Homeमुक्त- व्यासपीठशेतकरी बांधवांची यातना /दुःख

शेतकरी बांधवांची यातना /दुःख

देशातील आज सर्वांत मोठे दुःख आहे, ते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांचे. जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांमुळेच आपण आपले जीवन जगत आहोत. ते अहोरात्र मेहनत घेऊन शेतात राबून अन्नधान्य पिकवतात त्यामुळेच आपल्या सर्वांचे पोट भरत असते. परंतु त्यांचे दुःख कोणीही समजून घेत नाही. त्यांच्या डोळ्यांत नेहमीच अश्रू असतात. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम होताना आपल्याला अजिबात दिसत नाही.उलट तुटपुंजी मदतीची आमिष दाखवून त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसल्याचा आव आणला जातो.हे कितपत योग्य आहे ? हे मुळीच योग्य नाही.त्यांचे समाधान होईल,त्यांना मानसिक आधार मिळेल,अशी मदत मिळणे अपेक्षित असताना तशी मदत केली जात नाही.त्यांच्या नशिबी फक्त नि फक्त दुःखाचा डोंगर मांडलेला असतो.
आज आपल्या देशातील सर्व शेतकरी हे हवालदिल झालेले आहेत,पण आपल्या शेतकरी बांधवांकडे कोणाचे लक्ष नाही.शेतकरी बांधवांना राजकारणी लोक हे केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी नुसती आश्वासने देऊन त्यांच्या दुःखाचा बाजार मांडताना दिसत आहेत.हा बाजार फक्त आपल्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी वापरत आहेत.पण आपल्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले जात नाहीत याची खंत वाटते.
आपला देश हा कृषिप्रधान म्हणून ओळखला जातो,परंतु या कृषिप्रधान देशामधील आपला शेतकरी बांधव हा कधीच सुखी दिसला नाही.त्यांचे दुःख काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत,हे विचारात घेतले जात नाही,आणि योग्य ते नियोजन केले जात नाही. याचा फटका आमच्या शेतकरी बांधवांना खूप सहन करावा लागतो.खरी परिस्थिती काय आहे, याकडे पुरेशे लक्ष दिले जात नाही,केवळ एखादे संकट आमच्या शेतकरी बांधवांवर आले, तर फक्त आश्वासन देऊन आशावादी ठेवले जाते.पण हे कितपत योग्य आहे,याचा पुरेशा विचार करणे गरजेचे आहे,आणि त्यांना योग्य न्याय कसा देता येईल यादृष्टीने योग्य ती पावले टाकली पाहिजेत.


शेतकरी म्हणजे दिवसरात्र शेतात राबून,मेहनत करणारा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो. परंतु हा पोशिंदा किती सुखी आहे किंवा त्याला किती दुःखे आहेत याचा विचार कोणी केला आहे का ? मुळीच कोणी विचार केलेला नाही. म्हणून आपले सर्व शेतकरी बांधव हे नेहमी दुःखी असताना आपण पाहत असतो,त्यांचे आत्महत्या करण्याचे प्रमाण ही आपल्याला कमी करता येत नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे.आपला शेतकरी बांधव दिवसरात्र, ऊन, वारा,पाऊस न पाहता काबाडकष्ट करत असतो पण त्याच्या हातामध्ये सरतेशेवटी निराशाच जास्त असते.कधी जास्त प्रमाणात अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ यामुळे जो आपल्या शेतकरी बांधवांनी घाम गाळलेला असतो तो घाम या सर्व संकटांपुढे नतमस्तक होतो आणि पदरी केवळ दुःखाची झळ असते.यातून बाहेर पडताना खूप मोठया प्रमाणात यातना होत असतात. दिवसरात्र केलेले कष्ट डोळ्यांसमोर दिसत असतात पण त्याच डोळ्यांतून अश्रू गाळावे लागतात.राजकारणी लोक या दुःखाचे निरसन करण्यात कमी पडताना दिसतात.त्यांना शेतकरी बांधवांना न्याय देता येत नाही.त्यामुळे आपले शेतकरी बांधव आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात.आत्महत्या का करावी लागत असेल हा प्रश्न आपल्याला पडणे स्वाभाविक आहे, परंतु त्यांचे दुःख हे त्यांना माहीत असते. कारण उत्तम दर्जाचे पीक घेण्यासाठी लागणारा पैसा हा त्यांनी कर्जरूपी घेतलेला असतो,आणि त्यामध्ये त्यांची तितकीच मेहनत लाभलेली असते.हे सर्व करत असताना अचानक संकट आले तर त्याचा त्यांना मोठा फटका बसतो आणि यातून सावरणे अवघड होऊन जाते.पाहिजे तसा मदतीचा हात ही अशावेळी लाभत नाही. मग त्यांच्यापुढे कोणताच पर्याय उपलब्ध नाही असे त्यांना वाटते, यामुळे आपल्या सर्वांचा पोशिंदा शेतकरी बांधव हा स्वतःच्या जीवाची, आपल्या मुलाबाळांची,कुटुंबाची पर्वा न करता आत्महत्या करत असतो.
दिवसरात्र शेतात राबून काबाडकष्ट करणारा आमचा शेतकरी बांधव या आपल्या कृषिप्रधान देशामध्ये सुखी राहू शकत नाही याचे अतोनात दुःख होत आहे.आपल्या शेतकरी बांधवांसाठी राजकारणी लोकांनी विशेष लक्ष देऊन त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना केल्या पाहिजेत,परंतु असे होताना दिसत नाही.केवळ आपल्या शेतकरी बांधवांचा राजकारणाच्या सोयीनुसार उपयोग केला जातो आणि त्यामध्ये आमचा शेतकरी बांधव हा भरडला जाताना दिसत आहे.संकटकाळी आपल्या शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई म्हणून मदत जाहीर केली जाते,परंतु ही मदत किती शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचली किंवा किती नुकसानग्रस्त शेतकरी बांधव मदतीपासून वंचित आहेत याचे निरसन होत नाही.फक्त मदत जाहीर करून आपला शेतकरी बांधव सुखी होऊ शकत नाही,तर खरोखर ही मदत प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना मिळते का? आणि मिळत नसेल तर ती का मिळाली नाही याची चौकशी होते का? तर अशी कोणतीही चौकशी केली जात नाही.नुकसान किती झाले याचा पंचनामा होत असतो,हा पंचनामा होत असतानादेखील काही त्रुटी आढळून येतात. स्थानिक पातळीवरील अधिकारी हे या सर्वास कारणीभूत असतात पण याची चौकशी केली जात नाही.या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे तसेच स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांवर वचक असणे काळाची गरज आहे. कारण जिथे नुकसान होते त्याची परिपूर्ण माहिती ही या अधिकाऱ्यांकडे उपलब्ध होत असते,त्यांच्याकडे उपलब्ध होत असणारी योग्य ती माहिती देणे बंधनकारक असले पाहिजे.तरच आपला शेतकरी बांधव हा खऱ्या अर्थाने सुखी होईल आणि त्याला योग्य तो न्याय मिळेल.
आमच्या शेतकरी बांधवांची दुःख,यातना जाणून घेऊन त्यांच्यासाठी योग्य ती कायमस्वरूपी उपाययोजना करता येईल का, याकडे लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे. आणि आपल्या देशातील प्रत्येक शेतकरी बांधवांना आत्महत्या करण्यापासून कसे वाचवता येईल आणि त्यांना योग्य तो न्याय कसा देता येईल, यादृष्टीने ठोस पाऊले उचलणे काळाची गरज आहे.आपला प्रत्येक शेतकरी बांधव हा कायमस्वरूपी दुःखातून आणि यातनेच्या विळख्यातून कसा बाहेर येईल याकडे बारकाईने लक्ष देऊन, त्यांच्या पदरी सुख कसे देता येईल, यासाठी मोठया प्रमाणात युद्धपातळीवर प्रयत्न होणे खूप गरजेचे आहे.तसेच शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना तयार करून त्या व्यवस्थितरीत्या अंमलात आणल्या गेल्या तर काही कालांतराने शेतकरी बांधव हा दुःखातून आणि यातनेच्या कचाट्यातून कायमस्वरूपी मुक्त होईल आणि कायमचा सुखी होईल,हीच अपेक्षा.

✍️कु.रोहित राजाराम काबदुले.
गाव :करंबेळे तर्फे देवळे,झोरेवाडी ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी.

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular