Homeघडामोडीसरपंच असावा तर असा……

सरपंच असावा तर असा……

भादवण पासून साधारण २ ते २.५ किमी वरील एक छोटेसे गाव, मासेवाडी……कधी उत्तूर ला जायचं झालंच तर मासेवाडी मार्गे जायचा योग येतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर जवळचा रस्ता म्हणून या मार्गाने जाणं व्हायचं बाकी मासेवाडीमध्ये काय आहे बघण्यासारखं ही भावना सर्वांचीच असायची. कच्चे आणि खराब रस्ते, त्यावरुन वाहणारे सांडपाणी, गटारांची असणारी कमतरता आणि त्यामुळे दिसणारी अस्वच्छता हे चित्र नेहमी आपण बघत आलो आहोत……पण आता तुम्हांला आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसू शकतो असं चित्र आपल्याला मासेवाडी मध्ये दिसेल जे बघून क्षणभर आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.
सिमेंट काॅंक्रिटचे रस्ते, डांबरी करण झालेले आणि होत असलेले रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झालेले गटारे… रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली झाडांची रोपे आणि ती जगावीत म्हणून त्यांच्या देखभालीसाठी केलेले कुंपण, वळणावळणावर अपघात होऊ नयेत म्हणून लावलेले मोठे गोलाकार बहिर्वक्र आरसे,. यावर कळस म्हणजे रस्त्यावर सि.सि.टि.व्ही कॅमेरे बसवले आहेत…..मुलांना खेळण्यासाठी छोटी बाग बनवली आहे…. यामध्ये खेळाचे साहित्य ठेवलेले आहे, इथल्या झुल्यावरती मुलं मस्त खेळत असतात बागडत असतात…..पिण्याची टाकी स्वच्छ आणि परिसर पण स्वच्छ आणि सुंदर ठेवला आहे. हालेवाडी पासून ते मासेवाडीपर्यंतच्या सगळ्या रस्त्यांवर दुतर्फा झाडे लावली आहेत… ( महत्त्वाचे म्हणजे कुठे ही विनाकारण झाडे तोडली गेलेली नाहीत ) स्मशानशेडकडे जाणारा रस्ता चांगला बनवला आहे, त्याला नाव पण छान दिले आहे वैकुंठभुमी, म्हणजे मृत्यू नंतरचा पुढचा प्रवास सुद्धा जणू सुखकारक केला आहे…..
आश्चर्य वाटलं ना पण हे सगळं आपल्या जवळच साकारल आहे , साकारत आहे……काल जेव्हा गावात जाण्याचा योग आला तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की इथला गावकरी आपला गाव सुंदर बनवण्यामध्ये झटला आहे…. काही लोक झाडांची निगा राखताना दिसले…रस्त्याकडची झुडपे तोडताना दिसले….रस्त्यावर कचरा गोळा करायला कचरापेटी ठेवल्या आहेत…आणि आश्चर्य म्हणजे त्यातला कचरा गोळा केला जात होता.( म्हणजे त्या फक्त नावाला ठेवल्या नाहीत)…. गावच्या मध्यभागी असलेलं माझी मासेवाडी माझा अभिमान ही अक्षरे आपलं लक्ष वेधून घेतात….

हे सगळं पाहत असताना ही किमया ज्यांनी केली ते सरपंच नेमके कोण असावेत हे जाणण्याचा मोह झाला….पण निराशा झाली कारण या माणसाचं बॅनरच नाही सापडलं कुठं…. म्हणजे हे एवढं अफलातून काम करणारा माणूस प्रसिध्दी पासून इतका अलिप्त कसा काय आहे….कारण आजच्या काळात सगळं काही मीच केलं आहे असा बडेजाव मारला जाणार्या काळात हा माणूस इतका नम्र आणि प्रसिद्धी पासून दुरच राहतो म्हणजे कमालच नाही का ?..
तिथल्या एका मित्राकडून सरपंचांचे नाव जाणून घेतले… श्री.पांडुरंग तोरगले हे आहेत या गावचे सरपंच….अतिशय प्रामाणिक आणि निस्वार्थी माणूस अशी तुमची ओळख मला करुन दिली तुमच्या गाववाल्यांनी.. (आपल्या गावकऱ्यांनी आपल्या माघारी इतकं चांगलं बोलावं आपल्याबद्दल हे भाग्य सर्वांना नाही मिळत ) सरपंच साहेब तुमचे आणि तुमच्या सर्व सहकारी सदस्यांचे खरंच खुप अभिनंदन. तुम्ही जे करत आहात ते करायचा कुणी विचार जरी केला तरी खुप झालं….इतर गावात पण या विचारांचे व कामाचे अनुकरण व्हावे या सदिच्छा व तुमच्या पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा…

  • हरीश दिवेकर ( भादवण , आजरा )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular