Homeमुक्त- व्यासपीठवडिलधारी व्हा…

वडिलधारी व्हा…

   आज १ जून तारीख आहे. तसं पाहायला गेलं तर आजच्या दिवशी बहुतेक जणांचे वाढदिवस असतात त्याचे मुख्य कारण आपल्याला माहीत आहे का ?

पूर्वी शाळा १ जूनला सुरू व्हायची, त्यामुळे बऱ्याच आई वडिलांना आपल्या लेकरांची जन्मतारीख लक्षात नसायची. शिवाय त्यावेळी आता जसे वाढदिवस साजरे होतात तसे व्हायचे नाहीत. आता तर या जमान्यात काही विचारायची सोय नाही. वाढदिवसाला आणलेला केक पोटात कमी आणि तोंडालाच जास्त फासला जातो.
बरं असो…तर पूर्वीच्या काळी आपल्या अपत्याला शाळेत टाकताना जन्मतारीख माहीत नसल्याने ज्या दिवशी शाळेत टाकले जायचे तीच जन्मतारीख शिक्षकही त्यांच्याकडे असलेल्या चोपडीत लिहून ठेवायचे. मग हीच तारीख कैक लेकरांची जन्मतारीख बनून पुढे प्रत्येक शैक्षणिक सदरात यायची.

हा विषय मांडण्याचा एकच मुद्दा म्हणजे, आज आपल्या अवतीभवती असे अनेक वृद्ध माणसे किंवा आपलेच आई वडील यांची जन्मतारीख आपल्याला माहीत नसते.
त्यांचा वाढदिवस कधीच साजरा केला जात नाही. आपला वाढदिवस साजरा केला जात नाही याचं दुःख त्यांना नसतंच. आपल्या मुला बाळांच्या, नातवंडांच्या वाढदिवसाला हजेरी लावून यातच ही माणसं धन्यता मानत असतात. आपली पोरं बाळं खुश आहेत ना, तर आपण आनंदी. असे विचार या माणसांचे असतात. म्हणूनच मनात आले तरी कधी बोलून दाखवत नाहीत.
यासाठीच हा विचार मांडावा असे मनापासून वाटते.

आपली वडिलधारी माणसं नेहमीच आपल्याला सुखी ठेवण्यात गुंतलेली असतात. त्यांना स्वतःचा असा दिवस नसतो, तो त्यांच्या वाट्याला येतच नाही. लहानपणापासून फक्त नी फक्त आपण त्यांना कष्ट करताना पाहत असतो. मग आज आपण सर्व मोठे आहोत, सगळं कळतंय तर आज आपण याच वडिलधारी माणसांसाठी आपण वडिलधारी होऊया.

आज याच आपल्या आणि जवळच्या माणसांसाठी काहीतरी करण्याची वेळ आपली आहे. या सर्वांना एकत्रित करून त्यांच्यासाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी हा आजचा दिवस खूप चांगला आहे. तर मग लागा सर्वांनी तयारीला. ज्यांच्या घरात वयोवृध्द असतील त्यांनाही याची कल्पना द्या, सांगा त्यांना आजपर्यंत जे घडले नाही ते आपण आपल्या वाडीत, गावात करून दाखवू. सर्वांचा एकत्रितपणे आशीर्वाद घेऊ. कितीसा वेळ लागेल सांगा ना !!
सगळं एकदा ठरलं की जास्तीत जास्त दोन तास.
का ? आपण आपल्याच जवळच्या माणसांसाठी दिवसातले दोन तास नाही देऊ शकत ?
आनंदाने सर्वांनी एकत्र येऊन विचार विनिमय करा. कोणत्या वेळी हा दिवस साजरा होईल हे सर्वानुमते ठरवा. एकदा ठरलं की, प्रत्येक आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकी, मावशी, ताई, मामा, मामी आणि सगळ्या जवळच्या लोकांना एका ठिकाणी जमा करा, हो पण त्यांना याची कल्पना न देता.
जेव्हा त्यांना ही सगळी तयारी कळेल त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून येणारे आनंदाश्रू म्हणजे तुम्ही केलेल्या या आजच्या समारंभाचे चीज झाले म्हणून समजा. हीच तुमच्या कष्टाची, मेहनतीची पोचपावती आहे असे समजा.
प्रत्येक माणसाच्या पायावर डोके ठेवल्यावर ज्यावेळी त्यांचा थरथरता हात तुमच्या डोक्यावर आशीर्वाद देण्यासाठी थांबेल तेव्हा उठा आणि त्या समोर असलेल्या माऊलीला मिठी मारा, आणि बघा त्यांच्या डोळ्यांत. तुम्हाला तुमचे जीवन सार्थक झाले असे वाटल्याखेरिज राहणार नाही.
यांमध्ये तुमचेच आई वडील असतील तर मनापासून क्षमा मागा. आज पर्यंत आम्ही आमच्याच वाढदिवसाच्या केक कापला आणि तुम्हाला भरविला पण आज तुमच्या वाढदिवसाचा केक आम्हाला भरवा. यावेळी मात्र त्यांच्या डोळ्यांत नीट बाघा, त्यांचे डोळे तुम्हाला सांगतील, पोरा/ पोरी आम्ही तुला जन्म दिला त्याचे आज पांग फेडलेस.
धन्य जाहलो आम्ही…!!

🚩जय शिवराय🚩
विजय वैशाली दत्ताराम पराडकर -आण्णा
🚩सह्याद्रीचा दुर्गसेवक १७१८४

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular