Homeमुक्त- व्यासपीठविठ्ठल भक्त संत कुर्मदास

विठ्ठल भक्त संत कुर्मदास


पैठण मध्ये रहाणा-या 22 वर्षाच्या कुर्मदास ने आईला हाक मारली…. आई ये, चल लवकर…. कीर्तनाची वेळ झाली…
आई वैतागून म्हणाली, कीर्तन…. कीर्तन.. रोज कीर्तन… गुडघ्यापासुन तुला पाय नाहीत, कोपरापासून तुला हाथ नाहीत…. कोण नेईल रोज तुला कीर्तनाला?? बरं लहान नाहीस आता… 22 वर्षाचा मोठ्ठा झालाय… आता नाही सहन होत मला तुझं ओझं…
आई, खरं आहे गं तुझं!! मी 22 वर्षाचा घोडा झालोय.. पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो. माझ्या वडीलांनी झुरून झुरून प्राण सोडला. आणी मी जीवंत राहीलो… बिन हाताचा, बिन पायाचा… लंगडा – लुळा!! त्यात माझा काय गं दोष आई!! आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला… ऊद्या नाही म्हणणार मी तुला…
आईचे डोळे डबडबले… शेवटी आई होती ती… आईने हातपाय नसलेल्या, व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं… व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडुन दिलं… भानुदास महाराजांचं कीर्तन चालु होतं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा!! किर्तनाला भरगच्च गर्दी… कुर्मदास ला चालता येत नाही… परंतु लोटांगण घेत घेत…. माणसातुन रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला… व पहील्या रांगेत बसला… गळ्यात तुळशीमाळ…. कपाळी टिळा लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं…. महाराज म्हणाले, आलास कुर्मदासा!!
हो महाराज आलो….
अरे कुणाबरोबर आलास??
महाराज, आईनं आणुन सोडलं…
अरे कशाला आईला त्रास दिलास… आता घरी कसा जाशील?? महाराजांनी विचारलं
नाही महाराज…. आता मला घरी नाही जायचं…
हे ऐकुन महाराज म्हणाले, अरे कुर्मदासा… आज काल्याचं कीर्तन!! हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला… मग तु कुठे जाशील!!
कुर्मदास बोलला, महाराज मी पण येऊ का पंढरीला!!!
अरे कुर्मदासा, तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं… तुला कोण नेईल रे पंढरीला??? एवढं लांब
महाराज तुम्ही फक्त हो म्हणा!! पहा मी येतो का नाही पंढरीला….
महाराज हसत हसत विनोदाने “हो… ये” म्हणाले…
रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहुन… हे उठले.. स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला… तांबडं फुटलं… लोक उठु लागले. लोकांना विचारु लागला.. अहो महाराज, पंढरीचा रस्ता कोणता हो??
लोक सांगु लागले… इथुन पुढं जा…आणी पुढे जाऊन पुन्हा विचारा…
सकाळी 10 वाजेपर्यंत कुर्मदासानं बिड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडु लागला… “ऐका हो, ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो!! कुणी कालवण आणावे… कुणी भाकरी आणाव्या!! महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहीलं व आश्चर्यानं विचारलं… कुर्मदासा, कसा आलास रे??
महाराज, तुमच्या “हो” नं मला आणलं.. कुर्मदास बोलला..
महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं… प्रवचन झालं… कीर्तन झालं… हरिपाठ झाला… महाराज म्हणाले आपला ऊद्याचा मुक्काम मांजरसुंबा…
रात्री वारकरी झोपले की, कुर्मदास फरफटत निघाला… खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला मांजरसुंबा गाठलं… तिथंही त्यानं हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली….. एक एक मुक्काम मागं पडु लागला…लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती… परंतु कुर्मदासाचं ध्येय एकच….. विठुरायाची भेट!!!
येरमाळा, बार्शी… असं करत करत शेवटी लऊळ गाव आलं… कुर्डुवाडीच्या पुढे 7 की.मी वर लऊळ हे गाव…. तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं. दिंडी मागुन आली.. सर्वांची जेवणं झाली… कुर्मदास एका कोप-यात विव्हळत पडला होता. भानुदास महाराज त्याच्याजवळ आले. व त्याला म्हणाले, कुर्मदासा, आता फक्त एकंच मुक्काम राहीला आहे… मग तु तुझ्या विठुरायाला भेटशील…
कुर्मदास बोलला… नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार पंढरीला…
अरे असं का म्हणतोस कुर्मदासा!! एवढ्या लांब आलास… आणी आता फक्त एका मुक्कामावर आलीय पंढरी!!!
कुर्मदासाला बोलणं सुध्दा असहाय्य झालं होतं… तो पालथा होता तो उताणा झाला… त्याचं सगळं पोट सोलुन निघालं होतं. त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या. त्या जखमात असंख्य खडे रूतलेले होते. अंगातून रक्त वहात होतं. कुर्मदास थकून गेला होता. त्याला बोलण्याचं देखील त्राण राहीलं नव्हत. निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कण ही नव्हता. सगळ्या दिंडी साठी त्यानं अन्न गोळा केलं… परंतु स्वतःच्या पोटात मात्र? अन्नाचा कण ही नव्हता…. महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला… महाराज, मल – मुत्र कोण धुईल माझं?? घरी आई धुत होती. इथं कोण धुईल…. म्हणुन अन्न पाणी सोडलं…
कुर्मदासाचं हे बोलणं ऐकुन भानुदास महाराजांचे डोळे डबडबले…. कुर्मदासा!! काय केलं हे??
महाराज, घरी राहुन काय केलं असतं…. निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी… महाराज, आता फक्त एकच करा… पंढरपूर ला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा… आणी त्याला सांगा.. हे पांडुरंगा!! तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं. या जन्मात नाही पहाता आलं चरण…. पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या… असं म्हणुन तो तिथंच विव्हळत पडला…. भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले… तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडुन ते पंढरपुरात आले. चंद्रभागेचं स्नान झालं. व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहीले…
भानुदासांनी पांडुरंगाकडं पाहिलं…. पांडुरंगाने भानुदासाकडं पाहिलं…. अंतःकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं…
पाडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले, रखुमाई!! तु वारी सांभाळ… मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लऊळ ला भेटायला चाललो… पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली. विठ्ठल कुर्मदासा जवळ आले. कुर्मदास निपचित शुध्द हरपुन त्या वाळवंटात पडला होता.जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती. शरीरातून रक्त वहातंच होतं. विठ्ठलानं हाक दिली… कुर्मदासा!! अरे डोळे उघड…. बघ मी आलोय तुझ्यासाठी….
मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले…. पहातो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते… विठ्ठला… विठ्ठला माझ्या पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेनं फरफटत लोटांगण घेऊ लागला… एवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली….. त्याच शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं. व म्हणाले, कुर्मदासा, तु जिंकलास. तुझं ध्येय पुर्ण झालं… बघ मी स्वतः तुझा विठ्ठल, तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे.
होय विठ्ठला…. आता हीच माझी पंढरी!!!
कुर्मदासाने डोळेभरून पांडुरंगाला पाहीलं… व डोळ्यातील आश्रुंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला……

धन्य धन्य तो कुर्मुदास आणी धन्य त्याची भक्ती!!!

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular