Homeमुक्त- व्यासपीठशाळा सुरू झाली अन् मुलांच्या चेहऱ्यावर हास्य अवतरले.

शाळा सुरू झाली अन् मुलांच्या चेहऱ्यावर हास्य अवतरले.

कोरोना नावाचं वादळ आलं अन् सारच बदलून गेलं. हा मानव जातीसाठी अनपेक्षित धक्का होता. संपूर्ण जग ठप्प झालेले. या काळात शाळा बंद झाल्या. थोडीफार परिस्थिती सुधारताच व्यवसाय, व्यवहार सुरळीत सुरू झाले. परंतु शाळा अजूनही बंदच होत्या.
बंद शाळेकड पाहिलं तरी कसंनुसं वाटायचं. निर्जीव भिंती, सुकलेली झाड अन् मैदानात कचराच कचरा. गावातील काहींचे विश्रांतीचे ठिकाणच शाळा झाली होती. काही ठिकाणी तर पत्त्याचे डावच मांडले होते. मग त्यातील कोणी गुटखा, तंबाखू बहाद्दर. त्यांनी पडवीचे कोपरे , दाराचे उंबरे चांगलेच रंगवलेले. वर्गाच्या पाठीमागे देशीप्रेमींनी फेकलेल्या बाटल्या. हे पाहून मन उद्विग्न व्हायचं . ज्या गावची मुलं या शाळेत शिकतात. त्याच ज्ञानमंदिरात हे असले उद्योग ? गावाला शाळेचा अभिमान वाटावा . अशी शाळा करण्यासाठी प्रयत्न हवेत . परंतु लाज वाटवे असे हे कृत्य होते. हा कोरोना कधी जाणार अन् शाळा कधी सुरू होणार ? हाच प्रश्न सर्वांपुढे होता. शाळा कधी सुरू होणार याची मुलं आतुरतेने वाट पाहत होती. अभ्यासात आलेला विस्कळीतपणा, हरवलेला आत्मविश्वास, मुलांमध्ये उत्साह, ऊर्जा, चैतन्य शाळाच देऊ शकते. हे ज्ञान मंदिर लवकर सुरू व्हावे. असे मुलं, पालक, शिक्षकांना मनोमनी वाटायचे. शिक्षकांना मुलांची सवय झालेली. कधी शाळा भरते आणि मी मुलांशी खेळेन ,नाचून गाऊन त्यांना शिकवीन असे वाटायचे. शाळा हे मंदिर आणि मुलं ही देवाची फुले आहेत. या फुलांचा सुगंध चोहिकडे दरवळावा. ही मुलं घडावी , देशाची शिल्पकार बनावी यासाठी शिक्षक इमानेइतबारे प्रयत्न करत असतात. परंतु असेच दीड वर्ष निघून गेले. या काळात ऑनलाइनच्या माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्नही झाला. परंतु म्हणावे तसे यश मिळाले नाही.

http://linkmarathi.com/लहरी-राजा-प्रजा-आंधळी-अधा/


यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. परंतु शाळा ऑनलाईनच सुरू होत्या. ज्यांना शक्य असेल अशी ऑनलाईनला हजर राहिली. परंतु बरेचसे मुलं वंचितच राहिली. सर्व मुले शिकावी. यासाठी शिक्षक गृहभेट देत होते. मुलांना अभ्यास देत होते. परंतु यालाही मर्यादा होत्या. अचानक टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज आली. पहिली पासून शाळा सुरू होणार. आणि मुलं, पालक शिक्षकांमध्ये उत्साह संचारला. 11 नोव्हेंबर पासून शाळा सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी मुलांनी शाळेत हजेरी लावली. निर्जीव भिंती बोलू लागल्या. या चिमण्यांनो शाळेत स्वागत करू लागल्या. शाळेतली झाडे डोलू लागली. झाडांवर चिवचिव, कावकाव असा आवाज घुमू लागला. परिसर स्वच्छ सुंदर दिसू लागला. शाळेतील फळ्याने अंगावरची धूळ झटकली. वह्या, पुस्तके, पाटी-पेन्सिल मुलांबरोबर नाचू लागली. शिक्षक आणि मुलांमध्ये हरवलेला संवाद सुरू झाला. मुलं, शाळा, शिक्षक एकरूप झाले. मुलांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य अवतरले. ज्याची सर्वजण वाट पहात होते. ऑनलाइन अभ्यास तसेच गृहभेटी यामुळे माझी आणि मुलांची चांगलीच ओळख झालेली होती. कधी कधी शाळेत बोलून त्यांना अभ्यास दिला जायचा. यामुळे पहिल्या दिवशी मुले अगदी हसत-खेळतच शाळेत आली. मी शाळेत गेल्याबरोबर पळतच माझ्याकडे आली. आणि सुरू झाला तो मनमोकळा संवाद. विद्यार्थी आणि शिक्षकांचा. खरंच त्यांच्या भावविश्वात एकरूप झालो की आनंद मिळतो. सरळ, साधे, सोपे तितकेच गहन प्रश्न असतात त्यांचे. शिक्षक म्हणजे आपलं सर्व काही . मग ते प्रश्न आपल्या शिक्षकांना विचारतात. प्रश्नांचे निरसन झालं की किती आनंद असतो त्यांच्या निरागस चेहऱ्यावर. शब्दातही व्यक्त करता येत नाही. शाळा, घर, गाव, नातेवाईक ते टीव्हीवरील मालिका यावर ते भरभरून बोलतात. शिक्षकांनी प्रतिसाद दिला तर त्यांना किती किती सांगू असं होत राहतं. या गोड हसर्‍या मुलांमुळे शिक्षक सुद्धा आनंदी राहतो. त्याचा ताणतणाव नाहीसा होतो. याचा अनुभव अवर्णनीय आहे. खरोखरच आम्ही शिक्षक भाग्यवान आहोत. हे परम पवित्र कार्य आम्ही करत आहोत. या देशाची नवपिढी घडवत आहोत.

http://linkmarathi.com/abacus-म्हणजे-काय-सर्व-माहिती-ए/


कोरोनाच्या काळात मुले बरंच काही शिकली. त्यांची समज वाढलेली आहे. तरीही आज शिक्षक, पालक यांच्यासमोर आव्हाने आहेत. पहिलीचा मुलगा आज तिसरी इयत्तेमध्ये आलाय. दुसरीची मुलं प्रथमच शाळेत आले आहेत. आज पहिली, दुसरी, तिसरीसाठी श्रवण, भाषण, वाचन, लेखन सराव करावा लागेल.सराव कमी झाल्याने इंग्रजी, गणिताचा प्रश्न मोठ्या वर्गासमोर असेल. जिथं प्रश्न निर्माण होतात उत्तरेही तिथेच सापडतात. अभ्यासपूरक नवनवीन उपक्रम, खेळ, गाणी, गोष्टी, गप्पा, स्पर्धा यातून मुलांचा आत्मविश्वास वाढावा लागेल. हे काम शिक्षक सहजरीत्या करू शकतात. हसतखेळत शिक्षणातून हे साध्य होऊ शकते. यासाठी शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचा समन्वय हवा.
मुले ही मुळातच उत्साही, आनंदी, निरागस, कृतिशील, हुशार असतात. त्यांच्यात प्रचंड ऊर्जा असते. गरज आहे त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याची. मुलांना प्रोत्साहन द्या, त्यांचे कौतुक करा , शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर द्या. नक्कीच मुले शिकतील , मुले घडतील.
सुरु झाली शाळा / आनंदली मुले/
वृक्ष वेली फुले / बहरली //1//
स्वच्छ परिसर / बोलू लागे भिंती /
स्वागत करिती / बालकांचे //2//
पुन्हा ती पाखरे / फांदिवरी आली /
नाचू ती लागली / मुलांसंगे //3//
आनंदाचा क्षण / शिक्षक मुलांचा /
झाला शिक्षणाचा / श्रीगणेशा //4//

 प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू झाली आहे. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. 


 कवी - लेखक - श्री.किसन आटोळे सर
      
     जि. प.प्रा.शाळा मलठण . 
     ता.कर्जत जि.अहमदनगर
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular