Homeमुक्त- व्यासपीठ|| पुरुषोत्तम पुरी एक सांस्कृतिक ठेवा ||

|| पुरुषोत्तम पुरी एक सांस्कृतिक ठेवा ||

पुरुषोत्तमपुरी एक सांस्कृतिक ठेवा
महाराष्ट्र ही जशी संतांची भूमी आहे ,तसेच मंदिरे, उत्सव व परंपरा हा ही भारतीय संस्कृतीच्या सांस्कृतिक संचिताचा एक भाग आहे .असाच प्राचीन इतिहास मराठवाड्यातील पुरुषोत्तपुरी या गावाला लाभला आहे.
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी येथे श्री पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. अप्रतिम वास्तुशास्त्राचा नमुना असलेले हे मंदिर म्हणजे संस्कृती -परंपरा – इतिहास याचा मूर्तिमंत पुरावाच आहे .पुरुषोत्तम मासामध्ये येथे श्रीपुरुषोत्तम भगवानाचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतामधून भाविक भक्त येत असतात. पुरुषोत्तम पुरी ने महाराष्ट्राला तीन प्रकारचे मूल्य दिले .
१ ) प्राचीन ऐतिहासिक वास्तू की ज्याला धार्मिक ते बरोबर अप्रतिम वास्तुशास्त्राचा ही ठेवा आपणास पहावयास मिळतो तो म्हणजे श्री पुरुषोत्तम भगवानाचे मंदिर व सहा लक्षे स्वराचे मंदिर .
२) प .प . पूर्णाश्रम स्वामी महाराज यांचा सहवास ,वास्तव्य, समाधी मंदिर व प्रासादिक पांडुरंगाची मूर्ती .
३) संत एकनाथ महाराजांची ‘आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा ‘ पासूनची परंपरा व समाज प्रबोधनाची चळवळ हे आजतागायत पूर्णाश्रमस्वामी संस्थांनमध्ये गुरु परंपरेने , वंशपरंपरेने पुरुषोत्तम पुरी येथे देव वाड्यामध्ये चालू आहेत.
गोदावरीचे विस्तीर्ण पात्र ,सुंदर वृक्षांनी सजलेली वनराई , ब्राह्ममुहूर्तावर उठून गोदावरीचे पाणी आणायला माता – माऊल्यांची – पुरुषांची धांदल . पुरुषोत्तम मंदिरात दर्शनार्थी ने केलेला घंटानाद .
प.प. पूर्णाश्रमस्वामी यांच्या समाधीसमोर ‘उठा की जी मायबाप कशी लागली झोप’ हा काकड्यातील संत एकनाथांचा अभंग ऐकून रामप्रहरी च्या कामाची लगबग अशा या पवित्र गौतमी तीरावर भगवान विष्णूने शार्दुल दैत्याला मारण्यासाठी पुरुषोत्तम अवतार धारण केला.
या पुरुषोत्तमपुरीच्या जवळच जायको देवीचे मंदिर आहे . या गावाला जायकोची वाडी असे म्हणतात. येथील देवीला शार्दुल दैत्याने संत्रस्त केल्यामुळे तर भगवान विष्णूला पुरुषोत्तम अवतार धारण करावा लागला . त्या पुरुषोत्तमाचे अधिक मासात दर्शन घेतल्याने पापाचा समूळ नायनाट होतो .
ज्या पुरुषोत्तमाच्या दर्शनाने व गोदावरीच्या पवित्र जलाने स्नान केल्यानंतर शरीराची व मनाची शुद्धी होऊन देह शुचिर्भूत होतो व आत्मिक शांती मिळते , अशा पुरुषोत्तम व गोदावरी, गौतमीच्या वास्तव्याने पुनित झालेली ही भूमी आहे .
पुरुषोत्तमपुरीच्या पूर्व दिशेला अनेक वर्षापूर्वी ऋषी-मुनींनी केलेला यज्ञ व भस्माची टेकडी आहे .या भस्माचे वैशिष्ट्य म्हणजे ते भस्म अत्यंत मऊ आहे. राजा रामदेवराय या धर्माभिमानी राजाने तेराव्या शतकात पुरुषोत्तम मंदिराचा जीर्णोद्धार केला . या मंदिराला फार मोठा इतिहास आहे . शार्दुल नावाचा दैत्य मातळला त्याने येथून जवळच असलेल्या जायको देवीला त्रास द्यायला सुरुवात केली. संत्रस्त झालेल्या देवीने भगवान विष्णू परमात्मा यांच्या कडे धाव घेतली .भगवान विष्णूने पुरुषोत्तम रूप धारण करून शार्दुल दैजंत्याचा वध केला. इथेच गोदावरीच्या काठी ज्या सुदर्शन चक्राने दैत्याला मारले ते चक्र जिथे धुतले त्याला चक्रतीर्थ असे म्हणतात.
अध्यात्मिक क्षेत्रामध्ये क्षर व अक्षर असे पुरुष मानले जातात. क्षर म्हणजे उत्पत्ती नाशात्मक जग व अक्षर पुरुष म्हणजे आत्मा-परमात्मा यालाच मायोपाधिक जीव म्हणतात.
या दोन्ही पुरुषांपेक्षा वेगळा असलेला नित्य, शुद्ध ,बद्धमुक्त असा जो त्याला पुरुषोत्तम म्हणतात. गीतेतील पंधराव्या अध्यायात यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तम:
शार्दुल दैत्य देवीला त्रास देत होते ,म्हणून सर्व देव गोळेगावी गोळा झाले तेव्हा पासून त्या गावाला गोळेगाव हे नाव पडले. संतकवी दासगणू महाराज
गोदामहात्म्य या ग्रंथातील 20 व्या अध्यायात असे म्हणतात की शार्दुल वधानंतर | गोदातटाकी शारंगधर | येऊन निज चक्र साचार गंगोदके प्रक्षाळी |तेथे चक्रतीर्थ जाहले | पुरुषोत्तम पुरी पाशी भले| विष्णू उभे राहिले पुरुषोत्तम रूपाने |
पुरुषोत्तम मंदिराशेजारी सहालक्षेश्वराचे मंदिर आहे .या मंदिराची कलाकुसर अत्यंत सुबक असून या मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. त्र्यंबकेश्वरापासुन पुरुषोत्तम पुरी पर्यंत सहालक्ष ही संख्या पूर्ण होते म्हणून त्याला सहालक्षेश्वर असे म्हणतात . अतिशय भव्य अशी स्वयंभू महादेवाची मूर्ती इथे असून त्या मूर्ती जवळच गणपतीची मूर्ती याच गाभार्‍यात आहे .तर एका देवळी मध्ये पार्वती मातेच्या पादुका आहेत.
अशा या पावन भूमीमध्ये अनेक यतींनी तपानुष्ठान साधना केलेली आहे .त्यापैकी प.प. पूर्णाश्रमस्वामी महाराज एक होत. प.प. पूर्णश्रमस्वामी हे मूळचे अंबाजोगाईचे जहागिरदार .प्रपंचापासून विरक्त वृत्तीचे ते असल्यामुळे त्यांनी जहागिरदारी सोडून पुरुषोत्तमरीला वास्तव केले . त्यांना रहिमतपुरच्या तुकाविप्र स्वामींचा अनुग्रह. तुकाविप्र स्वामी यांची बीड जिल्ह्यातील अंजनवती येथे समाधी असून त्यांचे एक लक्ष 25हजार अभंग आहेत.
प.प.पूर्णाश्रम स्वामी महाराज हे पंढरपूर व पैठणची वारी नित्यनेमाने करत असत. बराच काळ व्यतीत झाला वार्धक्य आले. एका पंढरपूरच्या वारीला गेल्यावर पांडुरंगा पुढे उभे राहून “देवा पांडुरंगा यापुढे वारीला येणे होईल असे वाटत नाही” त्याच्या दुसऱ्या दिवशी चंद्रभागेत स्नान करत असताना त्यांच्या ओंजळीत एक विठ्ठल मूर्ती हाती आली व स्वप्नात पांडुरंगाने असे सांगितले की, तुला आता इथे येण्याची गरज नाही. मी या मूर्तीच्या रुपाने सदैव तुझ्या जवळच आहे .प.प. स्वामीजींनी पुरुषोत्तम पुरी येथे ह.भ. प. लक्ष्मणबुवा रत्नपारखी यांच्या वाड्यात या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली . प.प. पुर्णाश्रम स्वामी यांची समाधीही याच वाड्यात आहे. त्यांच्या वाड्याला देव वाडा असे म्हणतात.
ह. भ. प. वै. लक्ष्मण बुवा यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून कीर्तन सेवेला प्रारंभ करून मरेपर्यंत त्यांनी किर्तन सोडले नाही. भारदस्त व्यक्तिमत्व , गौरवर्ण, ” मनाचा निर्मळ, वाचेचा रसाळ ” असे त्यांचे व्यक्तिमत्व होते . “ब्रम्हयाने बोध अत्रीसी
पै केला” ही संत एकनाथांची परंपरा वै.लक्ष्मणबुवांनी आयुष्यभर सांभाळली . संत एकनाथ महाराज संस्थान पैठण येथे वै. बुवांच्या दिंडीचा मोठा मान आहे .
जनार्दन ,एकनाथ ,तुकाविप्र – पूर्णाश्रम विठ्ठल- रमाकांत, एकनाथ ,जनार्दन व लक्ष्मण अशी ही गुरुपरंपरा आहे.
प. प. पूर्णाश्रम स्वामी यांची पुण्यतिथी आजही पुर्णाश्रम स्वामी संस्थान मध्ये चालू आहे . वै. लक्ष्मणबुवा यांच्यामुळे पुरुषोत्तमपुरीला अनेकानेक सांप्रदायिक दिग्गज येऊन गेले आहेत . म. म.यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे, ह. भ. प. धुंडा महाराज देगलूरकर, ह.भ.प.शंकर महाराज खंदारकर, ह. भ. प. भिमसिंह महाराज गडकर , गायणाचार्य गोविंदराव जळगावकर रा.अंबड, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली संस्थान उत्तरेश्वर
पिंपरी, ह . भ.प . मारुती महाराज दस्तापुरकर या सर्वांशी वै. लक्ष्मणबुवांचे स्नेहाचे संबंध होते. “नर नारी बाळे अवघा नारायण| तैसे माझे मन करी देवा” || हे त्यांचे जीवनाचे तत्वज्ञान होते. प.प. तुकाविप्र स्वामी महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे ” फिरवावी झोळी करावा आनंद “हा त्यांचा आचारधर्म होता. अशा या थोर स्थळ व सत् पुरुषाला या वर्षी “अमृताचियासागरी | जे लाभे सामर्थ्याची थोरी | ते ची दे अमृत लहरी | चुळी घेतलीया| यावरच अधिक मास भागवावा लागणार आहे |

  • दीपक शामराव कुलकर्णी ,
    ‌परतुर , जि . जालना
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular