Homeकृषीविरोधकांनी मुग गिळले , सत्ताधाऱ्यांनी मिटले डोळे, उध्वस्त झाला...

विरोधकांनी मुग गिळले , सत्ताधाऱ्यांनी मिटले डोळे, उध्वस्त झाला शेतकरी , शेतकरी नेत्यांना लागले आमदारकीचे डोहाळे

गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रामध्ये जोरदार व अति जोरदार पाऊस सुरू आहे या पावसाने नदी-नाल्यांना पूर येऊन शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच कष्ट करून राबराब राबून थकलेला शेतकरी पूर्णपणे नेस्तनाबूत झाला आहे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये कुठलही पिक असो ते पूर्णपणे तयार झालेलं असतं आणि त्याला शंभर टक्के खर्च लागलेला असतो आणि या महिन्यांमध्ये असा अवकाळी जोरदार पाऊस झाला की शेतीचे अतोनात नुकसान होतं काढणीस तयार झालेल्या पीक डोळ्यासमोर वाया जाताना पाहून शेतकऱ्याला खूप वाईट वाटतं मात्र तो काहीच करू शकत नाही कारण त्याच्या हातामध्ये काहीच उरलेलं नसतं या वर्षी तरी चांगलं पिकेल या आशेवर तो शेतीमध्ये गुंतवणूक करतो प्रसंगी व्याजाने पैसे काढून किडुक मिडूक विकून तो शेती उभी करतो हे सर्व करत असताना त्यामागे शेतकऱ्याचे अपार कष्ट असतात या शेतीवरच त्याच्या संसाराची भिस्त अवलंबून असते कारण शेती हेच त्याचं चरितार्थाचे साधन असतं शेतामध्ये बी पेरता पेरता तो स्वप्नही पेरत असतो
हिरवे सपान डोळ्यात रूजवतांना
मी पाहीला होता बाप माझा
मातीत मिसळतांना
शेतातील पीक हे शेतकऱ्याचा आत्मा असतो त्याच संपूर्ण कुटुंब शेती भोवती फिरतं आणि त्या शेतीच्या गोल गोल चक्रात तो कर्जबाजारी होऊन जातो त्याला कुणीच वाली उरत नाही शेतीला लागलेला खर्चही निघत नाही त्याची बाजू मांडणारा असा मायेचा लाल कोणीच नाही पावसाने अक्षरश थैमान घातले आहे मात्र उडीद मूग सोयाबीन कापूस मका व इतर सर्व पीक अतिपावसाने पूर्णपणे वाया गेली आहेत या विषयावर कोणीही काहीच बोलत नाही सत्तेतले मग्रूर नेते साधे आश्वासनही देत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोधकही काहीच बोलत नाहीत कदाचित सत्तेतल्या आणि विरोधातले एकाच ताटातले मांजर झालेले आहेत ज्या देशात ज्या राज्यात विरोधक दमदार नसतील अभ्यासू नसतील त्यांना विरोध कुठे करावा सरकारला कसे अडचणीत आणावे ज्वलंत प्रश्नांवर कशी चर्चा करावी हेच माहित नसेल तर त्या देशातील त्या राज्यातील सरकार हे हुकूमशहा बनतं हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे तसे पाहिले तर हे आघाडीचे सरकार तीन भिन्न विचारांना एकत्र करून महाराष्ट्रावर राज्य करतेय या सरकारचे मार्गदर्शक फार मोठे कृषी तज्ञ व शेतीचे अभ्यासक आहेत त्यांनी उभ्या आयुष्यात शेतीचा खूप अभ्यास करून शेतीला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र आता तेही काहीच करत नाही याचं नवल वाटल्याशिवाय राहात नाही दुसरी गोष्ट महाराष्ट्रातील विरोधी बाकावर बसलेले अभ्यासू माजी मुख्यमंत्री असलेले विचारवंत आक्रमक असे नेते मूग गिळून बसलेले आहेत आणि यात सर्वात वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांचे कैवारी स्वतःला शेतकऱ्यांचे दैवत समजणारे शेतकरी नेते मंत्रिपदाच्या आमदारकीच्या आशेने सरकारच्या सुरात सूर मिसळू लागले आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर कोणीच काहीच बोलत नाही म्हणून सर्व अवघड होत चालल आहे निवडणुका आल्या की शेतकरी संघटनेच्या लोकांना शेतकऱ्यांच्या प्रेमाचं भरती येते अभ्यास करून सभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलून डोळ्यात पाणी आणून हे लोक शेतकऱ्यांचे मत आपल्या पारड्यात पाडून घेतात निवडून येतात आणि मंत्रिपदाचा तुकडा मिळाला की लगेच शेतक-यांना विसरून जातात हे आपण अनुभवतो आहोतच शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी हे लोक आंदोलन करतात की आमदार बनण्यासाठी हेच कळत नाही निवडणुकीच्या अजेंड्यावर शेतकऱ्यांचे प्रश्‍न मांडणारे आज बिळात लपून बसले आहेत मला इथे खेदाने म्हणावे लागते आहे की सरकारच्या दावणीला बांधलेल्या शेतकरी नेत्यांनो थोड्या तरी लाज धरा आणि ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही तिथपर्यंत पोहोचला आहात हे विसरू नका आता काळ फार अवघड आला आहे शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे त्याला साथ द्या आधार द्या नाही तर तो तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा विरोधकांनी मुंग गिळले सत्ताधाऱ्यांनी डोळे मिटले आणि शेतकरी नेत्यांना आमदार की चे डोहाळे लागले म्हणून आम्हा शेतकऱ्यांची ही अवस्था निर्माण झाली.

         संतोष पाटील 
        7666447112
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular