Homeसंपादकीयसंविधान दिनाचे औचित्य साधून वडरगे गावातील शाळेत माजी विद्यार्थ्यां कडून शालेय साहित्ययाचे...

संविधान दिनाचे औचित्य साधून वडरगे गावातील शाळेत माजी विद्यार्थ्यां कडून शालेय साहित्ययाचे वाटप

गडहिंग्लज -: लहानपणापासून आपण ज्या शाळेत शिकलो ती शाळा आपण मोठे झाल्यावर, पुढचे शिक्षण घेत असताना कुठेतरी मागे पडत जाते. गावातली मुलंही शिकून सवरून मोठी होतात. कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करतो तर कुणी नोकरी करीत असतो तर कोणी शेतकरी होऊन गावातच आपले उदरनिर्वाह करीत असतो. आताच्या पिढीकडे पाहिले तर ज्या शाळेत बालवाडीपासून शिक्षण घेतले त्या शाळेचे नावही आठवणार नाही. इतकेच काय, जर तो विद्यार्थी पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेला तर आपली पहिली शाळा कोणती हेही तो विसरून गेलेला असतो. अशी परिस्थीती आहे. परंतु याला अपवाद ठरले आहे वडरगे येथील शाळेतील माजी विद्यार्थी.

या विद्यार्थ्यांच्या विचारांतून आपण शाळेसाठी काय आणि कोणत्या प्रकारे मदत करू शकतो याचा सारासार विचार करून सर्वांनी एकमताने एक निर्णय घेतला. शाळेतल्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करायचे. यासाठी लागणारा निधी प्रत्येक विद्यार्थी आपापल्या उपजिविकेनुसार देईल असे ठरवण्यात आले.
मुलांच्या शाळेच्या बॅगा,वही,पेन, पेन्सिल, खोडरबर, गिरमिट असा एक बॉक्स शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचे ठरले.
२६ नेव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्य शाळेत जाऊन सर्व मुलांना वाटप करण्याचे ठरले.
महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमाची सुरुवात झाली. तसेच २६ / ११ या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या दहशती हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शालेय समिती अध्यक्ष आणि सदस्य, पालकवर्ग व गावातील सर्व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेतील शिक्षक तेली सर, यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत करून आपले मनोगत व्यक्त केले. तेली सर पुढे म्हणाले की, शाळेतून पास झाल्यावर मुलांनी शाळेला विसरून न जाता शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जपत हा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. अशी एक शाबासकीची थाप सरांनी माजी विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिली.

माजी विद्यार्थी अजित खवरे_ यांनी आपले विचार मांडताना म्हणाले की, आज जवळ जवळ आम्ही सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी वीस वर्षानंतर एकत्र आलो. यातूनच विचार करून, ज्या शाळेत आम्ही शिक्षण घेतले,जिथे आम्ही घडलो त्या शाळेचे आपण काही तरी देण लागतोय या भावनेतून शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा एकत्रितपणे निर्णय घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आम्ही १९९५ ते २००१ पर्यंत म्हणजेच सातवी पर्यंत येथे शिक्षण घेतले त्यावेळी शाळेची संपूर्ण पटसंख्या ३०० ते ४०० असायची. आज ज्या काही मराठी शाळा आहेत त्या अक्षरशः ऑक्सिजनवर आहेत म्हणजेच मराठी शाळा सुरू ठेवण्यासाठी एक प्रकारची लढाईच चालू आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. यासाठीही काही करता येईल का ? यावर आमची सर्वांची चर्चा झाली. यापुढेही आमच्या शाळेसाठी जी काही मदत लागेल ती आम्ही सर्वजण मिळून देण्याचा प्रयत्न करू असे मनोगत माजी विद्यार्थी अजित खवरे यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापक माळी सर, आपल्या मनोगतात म्हणाले की, शाळेतील ठराविक विद्यार्थ्यांना मदत न करता शाळेतील सर्वच मुलांना शाळेत साहित्य दिलात त्यामुळे तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे. अशा शब्दांत माळी सरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
शेवटी पोटे सरांनी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, पालक वर्ग आणि सर्व आजि – माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. अशा या सुंदर आणि स्मरणीय कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

आपण जिथे शिकलो, घडलो त्या आपल्या शाळेसाठी आपल्या हातून एक चांगले कार्य घडले याचा जणू काही महोत्सवच हृदयात ठेवून हसऱ्या चेहऱ्याने सर्व विद्यार्थी आनंदाने घरी परतले.

  • – विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
    ( विरार )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular