आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आणि आज आपण 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, आपल्या देशाला स्वतंत्र अशी राज्यघटना नव्हती त्या वेळचे कायदे वसाहती सरकारच्या कायद्यावर आधारित होते, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होऊन भारत देशाची स्वतंत्र अशी राज्यघटना तयार करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 पासून घटना अमलात आणण्यात आली, त्याच दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आजच्या दिवसापासून भारतीय जनतेच्या हातात राज्य आले असं गृहीत धरण्यात आलं, मात्र स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे पारतंत्र्याच्या काळात बडे बडे संस्थानिक मोठमोठे राजकीय नेते स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेले, काही भाग न घेतलेले अशा अनेक विचारवंत लोकांच्या हातात या देशाची सूत्रे आली, 1952 ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली या देशाचा स्वतंत्र असा पंतप्रधान नेमण्यात आला आणि आता भारतीय जनतेला असं वाटलं की आपले वाईट दिवस संपलेले आहेत आपला देश स्वातंत्र्य झालेला आहे आपल्या देशातील प्रजेच्या हाती सत्ता आलेली आहे, मात्र तसे झाले नाही मूठभर लोकांच्या हातात या देशाची सूत्र देऊन येथे नांदत असलेली लोकशाही या लोकांच्या हातचे बाहुले झाली, आणि तमाम दीन दुबळा गरीब भारतीय माणूस खऱ्या स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेत राहिला, स्वातंत्र्य कशाबरोबर खातात हे माहीत नसलेल्या लोकांनी लोकशाहीचा, भारतीय स्वातंत्र्याचा, प्रजासत्तेचा, जयजयकार केला आणि स्वतःला स्वतंत्र समजून ही जनता या धूर्त लोकांच्या जाळ्यात अधिकच गुरफटत गेली, सुई न बनवणाऱ्या देशाने विकासाच्या बाबतीत चांगलीच मजल मारली मात्र ग्रामीण वैभव असलेले खेडे तिथला शेतकरी दिनदुबळा गरीब मजूर या लोकांची पार दैना करून टाकली, त्यात असणारे शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे ध्येय धोरण जशीच्या तशी स्वातंत्र्यानंतर ही ठेवली, जनसामान्य माणसाला राजकीय व्यवस्थेच्या पुढे ब्र शब्दही बोलता येत नाही अशी व्यवस्था करण्यात आली, राजकीय पुढार्यांच्या हातामध्ये असलेली सत्ता सामान्य माणसाला उपभोक्ता आली नाही हे खऱ्या अर्थानं दुर्दैवच म्हणावं लागेल, आज रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून प्रजासत्तेचा 74वा उत्सव आम्ही साजरा करत आहोत, या देशाने स्वातंत्र्यासाठी कामी आलेल्या आमच्या पूर्वजांच्या सांडलेल्या रक्ताच्या मोबदल्यात आम्हाला काय दिलं असं म्हणण्याची वेळ आज आलेली आहे, हे स्वातंत्र्य प्रजासत्ता शेतकऱ्यांना पचनी पडलेली नाही, आजही शेतकऱ्याला नवीन तंत्रज्ञान, काय पेरावं, कसं आणि कुठे विकावं याचं स्वातंत्र्य नाही, आम्हाला दिलेले अधिकार हे निव्वळ कागदावरच आहेत, या तिरंग्याची दोरी भ्रष्टांच्या हाती आली आहे संपूर्ण भारताची अस्मिता असलेला तिरंगा झेंडा फडकतो आहे की फडफडतो आहे हेच कळत नाही, म्हणून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सानंतरही हा देश खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालेला नाही….
. . संतोष पाटील
मुख्यसंपादक