Homeसंपादकीयमहाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील झंझावात !

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील झंझावात !

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास आणि भविष्यातील झंझावात!

(१) वयाची पासष्टी गाठली असताना मी जेंव्हा मागील काही राजकीय घडामोडी अभ्यासतो तेंव्हा मला त्या पार्श्वभूमीवर मा. राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हाच पक्ष महाराष्ट्रात नवनिर्माणाची क्रांती करेल असे वाटते. ते तसे का वाटते त्याबद्दलचा माझा हा लेख!

(२) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या नावात मधोमध असलेला नवनिर्माण हा शब्द विशेष भावतो. मनुष्याला निसर्गाने नवनिर्माणाची एक विशेष प्रेरणा व बुद्धी दिली आहे. त्यामुळे तो निसर्गाची मूळ रचना व मूळ व्यवस्था (विज्ञान) यात नैसर्गिक प्रेरणेने सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत असतो. मग या सुधारणेचा विषय कोणताही असो. तंत्रज्ञान, कला, क्रीडा, कायदा व त्याचबरोबर देव व धर्म असे अनेक विषय आहेत जे मनुष्याने केलेल्या नवनिर्माणाचा भाग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून नवनिर्माणच केले. त्या स्वराज्य स्थापनेनंतर बऱ्याच घडामोडी मराठी भूमीत झाल्या.

(३) या ऐतिहासिक कालखंडात अलिकडच्या काळात घडलेले एक नवनिर्माण ठळकपणे माझ्या दृष्टीस पडते ते म्हणजे मनसे पक्षाची स्थापना! मध्यभागी असलेले शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे आणि दोन्ही बाजूला शिवसेनेचे दोन वारसदार उध्दवजी ठाकरे व राजसाहेब ठाकरे! पण सख्खे नाते वजनाला भारी पडले व दुसऱ्या वारसदाराला बाजूला व्हावे लागले आणि मग जन्म झाला दुसऱ्या वारसदाराच्या म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या सेनेचा जिचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जी दुसरी सेना दिनांक ९ मार्च २००६ रोजी जन्माला आली. आज उध्दवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय काँग्रेस या दोन पक्षांबरोबर आघाडी करून महाराष्ट्रात सत्तेवर आहे तर मा. राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) तिच्या स्थापनेनंतर १५ वर्षे होऊनही सत्तेबाहेर आहे. अजूनही या पक्षाचा खडतर प्रवास, खडतर परीक्षा सुरूच आहे. यशापयशाची पर्वा न करता राजसाहेब ठाकरे यांच्या कणखर, खंबीर नेतृत्वाखाली या पक्षाचा प्रवास सत्तेच्या दिशेने जोमाने सुरू आहे.

(४) राजकारणापासून स्वतःला सतत अलिप्त ठेवणारा मी या मनसे पक्षाकडे कसा आकर्षित झालो हा इतिहासही रोमांचकारक आहे. मनसे संताप मोर्चाचा एक क्षण ज्याने मला मनसेकडे आकर्षित केले व त्या पक्षाला मनापासून घट्ट चिकटून ठेवले. प्रभादेवी-परळ रेल्वे पूलावर मागे २३ माणसे मेली आणि सरकारला जाब विचारण्यासाठी चर्चगेट स्टेशनवर राजसाहेबांनी एक प्रचंड मोठा मनसे संताप मोर्चा काढला. त्यावेळी केलेल्या भाषणात मा. राज ठाकरे काय म्हणाले हे लोक विसरले. त्या संताप मोर्चाने इतिहास घडवला. सरकार सरळ झाले आणि तिथे मजबूत रूंद पूल बांधला गेला. इतकेच नव्हे तर प्रभादेवी-परळ स्थानकांवरील गर्दीला आवर घालण्यासाठी परळ स्टेशन पासून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुरू झाल्या. हे लोक विसरले.

(५) त्या काळात मी मा. राजसाहेब ठाकरे यांची डोंबिवली जिमखान्यात वरिष्ठ नागरिक सभेत भेट घेतली व त्यांना एक निवेदन दिले. त्यावेळी धाडसाने दोन शब्द बोलून त्यांचे लक्ष वेधले तेंव्हा त्यांनी मला जवळ बोलवून घेतले व मला त्यांच्यासोबत मनसोक्त फोटो काढू दिले. ज्या राजसाहेबांचे शिवाजी पार्क मैदानावरील मनसे पक्ष स्थापनेनंतरचे पहिले भाषण मी मैदानात बसून ऐकले त्या राजसाहेबांनी मला जवळ बोलवून घेतले हा माझ्या आयुष्यातील दुर्मिळ क्षण मी कधीही विसरू शकणार नाही.

(६) मनसेचा झेंडा पक्ष स्थापनेच्या वेळी व नंतर पुढे काही काळ एक रंगी नव्हे तर चार रंगाचा म्हणजे निळा, पांढरा, भगवा व हिरवा असा चौरंगी होता. त्या पूर्वीच्या झेंड्याखाली अनेक जाती धर्माच्या सर्व मराठी माणसांना मराठी माणूस म्हणून एकत्र आणण्याचा राजसाहेबांनी प्रयत्न केला. पण जात इतकी घट्ट चिकटलीय लोकांच्या मनाला की ती त्यांच्या मनातून जाता जात नाही. तरीही मनसेच्या पूर्वीच्या झेंड्यात मध्यभागी भगवा रंगच मोठ्या आकाराचा होता हे महत्त्वाचे! त्या भगव्याने इतर रंगांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. पण जातीपातीला घट्ट चिकटून बसलेल्या लोकांनी आपआपले रंग उधळत मराठी माणूस या शब्दाला सोडले पण त्यांची जात सोडली नाही. म्हणून तर मनसेने पुढे हिंदुत्वाचा भगवा झेंडा शिवमुद्रेसह घेतला. भरकटलेल्या लोकांप्रमाणे मा. राजसाहेबांच्या अनेक भूमिका नसतात तर त्यांनी घेतलेल्या भूमिका ठाम असतात. दुर्दैव हे की त्या भूमिका लोकांना कळत नाहीत. पण कळतील हे नक्की आणि मग मात्र महाराष्ट्रात नवनिर्माणाला कोणी अडवू शकणार नाही.

(७) माझ्या मनावर मा. राजसाहेब ठाकरे या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची छाप पडली याला बहुधा माझा स्वभाव कारणीभूत असावा. मला खरंच रोखठोक डॕशिंग नेते आवडतात. मग लोहस्त्री श्रीमती इंदिरा गांधी असोत की शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे असोत. हे दोन्हीही महान नेते आज हयात नाहीत. मग मी आता कोणाला फॉलो करायचे हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला तेंव्हा या नेत्यांच्या डॕशिंगपणाशी साम्य असलेला व सद्या हयात असलेला एकच नेता मला जवळचा वाटला व तो नेता म्हणजे मनसे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे! मार्गात अनेक संकटे आली, सुरूवातीचे यश सोडले तर बरेच पराभव वाट्याला आले, ते पराभव पचवताना अनेकांच्या उलटसुलट टीकेला, आरोपांना सामोरे जावे लागले. पण या सर्वांना आडवे करून हा नेता ध्येयाच्या दिशेने ठामपणे उभा राहून आपला कणखर बाणा दाखवतो हेच तर माझ्यासाठी मोठे आश्चर्य आहे. मी तर खूप छोटा माणूस आहे. पण मी कुठेतरी स्वतःलाच राजसाहेबांत बघत असतो. म्हणून तर मी या नेत्याचा मनस्वी चाहता आहे. पण ही तर माझी वैयक्तिक बाब झाली. पण खरं तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब म्हणून मला हाच नेता समोर दिसतो हे प्रमुख कारण आहे.

(८).मराठी माणूस हा हा मनसेचा मूलभूत मुद्दा व मराठी संस्कृती आणि हिंदुत्व (हिंदू संस्कृती) एकमेकांशी निगडीत असल्याने हिंदुत्वाचा मुद्दा मनसेला जवळ! मराठीच्या मुद्यावर आक्रमक होऊन मागे मनसेने त्या अॕमेझॉन कंपनीला झुकवलेच! मराठी माणूस मराठी भाषेसाठीच काय पण मराठी समाजाच्या हितासाठी असा आक्रमक झाल्याशिवाय मराठी माणसाचे काही खरे नाही हे मला मनसे पटले आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मनसेचे महाराष्ट्र सैनिक असे आक्रमक होऊन लढतानाचे हे चित्र म्हणजे मी शाळा कॉलेजात शिक्षण घेत असतानाच्या त्या काळातील बाळासाहेबांच्या शिवसेनेत सक्रिय असलेल्या जुन्या जाणत्या शिवसैनिकांचे चित्र! काळ बदलला आणि आता बाळासाहेबांच्या जागी राजसाहेब आले व जुन्या शिवसैनिकांच्या जागी मनसेचे महाराष्ट्र सैनिक आले.

(९) महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्व विभागाला फार मोठी अवकळा आली आहे. हा विभाग म्हणे करोना संकटात सापडालाय. तशी बातमीच दिनांक २६ अॉक्टोबर, २०२० च्या लोकसत्तेत छापून आलीय. या विभागाकडे महाराष्ट्रातील ३७५ वारसावास्तूंच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी आहे. त्यात शिवरायांचे गड, किल्ले सुद्धा आले. पण दुर्दैवाने हा विभाग अनुत्पादित म्हणून सरकारकडून दुर्लक्षित आहे. आर्थिक पाठबळ व कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ पुरवले नाही तर हा विभाग कसला महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणार? खरं तर महाराष्ट्रातील हे गड, किल्लेच शिवरायांची स्मारके म्हणून जगापुढे आणायला हवीत. पण त्यासाठी या पुरातत्व विभागाला आर्थिक पाठबळ व कर्मचाऱ्यांचे मोठे मनुष्यबळ पुरवून चांगलेच कामाला लावले पाहिजे. माझ्या मनात येते की आज मा. राजसाहेब ठाकरे यांच्या हातात जर पूर्ण सत्ता असती तर हा पुरातत्व विभाग असा कोपऱ्यात पडला असता का? शिवरायांच्या गड, किल्यांचे संवर्धन मागे राहिले असते का? महाराष्ट्राच्या इतिहासाचा वारसाच जपला नाही तर त्याचे नवनिर्माण काय होणार? इथे राजसाहेबच पूर्ण सत्तेवर पाहिजेत!

(१०) हिंदुत्वाचा अर्थ व्यापक आहे. हिंदू धर्मीय पूजा पद्धती किंवा कर्मकांडाशी हिंदुत्वाला जोडून त्या व्यापक अर्थाला संकुचित करू नका, असे मागे दसरा मेळाव्यात भाषण करताना सरसंघचालक श्री. मोहन भागवत म्हणाले. आणि हे खरेही आहे. सृष्टी विविधतेत समरसता व याच समरसतेतून एकता, तसेच वसुधैव कुटुंबकम् या हिंदुत्वाच्या संकल्पना व्यापक व वैज्ञानिक आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या नवनिर्माण शब्दाचा अर्थ संकुचित नसून फार व्यापक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मागे रविवार दिनांक २५.१०.२०२० च्या लोकसत्ता लोकरंग मध्ये महाराष्ट्रातील प्रबोधनः एक दृष्टिक्षेप हा डॉ. सदानंद मोरे यांचा प्रदीर्घ लेख मी वाचला होता. या लेखात युरोपमधील प्राचीन ग्रीक परंपरेचा पुनर्जन्म अरबांच्या माध्यमातून कसा झाला म्हणजे मुळात ग्रीक भाषेतल्या पण युरोपसाठी विस्मृतीत गेलेल्या ज्ञानभांडाराचा अरबांनी कसा परिचय करून घेतला पण अरबांना इस्लामची धार्मिक चौकट ओलांडता न आल्याने दमछाक होऊन त्यांची प्रगती कशी कुंठित झाली व मग युरोपियन विद्वानांनी त्याच ग्रीक ज्ञानभांडारातील ग्राह्यांश ग्रहण करून ते जुनेच ज्ञान पुनर्ज्ञात करून घेत वैज्ञानिक प्रगती कशी साध्य केली अर्थात युरोपियन लोकांनी ग्रीक वारशाचे पुनरूज्जीवन कसे केले या इतिहासाचे या लेखामुळे दर्शन झाले. ही प्रगती युरोपियन लोकांनी जुन्याच ग्रीक ज्ञानाच्या केलेल्या पुनर्निर्माणामुळे शक्य झाली. या पुनर्निर्माणासाठी त्यांनी स्वतःच्या धार्मिक चौकटीशी संघर्ष केला व ती चौकट ओलांडली. त्या काळात इंग्रजांनी इतर युरोपियन लोकांशी संघर्ष करून त्यांनाही हरवले व मग ते जगाचे राज्यकर्ते झाले. यातून हाच अर्थ घ्यायचा की तुम्हाला जर जुन्याचे सोने करायचे असेल तर तुम्हाला जुनी चौकट ओलांडावी लागेल म्हणजे तुम्हाला त्या जुन्या चौकटीचे पुनर्निर्माण अर्थात नवनिर्माण करावे लागेल. मला मा. राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षातील नवर्निर्माण या शब्दात खूप सखोल अर्थ आहे याची जाणीव झालेली आहे. हा अर्थ फक्त मराठी भाषेपुरताच संकुचित करून चालणार नाही. महाराष्ट्राचा इतिहास खूप महान आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या इतिहासाचा तळपता सूर्य! पण स्वातंत्र्योत्तर काळात या महान इतिहासाचे कालानुरूप नवर्निर्माण झालेय का? हा प्रश्न फक्त शिवरायांच्या गड, किल्ल्यांच्या रक्षण, संवर्धनाचाच नाही तर त्या महान इतिहासाचे नवर्निर्माण करण्याचा आहे. हे महान कार्य करण्यासाठी तेवढाच चौफेर व सखोल अभ्यास आवश्यक आहे. तो अभ्यास मला राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांत दिसतो. हिंदुत्व व नवनिर्माण या शब्दांचा व्यापक अर्थ लक्षात घेतल्याशिवाय राजसाहेबांचे व त्यांच्या मनसे पक्षाचे राजकारण लक्षात येणार नाही.

(११) मला राजकारणात करियर करायचे नाही. मला ना पैशाची हाव ना सत्ता गाजवायची हौस!पण तरीही एक महाराष्ट्र सैनिक म्हणून मी या मनसे पक्षात आहे ते फक्त मा. राजसाहेब ठाकरे या एकाच व्यक्तीमत्वासाठी! माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले हे व्यक्तीमत्व! बोलण्याची तीच शैली आणि वागण्यातला तोच रूबाब! खरं तर राजसाहेब कुठे आणि मी कुठे पण का जाणो पण मला हे व्यक्तीमत्व भावते. बापरे, पक्ष स्थापन केल्यापासून सुरूवातीचे काही काळापुरतेचे यश सोडले तर नंतर किती पडझड झाली या पक्षात! किती आले आणि किती गेले, पण हा नेता जराही डगमगला नाही, नाउमेद झाला नाही. कणखर, खंबीर नेता! या नेत्याची दिशा निश्चित, विचार पक्के व ठाम मग काहीही होवो! म्हणून तर मला हे व्यक्तीमत्व आवडते. शेवटी हे राजकारण आहे. इथे अनेक प्रयोग करावे लागतात. आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा त्या त्या परिस्थितीनुसार तह केले पण वेळ आली की नंतर हे तह मोडूनही काढले. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनीही अगोदर मराठी माणूस हा प्रमुख मुद्दा घेऊन नंतर राष्ट्रीय पातळीवर शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा मराठीच्या मुद्याला जोडला. राजसाहेबांनीही तेच केले मग त्यांच्यावर टीका कशासाठी? मा. बाळासाहेबांनी स्वतःचा बाणा जपत भाजपशी युती केली. राजकारणात असे प्रयोग होतच असतात. इतर पक्षांनी असे प्रयोग केले तर चालतात मग राजसाहेबांनी असे प्रयोग करूच नयेत काय? शेवटी यशापयश हे तसे अनेक घटकांवर अवलंबून असते. मला राजसाहेबांचे “यशाला अनेक बाप असतात तर पराभवाला अनेक सल्लागार” हे वाक्य नेहमी मनापासून आवडते. करारीपणा, ठामपणा, अपयशाने जराही खचून न जाणे, प्रयत्नात सातत्य ठेवणे, कोणाची साथ मिळो अगर न मिळो दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर पुढे जाणे, धैर्य, धाडस हे राजसाहेबांचे गुण मला फार आवडतात. त्यांच्या याच गुणांमुळे जर मी त्यांचा चाहता आहे तर मग साहजिकच त्यांच्या मनसे पक्षाचा मी महाराष्ट्र सैनिक असणार हे ओघाओघाने आलेच.

(१२) दिनांक १४ जून हा मा. राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस! या दिवशी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर प्रेम व विश्वास असणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांचा जनसागर लोटतो. राजसाहेबांत मी दोन गोष्टी पाहतो. एक म्हणजे राजसाहेब हेच महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत आणि दोन म्हणजे राजसाहेब हे मा. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब आहेत! या दोन्हीही गोष्टी ज्या नेत्यात एकवटल्या आहेत तो एकमेव नेता म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे! महाराष्ट्राचा बुलंद आवाज या वाक्यात येतो तो मराठी माणूस आणि मा. बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिबिंब या वाक्यात येते ते हिंदुत्व! माझे हे विश्लेषण कोणाला पटेल अगर न पटेल मला त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मला या दोन्ही गोष्टी राजसाहेब ठाकरे यांच्यात एकत्र दिसतात हे खरे आहे. दूरदृष्टी असणारा अत्यंत अभ्यासू व तितकाच धाडसी, चाणाक्ष नेता म्हणजे मा. राजसाहेब ठाकरे!

(१३) मनसे म्हणजे सत्तेची हाव नव्हे, मनसे म्हणजे तात्पुरती सोय नव्हे! इथे नाराजीला वाव नसे, इथे स्वार्थाला भाव नसे! मनसे ही एक अखंड चालणारी चळवळ आहे. मनसे ही सत्तेसाठी लाचार होणारी वळवळ नव्हे. मनसे म्हणजे मनापासून, हृदयातून! राजसाहेबांवर असे हृदयातून प्रेम करणारे महाराष्ट्र सैनिक मनसेत आहेत म्हणून मनसे स्थापनेपासून गेल्या १५ वर्षांत अनेक संकटे येऊनही मनसे ठामपणे उभी आहे. मनसे पक्ष हा सत्तेसाठी हपापलेला म्हणजे सत्ता पिपासू राजकीय पक्ष नसून ती सतत चालणारी एक चळवळ आहे. तो एक धगधगता प्रवास आहे. म्हणून मी म्हणतो की, मनसे क्रांती बाकी आहे. मनसे ही क्रांतीची ज्वाळा आहे. तो कायम धगधगता अंगार आहे. तिची धग मी अनुभवत आहे. संपूर्ण क्रांतीच्या दिशेने प्रवास करताना ती धग कायम राहिलीच पाहिजे!

(१४) फक्त मराठी भाषा व फक्त मराठी माणूस या विषयावर राजकारण करणे आता कठीण आहे महाराष्ट्रात! मा. बाळासाहेबांच्या वेळची परिस्थिती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. आता मराठी माणूस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय काँग्रेस, वंचित आघाडी अशा विविध पक्षात विभागला गेलाय. देशपातळीवर नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाने भाजपला नवा सूर गवसलाय. मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेंव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी मराठी माणूस चिडलेला होता. त्या वेदनेला बाळासाहेबांनी मोठे केले. शिवाय शिवसेनेच्या स्थापनेला व प्रगतीला त्यावेळचा सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष म्हणजे इंदिरा काँग्रेस चा छुपा पाठिंबा होता. कारण काँग्रेसला कम्युनिस्ट पक्षाचे तत्कालीन वर्चस्व मुंबईतून मोडून काढायचे होते. आज मा. राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा त्यांच्या मनसे पक्षाच्या माध्यमातून उचलून धरला असला तरी त्यांना मराठीच्या मुद्याला हिंदुत्वाचा मुद्दा जोडावा लागला कारण शेवटी राजकारणात अस्तित्व टिकवणे व पुढे नेणे ही महत्त्वाची गोष्ट असते. चाणाक्ष राजसाहेबांनी ही गोष्ट वेळीच ओळखली हे महत्त्वाचे आहे.

(१५) मा. राजसाहेबांनी पुढील ग्रामपंचायत व नगरपालिका, महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टिकोनातून राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी नुकताच नाशिकचा दौरा केला. त्या दौऱ्यात त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना दिलेली रोखठोक व स्पष्ट उत्तरे त्यांचा प्रचंड मोठा आत्मविश्वास, कणखर बाणा दाखवतात. या नेत्याच्या नेतृत्वाखालील मनसे पक्षाचे भवितव्य उज्वल आहे. हा नेता मनसे पक्षाच्या माध्यमातून नवनिर्माणाची क्रांती महाराष्ट्रात करणार हे नक्की!

-ॲड.बी.एस.मोरे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular