Homeसंपादकीयविचार करायला लावणारी , मन सुन्न करणारी आत्महत्या

विचार करायला लावणारी , मन सुन्न करणारी आत्महत्या

अहमदनगर शहरात नुकतीच एक घटना घडली. त्या घटनेने सर्वांना विचार करायला लावला. कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलीची हत्या करत पती-पत्नीने आत्महत्या केली. त्या चिमुकलीला फुलायच्या अगोदरच मारून टाकले. थोडीशीही सद्सद्विवेक बुद्धी जागी कशी झाली नाही ? नंतर दोघा पती पत्नी यांनी आत्महत्या केली. खरचं जीव इतका नकोसा होतो का ? आपल्या आसपास, वर्तमानपत्रात, टीव्हीवर आपण आत्महत्येच्या बातम्या ऐकतो. अगदी गरिबांपासून तर श्रीमंतांपर्यंत आत्महत्या होत आहेत. प्रत्येकाचे कारण वेगवेगळे असेलही परंतु आत्महत्येचा पर्याय घातकच आहे. मृत्यू तर अटळच आहे. पण अशा पद्धतीने जीवन संपविणे कितपत योग्य आहे .इतर पर्याय शोधण्या अगोदरच आत्महत्येचा पर्याय का निवडतात?. एवढं काय संकट होते.ते फक्त त्यांनाच माहीत. कोरोनानंतर जणू आत्महत्यांचं सत्र सुरू होईल की काय? अशी शंका मनात येत राहते. या कोरोनाच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. सुशिक्षित बेकारांचं प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडले आहेत. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लागतो पैसा. तो येण्याचा मार्ग ठप्प झालेला आहे. कर्जाचे हप्ते थकले आहेत.अजूनही स्थिती पूर्वपदावर नाही. दुसरी लाट जाऊन तिसरी येणार की काय ? जगण्यासाठी अनेकांची धडपड दिसून येत आहे. कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा अशा आत्महत्येच्या घटना घडत राहतात.
माणूस आणि संकट , माणूस आणि संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. संकटे पूर्वीही होती आणि आजही आहेत. परंतु पूर्वीचा माणूस सहनशील होता. पूर्वीची पिढी शिकलेली नव्हती परंतु माणसात होती. माणसामाणसात, नात्यानात्यात सूसंवाद होता. सुखदुःखात एकमेकांचा आधार होती माणसं. आज तो संवाद हरपला. माणूस एकलकोंडा झाला. ताणतणावात जाऊन तो आत्महत्याचं अस्र वापरू लागला. आत्महत्या त्या प्रश्नांचे उत्तर नसते. संकटाला सामोरे जाणे हेच खरे जीवन आहे. सकारात्मक विचार करून प्रयत्नवादी राहणे. निश्चित मार्ग सापडतो. परंतु ती सहनशिलता या पिढीत राहिली आहे काय ? अनेक आत्महत्या तर प्रतिष्ठेपायी होतात. समाजात आपली नाचक्की होईल. लोक काय म्हणतील ? यातून आत्महत्या होते. आज सगळी माणसं ताणतणावात जीवन जगत आहेत. काही छोट्या छोट्या कारणांमुळे, राग सहन न झाल्यामुळे आत्महत्या करतात. आपल्या कुटुंबावर त्याचा किती विपरीत परिणाम होईल एवढा सुद्धा विचार केला जात नाही.
माणसाने स्वप्न नक्की पहावीत. त्या स्वप्नांच्या दिशेने धावावे. परंतु अपयशाने खचून जाऊ नये. कुणाशी तुलना करून जगू नये. आपले सामर्थ्य, आपल्या मर्यादा ओळखा. या धावपळीच्या युगात स्वतःसाठी जगायला शिका. एखादा पुढे गेला म्हणून त्याची नक्कल करू नका. सकारात्मक विचारांची पुस्तक वाचा. यशस्वी लोक अपयशातून पुढे गेलेले असतात. त्यांनासुद्धा संघर्ष चुकला नव्हता. हे आपल्याला दिसून येईल.
‘ यशस्वी लोक वेगळे काम करत नाहीत तर प्रत्येक काम वेगळ्या पद्धतीने करतात.’ ते ध्येय निश्चित करतात . ध्येयासाठी वेडे होतात आणि इतिहास घडवितात. अपयश आले तरी खचून जात नाहीत. सिंहासारखे दोन पाऊल मागे घेतात. आणि अंदाच बघून पुन्हा उत्तुंग झेप घेतात. आपले ध्येय साध्य करतात. प्रत्येकाने बदलत्या परिस्थितीनुसार बदलायला हवे. संकटातही संधी शोधता आली पाहिजे.
जीवन सुंदर आहे. ते आनंदाने जगावे. आपण स्वतः ने ठरवलं की मला आनंदी राहायचे आहे. नक्कीच आनंदी जीवन आपण जगू शकतो.
कुटुंबात, नात्यात, समाजात, माणसामाणसात सुसंवाद हवा. जेणेकरून एकमेकांना आधार देतील. एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेतील. गरजूंसाठी मानसिक , आर्थिक आधार मिळेल. सुसंवादाने नक्कीच जगण्यासाठी बळ मिळेल. हे वाढत जाणारं आत्महत्येचे सत्र थांबवता येईल.
नका करू आत्महत्या
पुन्हा नसे हे जीवन
जरासे राहू द्या भान
आनंदाने जगा हर क्षण ….

       मार्ग सापडेल तुला
      जाळून टाक अविचार
       नक्की मिळेल यश
       जगावे मित्रा सुविचार … 

            सकारात्मक विचारांची पेरणी समाजात करणे गरजेचे आहे. एकाकी जगण्यापेक्षा समाजात मिसळा. मित्रांमध्ये मनसोक्त हसा. आपल्या कुटुंबाला वेळ द्या. मुलांमध्ये गप्पागोष्टी गाणी यात रंगून जा. लहान मुलांकडून निरागस गुण घ्या. आपल बालपण डोळ्यासमोर येईल. ते बालपण जीवन भर जगा. नक्की आनंदाची गुरुकिल्ली मिळेल. आसपास नजर फिरवून पहा. आपल्यापेक्षा हालाखीत असणारे आनंदी जगत आहेत. रस्त्याच्या कडेला झोपडीत राहणारे सुखाची झोप घेत आहेत. अंध-अपंग वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेत आहेत. जीवनाच्या रस्त्यात काटे असले तरी त्यातच फुल उमलणार आहे. अंधारानंतर पुन्हा प्रकाश पडणार आहे. तुझं मन स्वच्छ, निर्मळ ठेव. चालत रहा रस्त्याने. यश तुला खुणावत आहे.. यश तुझेच आहे. ते यश पाहण्यासाठी तुला जगावे लागेल. म्हणून आत्महत्या करू नका.  

            लेखक - श्री.किसन आटोळे सर
               वाहिरा ता. आष्टी जि.बीड
                 
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular