आज हॉस्पिटल मधला इमर्जन्सी वॉर्ड जणू रंगच खेळल्यासारखा दिसत होता. रंग खेळताना घसरून पडलेले, भांग अति झाल्याने चक्कर आलेले, रंग डोळ्यात गेलेले! काय आणि किती प्रकारचे रंगीबेरंगी पेशंट एकामागून एक येतच होते. त्यातच इतर रुटीन इमर्जन्सी म्हणजे चेस्टपेन, लेबर पेन हे चालूच होते. सकाळी वॉर्डात शिरलो होतो मध्येच कधीतरी उभ्या उभ्या कॉफी आणि सॅंडविच घेतले होते. पाच कसे वाजले कळलेच नाही. मावशींनी पाच मिनिटे पेशंट थांबवून आम्हाला चहा बिस्किटे कंपल्सरी खायला लावली. परत जे कामाला जुंपलो ते आठ वाजेपर्यंत! मग राऊंड घेतली. उद्या कॉम्पअॉफ होता म्हणून घरी जायला निघालो. आई पुरणपोळ्यांची तयारी करून माझी वाट पाहात असणार. मी घराजवळ आलो की फोन करायचा मग ती पोळ्या करायला घेणार म्हणजे ताटात गरमगरम पोळी मिळेल. मी तिला किती वेळा म्हणालो की पोळ्या करून ठेवत जा. मी आल्यावर घेईन वाढून पण ती ऐकेल तर शप्पथ.
“तू एवढे पेशंट करून दमतोस मग मी काय तुला गार पोळी वाढू? तिथे धडपणे खातोस तरी का काही?” आईचा युक्तिवाद खोडून काढणे कठीणच.
घरी जायला बस पकडावी म्हणून स्टॉपवर गेलो. रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. एक अगदीच सतराअठरा वर्षाची बाई खरतर मुलगीच म्हणायला हवी. जरा जास्तच मेकअप करून भडक रंगाची साडी नेसून ऊभी होती. तिच्या एकंदर पेहरावाकडे पाहून ती रेड लाईट एरियातून आलेली असावी हे सरावाने कळलेच. मी तिच्याकडे दुर्लक्ष करून बसची वाट बघत उभा राहिलो. पाच एक मिनिटे झाली तरी बस काही यायचे नाव घेत नव्हती. एवढ्यात ती बाई माझ्या जवळ आली.” क्या साहेब कैसा है?कितने दिनो के बाद दिखता है?”
मला मनातून थोडी भिती वाटायला लागली होती. एकतर हिला माझ्याशी बोलताना कोणी बघीतले तर काय म्हणतील ही चिंता होतीच. आता ही बाई अंगचटीस आली आणि आरडाओरडा करून पैसे मागू लागली तर काय करायचे? असाही विचार येत होता.
“क्या साहेब होळी खेला क्या? घरकु जा रहेला है क्या?”
“ए मैं तुम्हे पहचानता नही. तू जा चल” मी कसाबसा म्हणालो.
“क्या डॉक्टरसाब पहचाना नही क्या हमको. पंधरा दिन पहिले तो आई थी. आपनेईच तो मुझे डिलीवरी के लिये भेजा था. कितना अच्छेसे बात किया था. डरनेका नही सब ठीक हो जाएगा करके मुझे बोला था. याद आया क्या?”
ती असे म्हणाली आणि पंधरा दिवसांपूर्वीचा प्रसंग मला लख्ख आठवला. ती वेदनेने कळवळत होती. अंगावरची चादर रक्ताने माखली होती.प्रचंड घाबरलेली होती. हातातले काम सोडून मी तिला इमर्जन्सी वॉर्डातून लेबर रूम मध्ये घेऊन गेलो होतो. एवढ्या कोवळ्या वयात कसेकाय आईवडील लग्न करून देतात आणि ह्यांना मुलेही होतात सतरा अठराव्या वर्षी. मी तिच्याबरोबर कोणी आले होते त्यांना तिचे आईवडील समजून रागावलोही होतो.
अरे बापरे!! म्हणजे ही त्या एरियातली मुलगी आहे आणि पंधरा दिवसाची बाळंतीण आहे. आपल्या लहान बाळाला घरी ठेऊन गिर्हाईक शोधायला बाहेर पडलीय! मी अवाक् झालो होतो.
मला काय बोलावे ते कळेचना.
“अरे इतने जल्दी तुम बाहर क्यूं निकली? अभी पंधरा दिन पहिले तो तुम्हारी डिलीव्हरी हुई है. बीमार हो जाओगी तो? और बच्चेको कौन देखता है? “माझ्या डोळ्यासमोर आमच्या घरातल्या बाळंतिणी आल्या. त्यांचे किती लाड असतात आणि बाळाला तर एक मिनिट नजरेआड करत नाहीत.
“क्या करनेका साब अभी मुझे दो लोगोंके लिए कमानेका है. घर में बैठेगी तो खाने को कौन देगा?साब एक बात बोलू?
साब दो मिनिट के लिए घर को आओगे क्या? आपने मेरे बच्चेको देखाईच नही. मैं आई थी दवाखानेसे छुट्टी मिलने के बाद तुमको मिलने पर तुम नही थे. तुम बच्चे को दुवा दो की वो भी बडा होके तुम जैसा जंटलमन डॉक्टर बने. आओना साब दो मिनिट के लिये. “
मला समोरून बस येताना दिसत होती. आईचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. पण त्या निरागस मुलीला नाही म्हणून तिचा हिरमोडही करवत नव्हता. एकीकडे हिने गोड बोलून लुबाडले तर? अशी भितीही वाटत होती पण शेवटी या द्वंद्वात माझी सद्सद्विवेकबुद्धी जिंकली आणि मी तिच्या पाठी तिच्या घरी गेलोच. मी हो म्हणालो याचा तिला विलक्षण आनंद झाला होता “मैं अभी आयी “असे म्हणून ती बाहेर गेली.
मी इकडेतिकडे पाहू लागलो. तिचं घर म्हणजे एक पत्र्याची रूम होती. त्यातच पार्टिशन टाकून आतल्या बाजूला कॉट ठेवली होती. तिच्या लहान मुलाला एकटाच बाहेरच्या बाजूला जमिनीवर चादर अंथरून झोपवला होता. त्याच्या एका बाजूला चार भांडी आणि स्वैपाकाचे सामान होते. जी काही भांडी होती ती अगदी लख्ख होती. टीचभर जागा पण आहे त्यात नीटनेटकी ठेवण्याचा प्रयत्न केलेला दिसत होता. एवढ्याश्या वयातल्या आपल्याकडच्या मुली अभ्यासात रमून भविष्याची स्वप्ने रंगवण्यात मग्न असतात आणि ही आपल्या पोटाचे खळगे भरण्यासाठी कायकाय पणाला लावत होती. तिथेच एका बाजूला आरसा आणि स्वस्तातले मेकअपचे सामान ठेवले होते.
मी तिकडे पाहात होतो तेवढ्यात ती हातात कोल्ड्रिंक ची बाटली घेऊन आली.
” ले लो साहब एकदम थंडा है. तुमको मेरे हाथ का बनाया चलेगा नई ऐसा सोचके मै ये लायी.”
“अरे इसकी क्या जरुरत थी?”
“ले लो ना साब मेरे घर पहली बार आए करके लाई मैं. “
मला तिच्यावर चांगले संस्कार झालेले जाणवत होते. पण मग ही इथे कशी आली?
मी तिला विचारल्यावर तिचा चेहरा गोरामोरा झाला.” जाने दो ना साहब अभी वो सब मैं भूल बी गयी हूं. मा मर गयी और बाप को दारू पिने के लिये पैसा कम पड गया. वोच मुझे इधर लेके आया. अच्छा कपडा मिलेगा, खानेको मिलेगा ऐसा बोलके गया. वापस कभी आया ही नै.
तबसे ना साहब मै इधरीच रहती हूं.”
काय बोलावे, तिला काय धीर द्यावा मला कळेना. विषय बदलायचा म्हणून म्हणालो.” रोज ये ऐसा मेकप तुम क्यूं करती हो? तुम तो ऐसेभी अच्छी दिखती हो.”
” क्या करने का साहब, मेकप नही करूंगी तो मेरी छोटी उम्र समझ आती है. इधर की घरवाली दिदी ने मुझे ये सब सिखाया. तुम लोग अपनी खुशी के लिये होली खेलते हो. एकदुसरे के चेहरे पे रंग लगाते हो और हम जैसे लोग पेट भरने के लिए रोज ये रंग लगाते रहते है. हमारे लिये तो हररोज होली है.”
माझ्या डोळ्यातले पाणी कसेबसे लपवत मी तिच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवला. खिशात सापडतील तेवढे पैसे त्या बाळाजवळ ठेवले आणि झटकन तिथून बाहेर पडलो.
” साहब पैसे मत देना मैने तो दुवा देने के लिये बुलाया था “असे म्हणत ती माझ्यामागे धावली. मी एकदाही मागे वळून न पहाता झपाटय़ाने तिथून बसस्टॉपवर आलो.
आजच्या होळीमुळे माझ्या चेहऱ्यावरचा रंग पार उडाला होता.
डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक
[…] रंग […]
Khup chan