चैत्राची पालवी फुटायला लागली होती.पांदीचा पांगिरा रसरसून लाल झाला होता.चाफ्याचा पांढरा फटक सडा शिवाराच्या माथी झळकत होता.गरम वार्याचे झोत उसासे टाकत होते.पांदीच्या फुफाट्यात गुणाजीच्या पायांनी वेग घेतला होता.कोर्टाने परत पुढली तारीख दिली होती.दावणीच्या बैलांना पाणी दावायचं राहिलं म्हणून जीव कासावीस होत होता.त्याच्या बापाच्या अंगावरून नुकतचं वारं गेलं होतं.एका अंगाला लकवा मारला.गुणाजीच्या पायाने विचाराचा वेग घेतला होता.
आज बाप नीट असता तर ..!! जित्राबं उघड्यावं पडली नसती..!!कसा का होईना बापाला जनावराचा नाद मोठा..गुरांचं सारं बैजवार करायचा…!!बापाच्या सयीनं त्याला भडभडून आलं .चढावरनं घराकडं जायच्या वाटंला त्यानं तिकट्यावरनं बगल दिली.झपाझप चालीखाली परड्याची वाट धरली.गुरांच्या ओढीनं गुणाजी गाईगत परड्याकडं ओढला गेला.जनावरांना पाणी दावून घरात शिरणार तोच बाजं वर पडलेल्या बापाच्या तोंडावर काय झालं तारखंचं ??म्हणून मोठा प्रश्न पाहिला…!!गुणाजीच्या नजरं वरनंचं बापानं ताडलं आज पण काय नाय..!!
गुणाजीच्या बापावर म्हंजी सदबा वर धाकल्या बहिणीनीनं जमिन वाटपाचा खटला भरला होता.भाऊ बहिणीचा एकमेकांच्या वर लय जीव सदबा नं माथाडीचा नंबर इकून बहिणीचं लगीन जांभूळगावच्या गिरणीवाल्यासंगट लावलं होतं.बहिणीला सदबाची कारभारीण लाडीबाई म्हणायची .हौसंनी सदबा पण तेच म्हणायचा.बाळंतपणानंतर बहीण काय सदबाच्या संसाराला निमताळी झाली नव्हती.लय वर्सानी सदबाला लेक झाला म्हणून सोन्याचं पान हरखून घेऊन आली होती.पण,कुठं तरी माशी शिंकली..लाडीबाईचा स्वभाव पहिल्यापासनं साधा..!!दिर सासरा ह्यांच्या धाकात संसार केला होता..!!गपगुमान राबायची..पोटची पोरं हाताला आली आणि आजोळाच्या हिश्शयात वाटा मागायला लागली लाडीबाईनं हाता पाया पडून नगं सांगितलं .तरी पोरांनी ऐकलं नाही.कोर्टाच्या कागदावर अंगठा द्यायला भाग पाडलं लाडीबाई दोन दिवस जेवली नाय...!!माहेराकडची वाट पाठीच्या कण्यासकट मोडली गेली का काय असं वाटू लागलं...!!
सदबा ला लकवा मारला होता .तवा जीव मुठीत धरून लाडीबाई बघायला गेली..वाटलं भाऊ तोंड फिरवल..इतक्या दिसानी बहिण बघायला आली म्हणून सदबा गहिवरला..तोंडाची लाळ सावरत ये म्हणाला..सदबाच्या कारभारणीनं पण आजादुजापणा केला न्हायी.धन्याला लकवा मारला होता तरी लाडीबाईला पोळ्याचा स्वयंपाक केला.लाडीबाईनं धुसफुसलेल्या भाच्याच्या गुणाजी च्या तोंडावरून हात फिरवला .पोरगं मोठं झालं होतं.जरा घुश्श्यात गुणाजी म्हणाला "आत्या काय गं कमी केलं तुला...ती कोर्टाची पायरी चढायला लावलीस..!!इन मीन अडीच एकरातला भावाचा संसार बघवला नाय व्हय...!!
गुणाजीला घशातनचं आवाज काढत सदबांनं दाबलं…!!लाडीबाईला आभाळ फाटल्यागत झालं …!!सदबा बोलला होता. एकदा कर्ज जमिनीवरचं कर्ज फिटलं कि तुला तुझा हिस्सा देतो..!!पण,भाच्यांना घाई झाली होती..तिथून जी लाडीबाई सासरी आली ती काय माहेराकडं फिरकली न्हवती..भावजयीकडनं ओटी भरून घ्यायला पण तीला लाजिरवाणं वाटलं.अधनंमधनं ह्याच्या त्याच्याकडून भावाची चौकशी करायची..!!
कोर्टाचा निकाल अखेर लागला जमिनीची वाटणी बहिण भावात समसमान ठरली..!!लाडीबाईच्या लेकांनी गाडी करून आईला आजोळाला न्यायचं ठरवलं.लाडीबाई जीवाच्या कराराने गाडीत बसली.माहेराची वाट तीला पहिल्यांदा खायला ऊठत होती.लेकांनी गाडी थेट हिश्यात नेली.पाच पंच बोलावले.बाजंवरून सदबाला गुणाजी नं शेतावर आणलं.सदबाच्या कारभारणीच्या डोळ्याला सारखा पदर जात होता.लाडीबाईची नजर जमिनीकडंच होती.लेकांच्या तोंडावर हसू होतं तर लाडीबाईच्या तोंडावर विशाद.बाजंवरच्या सदबांन लाडे …बरी हाय का म्हणून आवाज दिला..!!लाडीबायच्या काळजाचं पाणी झालं…!!एवढ्या तंट्यात भावजयीनं लाडीबायचं पाय धरलं…!!
लाडीबाईच्या लेकांनी सदबाला सांगितलं..मामा जमिनीतला हिस्सा आमचा आमला मिळाला आता तुमच्यावर उपकार म्हणून घराची वाटणी मागत नाय..पण परतावा म्हणून विहिरीकडची वाटणी आम्हाला द्या…!! आता मात्र लाडीबाईला राहवलं नाय…!!पोरांसमोर दबलेला आवाज माहेराच्या मातीत उफाळून आला…!! लाडीबाई चिडून म्हणाली ‘लाज वाटती माझ्या कुशीची,असली ऐतखाऊ औलाद जन्माला घातली.आरं खाल्लं तर माझ्या बापाचा वंशच खाणार होता जिनगानी..काय बिघडलं असतं..माझ्या भावाचा संसार भिकंला लावायचाय व्हय..!! लाडीबाईला रागाच्या भरात शरीराचा तोल सांभाळता आला नाही .गुणाजीनी पुढं जाऊन आत्याला आधार दिला .सदबाला हुंदका फुटला.आज लाडीबाई जीव एकवटून बोलली लेकांना ‘तुमच्या आज्या बापाची दिनरात सेवा केली,त्याची बिदागी म्हणून तरी भावाचा हिस्सा सोडा…!! माझं माहेरपण जितं ठेवा…!! रागाच्या भरात लाडीबाईनं थोरल्याच्या हातातला कोर्टाचा निकाल फाडला..!!लेकांना मेल्याहून मेल्यागत झालं..मामाच्या पायापडून चूक झाली म्हणून भाचं बोललं…!!लाडीबाईच्या रडव्या मुखावर समाधान पसरलं..!!
सदबाच्या कारभारणीनं लगबगीने घराची वाट धरली...मागल्या अर्धवट राहिलेल्या लाडीबाईंच्या ओटीचं ताट पुन्हा भरायचं होतं...!!
-सचिन शिवाजीराव खोपडे देशमुख .
मुख्यसंपादक
डोळे पाणावले सचिन भाऊ शेवट वाचताना.
संवेदनशील व्यक्तिच अश्याप्रकारे व्यक्त होऊ शकतो.शब्दावर असलेली तुझी पकड़ वाचकास त्या चित्रफीतिची साक्षात अनुभूति करुन जाते.
अजुनही लालसेपलीकडे नाती जिवंत आहेत ह्या गोष्ठिची सकारात्मक जानीव यातून झाल्याशिवाय राहत नाही .आजच्या व्यवहारी जीवनात बहिन,आत्या व नणंद ही कलाकृति नकारात्मक दाखावणाऱ्या लेखकाना ,अशी सुद्धा बहिन असते व तिच्या भावना देखिल प्रामाणिक असतात हे संवेदनशीलपने मांडल्याबद्दल खुप खुप धन्यवाद…….
बंधुराज आपण केवळ ऐतिहासिक व कवित्व पर्यंतच मर्यादित नसून आपल्या लेखनशैलीला आजून भरपूर रंग आहेत हे यशस्वीरित्या प्रदर्शित केल्या बद्दल पुन्हा धन्यवाद .खूप मोठे व्हा….
छान आहे कथा..भावनिक रंग दिला आहे