Homeवैशिष्ट्येभाग ३- धकधक श्वास गुदमरत आहे

भाग ३- धकधक श्वास गुदमरत आहे

मी तेथील सर्व परिस्थिती पाहण्यात दंग होतो, तितक्यात त्या वॉर्ड मधील एक डॉक्टर बाहेर आल्या आणि माझ्या शेजारी असलेल्या दुसऱ्या पेशंटच्या शंकांचे निरसन करत होत्या. त्या सेंटर मधील सिनियर डॉक्टर आतून फेरफटका मारून बाहेर आल्यावर त्या व्यक्तीला पेशंट कोणत्या कंडीशन मध्ये आहे ते अगदी शांतपणे सांगत होते. ते म्हणत होते की, पेशंटला ऑक्सिजन घेण्यास त्रास होत आहे. न्यूमोनिया झाल्यामुळे विषाणू छातीमध्ये पाणी बनवत आहे. त्यामुळे जेथे ७०% ऑक्सिजन मिळायला हवा तेथे ३५% मिळत आहे. त्यामुळे पेशंटला घशातून पाईप टाकून ऑक्सिजन द्यायला हवे. त्यांनी हे सुद्धा सांगितले की, आम्ही काय करायला हवे आहे ते सांगत आहे. शेवटी तुमची इच्छा आहे, जर तुम्हाला पेशंटचे भविष्य काय आहे हे जर स्वीकारला असाल तर पाईप आम्ही टाकणार नाही. पण तुम्ही तसे लिहून द्यायला हवे. मग तो व्यक्ती कोणालातरी फोन लावून सद्य परिस्थिती सांगत होते. तितक्यात आत मधील त्यांच्या स्टाफ मधील एका व्यक्तीने धावत येऊन एका पेशंटची तब्येत थोडी खराब झाली आहे असे सांगितले आणि त्या डॉक्टर आतमध्ये ताबडतोब निघून गेल्या.
तितक्यात मी शेजारी उभे असणाऱ्या त्या सिनियर डॉक्टरांना विचारले की, _ _ _ _ भाई नावाच्या पेशंटची सध्या तब्येत कशी आहे? तर ते म्हटले की, आताच ज्या डॉक्टर मॅडम होत्या त्या आतमध्ये पेशंट पाहण्यासाठी गेल्या आहेत, मला अपडेट देतील त्यानंतर मी पेशंटची तब्येत कशी आहे ते सांगतो. आम्ही बोलत असताना एक शिकावू डॉक्टर पी.पी.ई. किट घालून गडबडीत आल्या आणि त्या सिनियर डॉक्टरांना म्हणाल्या की, खालच्या वॉर्ड मध्ये एक पेशंट आहे त्यांचा पल्स रेट ..इतका आहे, ऑक्सिजन ..इतका आहे, त्यांना थोडासा त्रास जाणवत आहे तुम्ही पेशंट पाहायला याल का? तेव्हा ते सर विचारले की, कोणत्या वॉर्ड मध्ये आहे पेशंट? तर त्या सांगण्यात दोन वेळा गोंधळल्या, पण ते सर अगदी शांत पणाने तिला समजावून घेत, ठीक आहे मी येतो म्हटले. त्या डॉक्टर माझ्या समोरून जात होत्या. मी मनोमन त्यांचे कौतुक केले आणि त्या करत असलेल्या धाडसी कामाबद्दल कौतुक वाटले.
लगेच तेथील सेक्युरिटी आले आणि मला म्हटले की, तुमची वेळ संपली आहे तुम्ही जा. मी त्यांना म्हटलो की, डॉक्टर मला अजून भेटले नाहीत. तेव्हा ते म्हटले की, तुम्ही खाली जा, ते फ्री झाल्यावर तुम्हाला फोन येईल.
शितलनाथ आणि भाईंची मुलगी मी काय सांगतो याकडे लक्ष ठेवून होते.पण मी त्यांना वरती काय झाले ते सांगितले. आम्ही फोनची वाट पाहत होतो त्यामुळे आमच्या तिघांच्या गप्पा चालू होत्या. ॲम्बुलन्स येत होत्या आणि बेड शिल्लक नाहीत म्हणून परत जात होत्या. नातलंगाची धावपळ चालू होती. एक ॲम्बुलन्स आली आणि त्याचा दरवाजा उघडा केला. लांबून आम्हाला दिसले की, एक आजोबा निवांत ऑक्सिजन घेत डोळे उघडून इकडे तिकडे पाहत आहेत. मी भाईच्या मुलीला म्हटले की, हे जर माझ्या ओळखीचे असते तर, मी यांना ” चला, उठा येथे काय करत आहात?” म्हटलो असतो. तेव्हा भाईंची मुलगी खूप हसत होती. तिला मी मुद्दाम काही तरी सांगून हसवत होतो. कारण ती खूप दिवसापासून मानसिक ताण तणावात होती. तिचे हे दुःख हलके करण्याचा माझा प्रयत्न होता. लगेच तिने सांगितले की, तुम्ही वर गेला होता तेव्हा,थोडसे पुढे जाऊन उजवीकडे वळला असता तर तुम्हाला काचेतून पप्पा दिसले असते. मी म्हटलो की, जर मला भाई दिसला असता तर खूप बरे झाले असते. मी भाईला हातवारे करून सांगितले असते की, “भाई उठ तू, येथे किती दिवस राहणार आहेस? चल उठ..लवकर बरा हो…घाबरु नको..आम्ही तुझ्या सोबत आहोत.” भाई भेटला नाही याची खंत लागून राहिली होती मला.
आमच्या गप्पा चालू होत्या तितक्यात मनीष पांडे सर एका नामांकित कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी त्या कोविड सेंटर मधून येत होते. ते फोर व्हीलर मध्ये जाऊन बसले. आम्ही कुतूहलाने बघत होतो. त्यांच्या सोबत शुभम सर होते. ते खूप मोठे व्यावसायिक आणि बिल्डर आहेत. आमच्याच वयाचे असल्याने आमची आणि त्यांची खूप चांगली ओळख आहे. ते इतके स्वभावाने चांगले आहेत की, कोणा सोबतही अगदी आदराने बोलत असतात. मी त्यांना एकदा म्हटलो होतो की, “तुम्ही इतके श्रीमंत असून सुद्धा तुम्ही कधीच मला घमेंडी वाटला नाहीत.” तेव्हा ते म्हटले, ज्याला पैशांची घमेंडी असते,तो माणूस म्हणून घ्यायचा लायकीचा नसतो.” ते आज मनीष पांडे यांच्या मदतीला धावून आले होते.
भाईंची तब्येत सुधारत होती डॉक्टरांनी सांगितले होते की, तो लवकर बरा होईल. थोड्या दिवसांनी समजले की, त्याची तब्येत बिघडत आहे. भाईंची मुलगी पी.पी.ई. किट घालून त्याला भेटायला गेली तेव्हा भाई खूप रडत होता आणि म्हटला की, “मी हरलो आहे आता, खूप त्रास होत आहे. झोप लागत नाही मला.” तिच्या मुलगीने फोन करून मला सांगितले. माझे डोळे भरून आले.
दुसऱ्या दिवशी मंगळवारी पहाटे ५ वाजता माझा मोबाईल खण खणला आणि शितलनाथने सांगितले की, “भाई गेला.” फोन ठेवला आणि मनोमन म्हटलो की, “का भाई? असे तू का निघून गेला?” डोळ्यातून पाणी टप टपत होते. हृदय भरून आले होते. माझ्या मित्राचा मृत्यू झाला नाही तर त्याची चीनने केलेली विषाणू द्वारे हत्या होती.
हा लेख लिहिण्याचा उद्देश कोणाला घाबरावयाचा मुळीच नाही. मला इतकेच सांगायचे आहे की, परिस्थिती खूप बिकट आहे, बेड मिळत नाहीत. त्यामुळे नेहमी सुरक्षित रहा. विनाकारण कोठे बाहेर फिरू नका. सोशल डिस्टन्स नेहमी ठेवा, सॅनिटायझर वापरा, न चुकता दररोज 2 वेळा सकाळ संध्याकाळ वाफ घ्या. कोणतेही दुखणे किंवा आजार अंगावर काढू नका, ताबडतोब डॉक्टरांना दाखवा. जरी पॉझिटिव्ह आला तरी घाबरून जाऊ नका. योग्य उपचाराने हा रोग लवकर बरा होतो. डॉक्टर लोक अपार कष्ट घेत, पेशंटला बरे करत आहेत. भाई गेला कारण, तो घाबरला होता. मनाने खंबीर रहा आणि या रोगाला आपल्या शरीरातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवा.
कोणी शेजारी किंवा ओळखीचा माणूस जर पॉझिटिव्ह सापडला तर त्यांची फोन वरून चौकशी करा, त्यांना काही हवे असेल किंवा मदत पाहिजे असेल तर मदत करा. त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रोत्साहन द्या. भाईंचे पै पाहुणे खूप होते, त्याच्या घरी नेहमी पाहुण्यांची वर्दळ असायची पण, जेव्हा तो हॉस्पिटल मध्ये होता त्यावेळी फक्त त्याची मुलगी धडपड करत होती. या बिकट प्रसंगी पाहुण्यांनी पाठ फिरवली होती.
आम्ही राहत असलेल्या अपार्टमेंट मध्ये आमचे मित्र आय.सी.यू. मध्ये होते. त्यांच्या घरी वहिनी आणि छोटीसी मुलगी दोघीच होत्या. त्या वहिनींना ताप येत होता त्यावेळी त्यांच्या समोर राहत असलेल्या सरांनी त्यांना बाईक वरून ताबडतोब डॉक्टरांना दाखवले. माणूस आहोत माणुसकी कधीच सोडू नका. वेळ प्रत्येकाला येते. जर आपल्याला मदत हवी असेल तर दुसऱ्याला मदत करायला शिका.

लेखन ~ श्री. सनी चंद्रकांत कुंभार.

Previous article
Next article
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular