बाराखडी

आई ग तू बाराखडी
शिकलीस ना?
तुझी आणि बाबांची
बाराखडी सारखीच
होती का ग?

नसावी बहुतेक
कारण

मला आणि दादाला
तू वेगवेगळी
बाराखडी शिकवलीस

मला म्हणालीस अ अदबीचा
त्याला अ अहंकाराचा
माझा आ आवराआवरीचा
त्याचा आरामाचा
माझा उ उरकण्यातला
त्याचा उ उडण्यातला

क कामाचा, ख खलबत्त्याचा
असे शिकवत होतीस मला
मला कधीतरी सांगितलेस का ग
क असतो कर्तबगारीचा आणि
ख खेळण्याबागडण्याचा…

त्यालाही सांगायला हवे होतेस
न नात्याचा आणि
स सन्मानाचा असतो
आणि ज असतो जबाबदारीचा

बघ ना जरा बाराखडी बदलून
आणि बाबालाही सांगशील
नवीन बाराखडी शिकवायला
त्याच्या वागण्यातून

बदलेल कदाचित सारे जग

कदाचित…

  • समिधा ययाती गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular