“पैसा कमवा, आरामात राहा, आपला व्यवसाय भला की आपण असा मर्यादित विचार करू नका. आपण सार्वजनिक जीवनात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. काही चांगले काम केले पाहिजे आणि आपला अनुभव इतरांनाही कथन केला पाहिजे. त्यातून काही चांगले निष्पन्न होईल”! असा सल्ला आपल्या भारताचे सरन्यायाधीश मा. एन. व्ही. रमण यांनी सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात रविवार, दिनांक १५ अॉगष्ट, २०२१ रोजी सर्व वकिलांना दिला.
मा. सरन्यायाधीश महोदयांनी हा सल्ला आता २०२१ साली दिला असला तरी १९८८ साली वकिली सुरू केल्यापासून गेली ३३ वर्षे हेच व्रत घेऊन मी वकिली करतोय. अत्यंत गरीब गिरणी कामगार कुटुंबात जन्म झाल्याने नोकरी करीत रस्त्यावरील दिव्याखाली वरळीच्या अभ्यास गल्लीत अभ्यास करीत खडतर मेहनत घेऊन वकील झालो. अगोदरच गरिबी व त्यात पुन्हा हे समाजसेवेचे व्रत त्यामुळे इतरांच्या भल्याचा विचार डोक्यात घेऊन वकिली करायला गेलो आणि पैशाने फाटका असलेला खिसा आणखी फाटका करून बसलो.
मा. सरन्यायाधीशांचा हा सल्ला तसा माझ्या डोक्यात पूर्वीपासून होता. म्हणून तर मी काही सामाजिक संस्था जवळ केल्या व मग त्यांचा फुकटचा कायदा सल्लागार झालो. पण त्यांच्या जाहीर कार्यक्रमात मी माझे कायदेशीर सल्ले माझ्या भाषणांतून लोकांना देणे त्यांना पसंत न पडल्याने त्या संस्था चालकांनी मला त्यांच्या जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बोलावून भाषण करायची संधी देणेच बंद केले. अशा जाहीर कार्यक्रमात माझी उपस्थिती ही त्यांना अडचण, अडगळ वाटू लागली. हे जेंव्हा मला कळले तेंव्हा मी तिथून पळ काढला. यात माझे काय चुकले?
पुढे गरीब लोकांसाठी मी मुंबईत जी.पी.ओ. समोर मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू केले तर गरीब बनून श्रीमंत लोक तिथे येऊन माझा फुकट सल्ला घेऊ लागले व त्यांची कामे मात्र मला न देता दुसऱ्याच वकिलांना देऊ लागले. असे बरेच विचित्र अनुभव मला त्या केंद्रात येत गेल्याने मी ते फुकट वकिली केंद्र बंद करून टाकले. यात माझे काय चुकले?
मला शाळा, कॉलेजपासून लिखाणाची आवड आहे. शिक्षणातून मिळालेले ज्ञान व जीवनात मिळत गेलेला अनुभव मी माझ्या लिखाणातून कथन करीत असतो. हस्तलिखित लिखाणाची पुस्तके काही मला छापता आली नाहीत. म्हणून मी गेली पाच वर्षे फेसबुकवर फुकट लिखाण करतोय. त्यातून काही चांगले निष्पन्न होईल याच हेतूने हे लेखन कार्य सुरू ठेवले आहे. पण हल्ली लोकांना हे असले लिखाण आवडत नाही. हल्लीचे लोक खूप प्रॕक्टिकल झालेत. त्यांना कायदेशीर सल्ला नकोय तर प्रॕक्टिकल सल्ला हवाय. हल्लीच्या दहावी, बारावी शिकलेल्या मुलांनाही प्रॕक्टिकल काय हे चांगले कळते. त्यामुळे उदात्त हेतू मनात ठेऊन काही चांगले करायला गेलो तर खूप तोंडघशी पडायला होते. काही वेळा असे उदात्त वागणे नुसते हास्यास्पदच नाही तर धोकादायक सुद्धा होते. त्यामुळे हल्ली मी सार्वजनिक जीवनातील माझी सक्रियता कमी केलीय. यात माझे काय चुकले?
आणि हो, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खूप खडतर मेहनत घेऊन मी वकील झालोय. पण हल्ली लोक इतके हुशार झालेत की त्यांना मी कायदेशीर मार्गदर्शन करू लागलो तर तेच मला प्रॕक्टिकल सल्ला देतात व वकिलापेक्षा त्यांनाच कायदा जास्त कळतोय हे अप्रत्यक्षपणे मलाच सुचवतात. त्यामुळे माझ्या कायद्याच्या ज्ञानाची व एकंदरीतच वकिली व्यवसायाची इज्जत कमी होते. वकिली व्यवसायाचा आब राखणे हे सुद्धा माझे कर्तव्यच आहे ना! म्हणूनच आता यापुढे आपण स्वतःहून कोणाला कायद्याचे ज्ञान शिकवायला जायचे नाही असे ठरवले आहे. खूप मेहनतीने प्राप्त केलेले माझे हे ज्ञान फुकट वाटल्याने माझ्याकडून ते इतके स्वस्त झाले की मलाच उपाशी मरायची पाळी आली. जर खरंच लोकांना कायद्याची किंमत कळली व माझ्या ज्ञानावर व प्रामाणिकपणावर विश्वास वाटला तर ते स्वतःहून माझ्याकडे अल्प का असेना पण माझी फी घेऊन येतील नाहीतर माझी मर्यादित वकिली माझ्याजवळ भली! मी फार उशिरा म्हणजे ६५ व्या वयात हा शहाणपणा शिकलो. यात माझे काय चुकले?
- ॲड.बी.एस.मोरे
मुख्यसंपादक