Homeमुक्त- व्यासपीठसह्याद्रीतील भुतं…

सह्याद्रीतील भुतं…

        आपण कोणी कधी सह्याद्रीची सफर करायला गेला आहात का ? कधीतरी जा. अगदी आपल्या कुटुंबासोबत जा, आपल्या मुला बाळांना घेऊन जा. तिथे गेल्यावर एक प्रत्यय नक्कीच येईल, त्यात आपण त्या सह्याद्रीच्या रांगेत वसलेल्या गडांवर राहायला गेलात तर मात्र आपली काही खैर नाही. अहो म्हणे तिथे सह्याद्रीची भुतं रात्रंदिवस वावरत असतात. बरं ही भुतं त्रास कुणालाच देत नाहीत, फक्त गडांवर चाळे करण्यास आलेल्या आणि दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या माणसांवर अक्षरशः आपला "चाळा" फिरवून मोकळे होतात. आपण कोकणातले असाल तर हा " चाळा " म्हणजे काय हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. तशी ही भुतं तिथं असलेल्या मंदिरांत रात्र झाल्यावर थोडीशी विश्रांती घेण्यास येतात. मंदिर नसेल किंवा मंदिर छोटं असेल तर हीच भुतं अथांग पसरलेल्या त्या निळ्याशार आभाळाखाली त्याचेच पांघरून आणि जमिनीला अंथरून बनवून पहुडलेली आढलतील.

कधीतरी रात्रीची हीच भुतं उठून भूतांसारखी सह्याद्रीत फिरत असतात. फक्त नी फक्त शिवकार्यासाठी.

सह्याद्रीच्या भुतांबद्दल सांगायचं तर, पहिल्यांदा त्यांच्यात लपलेला मावळा आपल्याला त्यांच्या अंतरंगात जाऊन शोधावा लागेल. तेव्हाच सह्याद्रीची ही भुतं समजून येतील.
आज गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांनी वसवलेल्या आणि घडवलेल्या गडकोटांच्या रक्षणार्थ आणि संवर्धनासाठी ही सह्याद्रीची भुतं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून, गडकोट जसे आहेत तसे राखण्यासाठी अपार मेहनत घेत आहेत.
हीच ती भुतं आहेत जी आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक भुताच्या सानिध्यात नेहमीच असतात. कुठल्याही भुताला काहीही मदत लागली तर हीच सह्याद्रीच्या कड्या कपारितली भुतं एकत्र येऊन त्याला मदत करीत असतात.

मला वाटतं आज आपण जे गडकोट पाहायला जातो. तिथे गेल्यावर गडाचे सौंदर्य पाहत असताना, तिथली प्रत्येक वास्तू किंवा वस्तू न्याहाळताना जी काही साफ सफाई दिसते ना ती सफाई याच सह्याद्रीतल्या भुतांनी केलेली असते. परंतु आपण तिथे गेल्यावर काय करतो, पाण्याच्या बाटल्या, खाऊचे पाकीट, लाज नसलेल्यांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या किंवा आपल्याकडून चुकून किंवा जाणूनबुजून जो काही कचरा होतो तो कचरा हीच भुतं साफ करीत असतात. हा कचरा करताना आपण कुठे आलो आहोत नी आपण काय करतोय याचे भानही काही लोकांना नसतं. मग काय, हीच भुतं मग असल्या लोकांच्या मागे लागतात अगदी “चाळा” बनून. मग हा “चाळा” तो माणूस गडाखाली पायउतार होत नाही तोपर्यंत एखाद्या “बायंगी” प्रमाणे त्याचा पाठलाग सोडत नाही.

अशी ही सह्याद्रीची भुतं सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यातून अखंडपणे, अविरतपणे आनंदाने शिवकार्य हाती घेऊन गडकोटांच्या रक्षणासाठी हरेक दुर्ग कसा सौंदर्यमय, नयनरम्य करता येईल याचा विचार करून, महिनोनमहिने संवर्धनासाठी मोहीम आखत असतात. यातूनच आज गडकोट जगाला उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळत आहेत. हेच आमचे परमभाग्य.

प्रत्येक मावळा संवर्धनासाठी तहान भूक विसरून काम करीत असतो. म्हणूनच आमचे दुर्गसेवक – आशिष पताळे-पाटील सर नेहमी म्हणत असतात-
एकच लक्षण, गडकोट संवर्धन.

जय शिवराय
विजय वैशाली दत्ताराम पराडकर-आण्णा
सह्याद्रीचा दुर्गसेवक-१७१८४
लेख-शब्द श्रेय- दुर्गसेवक-आशिष पताळे-पाटील सर

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular