Homeमुक्त- व्यासपीठशिस्तीचा मंत्रचळ !

शिस्तीचा मंत्रचळ !

(१) मी शाळेत शिकलो काटेकोर गणित ज्यात शिकलो कोनातली भूमिती. मग मी वाणिज्य महाविद्यालयात शिकलो काटेकोर हिशोबाची पद्धत. मग कंपनी सेक्रेटरी इंटर कोर्स मध्ये शिकलो मुद्देसूद लिखाण. आणि शेवटी कायदा महाविद्यालयात शिकलो कायद्याची शिस्त! या शिक्षणाने माझ्या मनावर केले काटेकोरपणाचे, शिस्तीचे संस्कार. वर कढी म्हणून चालूच होते देवश्रद्धेचे व देव प्रार्थनेचे संस्कार! या एकंदर शिक्षणाने, संस्काराने काय केले तर माझ्या मनाची नैसर्गिक अवस्था ओढून ताणून मानव निर्मित कृत्रिम साच्यात बंद केली. आणि मग प्रत्यक्ष जीवनात सुरू झाली माझ्या जिवाची घालमेल! थिअरीचा साचा एक व प्रॕक्टिसची प्रत्यक्ष तऱ्हा वेगळी मग का होणार नाही माझ्या जिवाची घालमेल?

(२) उच्च शिक्षण व धार्मिक संस्कार यांनी काय केले तर माझ्या मनाला काटेकोर, शिस्तप्रिय व देवभोळे बनवले. हे मनावर चढवलेले कृत्रिम ओझे सोबत घेऊन जेंव्हा या ओझ्याची प्रत्यक्ष जीवनात प्रॕक्टिस करायला मी गेलो तेंव्हा जाम गडबडलो. कारण बाहेर भलतेच होते. भलतेच म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशा हा प्रकार बघायला मिळाला

(३) प्रत्यक्ष जीवनात खराखुरा अनुभव घेताना शिकलेली थिअरी व प्रत्यक्ष आचरणातली प्रॕक्टिस यात मला जी तफावत, विसंगती दिसून आली त्यातून माझ्या शिक्षणाचा चोथा झाला व धार्मिक संस्काराचा भ्रमनिरास झाला. भ्रमाचा भोपळाच फुटला म्हणा की! मी प्रत्यक्षात काय बघतोय तर अधूनमधून करोनासारख्या हलकट आजारांची भीती दाखवणारा लहरी निसर्ग व भ्रष्टाचाराचे महाघोटाळे करूनही स्वतःला मोठे, प्रतिष्ठित म्हणवून घेत उजळ माथ्याने फिरणारी निर्लज्ज माणसे!

(४) तिकडे शेअर बाजारात शेअर्सचे भाव कधी स्थिर रहात नाहीत, पण याच अस्थिरतेवर नफा कमावणारे सट्टेबाज मात्र रूबाबदार जीवन जगत असतात. या सगळ्या गोष्टी हे कटू सत्य आहे जे कटू सत्य तात्त्विक थिअरीची प्रत्यक्ष प्रॕक्टिस करताना चांगले कळते. महात्मा गांधी म्हणतात की सत्य हाच ईश्वर (ट्रूथ इज गॉड). पण माझे मन या कटू सत्यरूपी ईश्वराला सहज स्वीकारत नाही. ते का कू करते. हा असला ईश्वर कळण्यासाठी का केला होतास तू तुझ्या शिक्षणाचा अट्टाहास व धार्मिक संस्काराचा बाऊ असे म्हणते.

(५) शिक्षणाने शिकवलेली थिअरी व प्रत्यक्षात करावी लागणारी प्रॕक्टिस यातील विसंगती सहन होत नाही व नीट सांगताही येत नाही. खरं तर वाकड्या गोष्टी या वाकड्या आहेतच पण सरळ गोष्टी सुद्धा जेंव्हा वाकड्या गोष्टींच्या नादी लागून वाकड्या होतात तेंव्हा सरळ वाट वाकडी करण्यासाठी मनावरील दबाव वाढतो. कारण वाट वाकडी केली नाही तर जगणेच मुश्किल होऊन बसते. ही प्रॕक्टिस खरं तर फार विचित्र, त्रासदायक आहे. थिअरीने शिकवला सरळ मार्ग आणि प्रॕक्टिस शिकवतेय वाकडा मार्ग! किती विचित्र विरोधाभास आहे हा!

(६) हे जेंव्हा असह्य होते तेंव्हा या कात्रीत सापडलेले माझे मन मंत्रचळी होते. हा असतो शिस्तीचा मंत्रचळ! थिअरीत शिकलेली कायद्याची शिस्त व कायद्याचे कातडे पांघरलेली वरवरची शिस्त यांचा मेळ लागता लागत नाही म्हणून वैतागून मी घरातील निर्जीव वस्तू नीटनेटक्या ठेवून त्यांनाच शिस्त लावण्याचा निरर्थक प्रयत्न करतो. त्या वस्तू निर्जीव असल्याने माझ्या अंगावर उलटून येत नसल्या तरी शिस्तीचा हा असला खेळ त्या वस्तूंबरोबर खेळताना तो पुढे शिस्तीचा मंत्रचळ होऊन बसतो कारण ही असली शिस्त खरं तर शिस्तीचा निव्वळ भास असतो!

  • ॲड.बी.एस.मोरे©
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular