव सुरूय. मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये एका स्मशानभूमीत पन्नासच्या वर प्रेतं जळत होती. कुणाही नातेवाईकाला आपल्या माणसाचं प्रेत कुठलं ते माहीती नव्हतं. त्या तुलनेत महाराष्ट्र ‘अजूनतरी’ थोड्या बर्‍या स्थितीत आहे. पण म्हणून हे हलक्यात घेऊ नका. ते जात्यात आहेत, आपण सुपात आहोत.

कोरोनाचा आणि कुठल्या पक्षाची सत्ता असण्याचा काहीही संबंध नाही हे आधी स्वत:च्या मनात ठसवा.. कोरोना ‘धर्म’ बघूनही होत नसतो. तब्लीगीमुळं पसरतो तसाच कुंभमेळ्यामुळेही करोडोंचे जीव धोक्यात घालतो. तुमच्यातला ‘सजग पत्रकार’ जागा करा…

“तुम्ही पेट्रोल-डिझेल-घरगुती गॅस-औषधं यांच्या दरांच्या उडालेल्या भडक्यावर रान पेटवा.” असं म्हणून मी तुम्हाला अडचणीत आणत नाय… “मंदिरं खूप आहेत, अद्ययावत हाॅस्पीटल्सची गरज आहे. ती बांधण्यासाठी सरकारचा पिच्छा पुरवा.” असा सल्ला देऊन तुमची बोलती बंद करत नाय. “देशातल्या बेरोजगारीनं कळस गाठलाय,कोट्यावधी संसार उघड्यावर पडलेत त्यावर रोज सतत चर्चा घडवून सरकारला धारेवर धरा” असं म्हणून तुमची गोची करत नाय. शेवटी तुमचा मालकच विकला गेलाय, तुमचा काय दोष?

पण जवळचे – दूरचे अचानक पाॅझीटिव्ह निघाल्याच्या बातम्या येताहेत… त्यातले अनेकजण अचानक जाताहेत.. मनाला होणार्‍या यातनांना सीमा नाही. परिस्थिती गंभीर आहे. आता तरी ‘माणूस’ व्हा… तुमच्याबी घरात वयोवृद्ध आईवडील-आजीआजोबा असतीलच की. त्यांच्या जीवासाठी तरी… बाकी नोकरी आहे तोवर तुम्हाला ‘मालकाचे’ आदेश पाळायचेच आहेत… तूर्तास तुमच्या-माझ्या सगळ्यांच्याच जीवाशी आलंय.. संवेदना जाग्या करा रे राजांनो !


करू का पोश्ट? का नको उगं वाईटपना घ्यायला…? ‘शेलीब्रिटी हावोत आपन.. ही मान्सं डूख धरतील. यांची गरज हाय आपल्याला’ असं म्हनत ‘ह्यॅह्यॅह्यॅ’ हसत सगळ्यांशी खोटंखोटं गोड बोलत संबंध जपू का?

साभार सोशल मीडियावर खूप जुनी पण व्हायरल पोस्ट जशी च्या तशी

  • किरण माने.

Previous article
Next article
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular