हळदीकुंकू

गेले काही दिवस मृणालला चैन पडत नव्हती. थोड्या थोड्या कारणाने किंवा विनाकारणच तिचे डोळे भरून येत होते. तिच्या चेहर्‍यावर पण तिची उदासी अगदी ठळकपणे जाणवत होती.

तिची लेक रमा कावरीबावरी होऊन, तिचा नेहमीचा किलबिलाट करत नव्हती. सतत मृणालच्या अवतीभवती घोटाळत होती. आपल्या आईला काय झालेय ते तिच्या बालमनाला नीटसे कळले नाही तरी काहीतरी बिनसल्याची जाणिव तिला नक्कीच होत होती. तिची आजी देखील अशीच गंभीर होऊन वावरत होती. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या आसपास आपली आई अशीच वागते हे कधीतरी आजीला तिच्या देवळातल्या मैत्रिणीला सांगताना रमाने ऐकले होते.
आजीची तिच्याशी छान मैत्री होती. आई अॉफिसला गेली की ही शाळेत जाईपर्यंत त्या दोघीच तर असत घरात. आजी तिला खूप गोष्टी सांगायची. त्यातली बाबाच्या आतंकवाद्याशी झालेल्या लढाईची गोष्ट ती आजीला नेहमी सांगायला लावायची. आपला बाबा पिक्चरमधल्या हिरोपेक्षाही जास्त पॉवरफूल आहे याचा रमाला खूप अभिमान ही होता. पण ती पहिलीत गेल्यापासून आतापर्यंत म्हणजे जवळपास चार वर्षे बाबा घरी का आला नाही हे तिला काही कळत नव्हते. बर तो आला तर नाहीच पण पत्र देखील पाठवत नव्हता. फोनही करत नव्हता.
बाबा आधी असे कधीच करायचा नाही. तो तिच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन करायचाच. तिला खूप खेळणीही पाठवायचा. आताही आई आणि आजी तिचा वाढदिवस करतात पण त्यात मज्जाच नसते. आई तर सारखी सारखी डोळेच पुसत असते आणि का रडतेस विचारले की डोळ्यात कचरा गेला म्हणून सांगते. आपले घर इतके स्वच्छ असताना हा कचरा येतो कुठून आणि आईच्याच डोळ्यात कसा जातो याचे रमाला आश्चर्य वाटायचे.
जानेवारी महिना रमाला मात्र खूप आवडायचा. संक्रांतीचा तिळगुळ, गुळपोळी खाताना तिला एकदम मस्त वाटायचं. मग एकेका मैत्रिणीकडे हळदीकुंकू असायचं. परकरपोलका, गजरा घालून मैत्रिणींबरोबर खेळायला आणि येणाऱ्या बायकांना फूल, तिळगुळ द्यायला खूप मज्जा यायची.
रमाची आईपण आधी हळदीकुंकू करायची पण आता मात्र आपल्याकडे कधी करायचं हळदीकुंकू असं विचारले की आईचा चेहरा असा का होतो आणि आजी आपल्याला दुसऱ्या खोलीत का नेते हे कोणाला विचारावे रमाला कळेचना.
तिच्या मनात सारखे सारखे तेच विचार येत असत. तिची आई हळदीकुंकू करायची तेव्हा फोटोतल्या देवीसारखी सुंदर दिसायची. आई त्या दिवशी खूप आनंदात असायची या गोष्टी रमाला चांगल्याच आठवत होत्या. तिच्या मनाने असा विचार केला की आपल्याकडे हळदीकुंकू केले की आई परत देवीसारखी दिसेल आणि खूप आनंदात हसेल. पण हे करायचे कसे? तिला काही प्रश्न पडले की पूर्वी ती बाबाचा फोन आला की बाबाला विचारायची.पण बाबा नसला की मग ती स्वाती आत्याकडे सगळे प्रश्न विचारायची. स्वातीआत्या आणि काका दोघांची रमा खूप लाडकी होती शिवाय आत्या आणि रमाची आई मृणाल या शाळेपासून च्या मैत्रिणी होत्या.

संक्रातीनंतरच्या शनिवारी रमाला कसलीशी सुट्टी होती पण मृणालला मात्र अॉफिसला इंस्पेक्शन होते त्यामुळे घरी यायला उशीर होणार होता. रमा सकाळपासूनच मला आत्याकडे जायचय म्हणून हट्ट धरून बसली होती. शेवटी अॉफिसला जाताना मृणाल रमाला आणि आईंना स्वातीकडे सोडून मग अॉफिसला गेली.
तिकडे गेल्यावर रमा सारखी स्वातीच्या मागेमागे घोटाळत होती. तिला काहीतरी सांगायचय हे स्वातीच्या लक्षात आलेच. “काय ग काय झालेय? मला सांगणार ना तुझे सिक्रेट?” असे विचारल्याबरोबर रमाने तिच्या मनातले सगळे प्रश्न धडाधड विचारायला सुरुवात केली.आई सारखसारख का रडते, कुणी बोलावले तरी कुणाकडे कोणत्याच समारंभाला का जात नाही? घरात रमाचा वाढदिवस सोडून कोणताही समारंभ का करत नाही? आई आजकाल छान कपडे का नाही घालत ?कितीतरी प्रश्नांनी त्या बालमनात गर्दी केली होती “आत्तू आपण करायचं का ग आमच्या घरी हळदीकुंकू?” या प्रश्नाने रमाने आपली सरबत्ती थांबवली.
स्वातीला काय बोलावे हेच कळेना. ती झाल्या प्रकाराने सुन्न होऊन गेली. एवढ्याशा आपल्या भाचीच्या मनात काय काय चालू आहे हे कळल्यावर तिला भाचीची एकदम कणव आली. तिने रमाला पोटाशी धरले.” हे बघ बाळा, आता ही आत्तू आहेना ती सगळं काही छान करेल हं. तुला वाटतय ना तसे मस्तपैकी हळदीकुंकूपण करू आपण तुमच्या घरी. आता चला जेवायला. जेवून झोप थोडावेळ मग आपण ठरवूया हं काय काय करायचं ते उद्या हळदीकुंकवाला. ओके फाईन” स्वातीने रमाला गोष्टी सांगता सांगता जेवून झोपवले आणि ती आईपाशी येऊन टेकली.” काय गं, काय एवढं खुसखुसत होता ग दोघीजणी? “आई ने विचारलच. अग आपली रमाना सतत बोलत असते. हे असं का होतं आणि ते तसच का होतं. प्रश्न विचारून भंडावून सोडते अगदी! तुझ्यासमोरपण तोच तोफखाना चालू केलान् की काय? “
स्वातीच आईच्या बोलण्याकडे फारसं लक्ष नव्हत. तिच्या कानात रमाचाच आवाज घुमत होता.”आई ग रमाला ना आपल्याकडे हळदीकुंकू करायचय. “
“अरे बापरे, मग आता ग? हा राकेश लढता लढता पाकिस्तान्यांच्या ताब्यात गेल्यापासून त्याचा काही थांगपत्ता नाही. आपले सरकारही सतत एकच सांगत आहे मेजर राकेश यांचा पत्ता लागत नाही. ते बॉर्डरवर फायरिंग चालू असताना चुकून लाईन अॉफ कंट्रोल पार पडून गेले आणि परत आलेच नाहीत. आता आपण काय करायचं हेच कळत नाही ग! मृणालकडे तर पहावत नाही. माझ्यासाठी आणि रमासाठी तिने उभारी धरलेय. आम्ही दोघी एकमेकींच्या समोर सतत सगळं काही ठीक असल्याचे नाटक करतोय पण दोघीही पूर्ण पणे कोलमडून गेलोय ग! “रमाची आजी गदगदून रडायलाच लागली.
” हे बघ आई, आता आपण आपले दुःख बाजूला ठेवूया ना. दुःख तर मलाही झालय ग! तो माझा पण सख्खा भाऊ आहे! पण आत्ता आपल्यापुढे एकच उद्देश आहे. रमाचा आनंद! जे झालय त्यात तिचा बिचारीचा काय दोष? “
” खरतर कोणाचाच काही दोष नाही गं. आपलच नशीब वाईट म्हणायचं.” रमाच्याआजीने उसासा सोडला.
” हे बघ आई, माझ्या आणि मृणालच्या कॉमन मैत्रिणींना फोन करते. मृणालच्या माहेरी कळवते. आजूबाजूच्या बायकांना तू सांग. आपण ऊद्या आपल्याकडे हळदीकुंकू करूया. मृणालला मात्र काहीच सांगू नकोस हं. मी इथून सगळी तयारी करून आणते. सगळ्याच जणींना सहा वाजता यायला सांगू. मृणालला सरप्राईज देऊया. रमाला मी समजावते. तशी गुणाची आणि समजूतदार आहे ती. आईला सरप्राईज द्यायच आणि आपल्याकडे हळदीकुंकू होणार या विचारानेच रमा केवढी खुश होईल बघ. “
स्वाती म्हणाली तसच झालं. रमाही त्यांच्यात सामिल झाली. आईला काही सांगायचं नाही. हे चारचार वेळा बजावले होतेच स्वातीने.
संध्याकाळी घरी जाताना रमा खूप आनंदात होती. तिची अखंड बडबड चालू होती. आत्याने हे केलय आणि आम्ही ते खाल्लय अशी मज्जा केली. काकाबरोबर मी डबलसीट बाईकवरून फिरले. कित्ती नि काय सांगू असं तिला झाल होतं. रमाची आजीपण लेकीकडे जाऊन आल्यामुळे आनंदात होती. यांना अधूनमधून स्वातीकडे पाठवायला हवय. आपल्यामुळे या ही अडकल्यात. मृणाल मनातल्या मनात विचार करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळपासून रमा अगदी शहाण्या मुलीसारखी वागत होती. आपलाआपण अभ्यास केला. काही न बोलता भराभर जेवली. दुपारी झोपून उठल्यावर पटकन दुध प्यायली आणी मैत्रिणीकडे आपली खेळण्याची बॅग घेऊन पळालीसुद्धा! आत्याकडे जाऊन आल्यापासून रमा गुड गर्ल झालेय हं. असे म्हणत मृणाल रविवारच्या आठवड्याच्या कामाला लागली.
साडेपाच वाजल्यापासून रमाच्या आजीच्या सारख्या येरझारा सुरु होत्या. त्या त्यांच्या खोलीतून बाहेर हॉलमध्ये येऊन बसल्या. ही वेळ त्यांची पोथी वाचायची वेळ होती. आज मात्र त्यांचे लक्ष स्वातीच्या येण्याकडे लागले होते. पावणेसहाच्या सुमारास स्वाती आपल्या नवऱ्याबरोबर आणि छोट्या निमिषबरोबर हातात हे एवढे सामान घेऊन आली.. आल्या आल्या तिने मृणालचा ताबाच घेतला. “मृणाल आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. चल लवकर लवकर तयार हो.” असे म्हणत तिला लगबगीने बेडरूम मध्ये घेऊन गेली.
“अग हो, पण कोण येणार आहे? कितीजण येणार आहेत? मुख्य म्हणजे मला कोणाचा फोन नाही, मेसेज नाही आणि तुला कस काय कळलं की इकडे पाहुणे येणार ते?” मृणाल एकदम गडबडून गेली.
ते मी तुला नंतर सांगते. तू आधी तयार हो बरं. हे बघ ही साडी झकास आहे. चल हिच नेस.अगदी लंकेची पार्वती नको हं. जरा गळ्यातकानात घाल.”
“स्वाती मला सांग नक्की कोण येणार आहे. चेष्टा पुरे.” मृणाल घायकुतीला आली होती. तू मला सांग कोण येणार आहे ते मगच मी तयार होईन.”
मृणालचा निर्धार बघून स्वातीला सत्य सांगावेच लागले. मृणाल गप्प झाली.
“हे बघ मृणाल मला माहित आहे की तुला काहीही करायची ईच्छा नाही पण आपल्या रमासाठी तरी तू नाही म्हणू नकोस. अग खेळण्याच्या बॅग मध्ये परकरपोलका भरुन घेऊन गेलीय मैत्रिणीकडे. तुला सरप्राईज द्यायचं आणि हॅप्पी करायचं म्हणून. प्लीज तिचा हिरमोड करू नकोस गं.”
मृणाल काही क्षण शांत बसली. स्वातीचा चेहरा पाहून तिला गलबलून आले. आपल्या भाचीच्या आणि वहिनीच्या आनंदासाठी जर ती इतके करू शकते तर आपल्या लेकीसाठी आपणही हे करायलाच हवे. राकेशच्या बायकोने मुळूमुळू रडलेलं राकेशलाही नाहीच आवडत. मृणालने डोळे पुसले आणि तिने छान साडी नेसली. स्वातीने आणलेला गजरा माळला आणि ती स्वातीबरोबर बाहेर आली.
तेवढ्या वेळात स्वातीच्या नवऱ्याने आणि मृणालच्या सासूबाईंनी मिळून सगळी तयारी केली होती. “आई तुम्हीपण यात सामिल आहात ना? तरीच कालपासून रमा इतकी खुश होती. सकाळपासून नुसती बागडतेय.” मृणाल आणि स्वातीचा हसरा चेहरा बघून आईंचा जीव भांड्यात पडला.
तेवढ्यात बेल वाजली. आणि छान परकरपोलका घालून नटलेली रमा मैत्रिणीबरोबर घरात शिरली. आत्तुच आणि माझ सरप्राईज म्हणून आईला बिलगली.
” रमा, आईला सांगितलं नाहीस ना काही! असं करतात का? “मृणालने असे म्हणताच रमाचा चेहरा पडला. पण लगेचच मृणालने तिच्या गालांची पापी घेऊन तिच्या आणि मैत्रिणीच्या हातावर तिळगुळाचा लाडू ठेवला.
एकेककरून सगळ्याजणी जमायला लागल्या सगळे घर भरून गेले.
रमाच्या आनंदाला तर उधाण आलं होतं. येणाऱ्या प्रत्येकीला फुलं आणि अत्तर लावायचं काम तिने शेवटपर्यंत अगदी न कंटाळता केलं आपण इतरांकडे जातो तशा आज आपल्या मैत्रिणी आपल्या घरी आल्या आणि आज आपली आई आणि आजी खूप हसतायत. आई परत फोटोतल्या देवीसारखी दिसतेय याचा त्या बालजीवाला विलक्षण आनंद झाला होता.
मृणालही मैत्रिणींच्या सहवासात आपले दुःख कुरवाळत बसली नाही. नेहमीच गंभीर चेहऱ्याने वावरणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर हसू बघून स्वातीलाही खूप बरे वाटले. नाही म्हटले तरी तिलाही टेंशन आले होते.
कोणीतरी भोचक शेजारणीने राकेश चा पत्ता लागला का? असे विचारलेच पण शेजारच्या काळे आजींनी परस्पर उत्तर देऊन तिला वाटेस लावले.रमाला,मृणालला आनंदात पाहून तिच्या आईआणि वहिनीलाही खूप बरे वाटले. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून आम्हाला काळजी नाही. मृणालच्या आईने स्वातीजवळ म्हटलेदेखील.
सगळ्याजणी आपापल्या घरी गेल्या. रमाही दमून झोपली. स्वातीचा लेक आणि नवरा पण घरी गेले. स्वाती आणि मृणाल आवराआवरी करून कॉफीचा मग हातात घेऊन गच्चीत जाऊन बसल्या. इतका वेळ शांत असणाऱ्या मृणालच्या डोळे राकेशच्या आठवणीने वारंवार भरून येत होते.
“तुला आठवतं स्वाती, माझ्या पहिल्या संक्रातीला राकेशला सुट्टी असल्याने घरीच होता. त्याने आणि आईंनी हौसेने हलव्याचे सगळे दागिने घरी केले होते. हातात रायफल घेऊन वावरणाऱ्या त्याच्या हातात नाजूक हलव्याचे दागिने पाहून मी हरखून गेले होते. तो म्हणजे उत्साहाचा धबधबा होता. सगळ्यांना चिंब भिजवून टाकायचा. मला नेहमी म्हणायचा हे बघ, मी शिपाई गडी मला कधी बोलावणं येईल सांगता येत नाही. त्यामुळे मी मला मिळणारा प्रत्येक क्षण उपभोगून घेतो. तुही तेच कर. आपण एकत्र असतानाचा प्रत्येक दिवस मस्त आठवणींच्या कप्प्यात साठवून ठेव. तिथे पोस्टिंगवर असताना फोनवरून कविता ऐकवायचा. त्याच्या त्या भसाड्या बेसूर आवाजात’ मुन्नी बदनाम हुई ” म्हणायचा. कसलेतरी जोक्स सांगून हसवायचा. आणि अचानक संक्रातीच्या दिवशीच त्याच्या मोठ्या अॉफिसरांनी त्याच्या नाहिशी होण्याची बातमी कळवली. सुरुवातीचं वर्षभर मला सारखं वाटायचं आत्ता फोन वाजेल आणि राकेश मिळाल्याची, सुखरूप असल्याची बातमी मिळेल. पण गेली चार वर्षे मी त्याच्या फोनची वाटच बघतेय. रोज आंघोळीनंतर टिकली लावताना आणी मंगळसूत्र घालताना हात थरथरतो. बुद्धीला पटत नाही. स्त्री ने या पारंपारिक विचारातून बाहेर यायला हवय. नवऱ्याच्या असण्यानसण्यावर आपण काय परिधान करायचे हे ठरवायला नको हे सगळ मान्य आहे पण तरीही माझी घालमेल होतेच ग. मला ना स्वामी कादंबरीतल्या पार्वती ची आठवण येते. सदाशिवराव पेशवे पानिपतच्या लढाईवरून परत आलेच नाहीत तरीही ती पार्वती सौभाग्यालंकार घालून त्यांच्या येण्याची सतत वाट पाहायची. माझी पण तशीच पार्वतीसारखीच अवस्था आहे का ग? राकेश बेपत्ता झाल्यानंतर एकदोन वर्षे मला बायका हळदीकुंकवाला बोलवत पण नंतर नंतर त्या मला टाळायला लागल्या. जणू मी त्यांना कुंकू लावले तर त्यांच्या सौभाग्यावर घाला येणार आहे. राकेश एकदाच बेपत्ता झालाय पण माझं मन वारंवार रक्तबंबाळ होत असतं. काय करू गं आता ना मला हे सगळे सहनच होत नाही म्हणूनच मी समारंभाला जाणच टाळते. यापुढे मात्र मी ठरवलय रमासाठी तरी मी बदलेन. छान आनंदात राहीन. सगळे सण साजरे करीन. रमाला राकेशची उणिव भासणार नाही यासाठी नक्की प्रयत्न करेन. राकेश सुखरूप असेलच आणि तो परत आल्यावर त्यालाही प्रसन्न हसणारे घरच पाहायला मिळेल यासाठी प्रयत्न करेन..”

https://youtu.be/yB9ua3il8vs


स्वातीचे डोळेही सतत वाहात होते.” मुन्नी काय करु ग, मला ना रमाचा तो केविलवाणा चेहरा पाहावतच नव्हता. तुझी घालमेल मला जाणवायची ग. काय करू सुचतच नव्हते पण मग रमासाठीच मी हा खटाटोप केला. खरच मनापासून सॉरी. तुला दुखवायचं नव्हत ग मला. आपल्या पिढीची ना फूल गोचीच झालीय ग. या चुकीच्या रुढी परंपरा फोल आहेत, बदलायला हव्या आहेत बुद्धीला पटत ग पण मन मात्र अजूनही त्यात अडकून राहात. परंपरांच जोखड खांद्यावरून झुगारून द्यायला अजून अनेक पिढ्या लागतील. पण आता आपण रमाला समजावूया. या हळदीकुंकवाच्या समारंभातला फोलपणा तिला जाणवायलाच हवा. तिला आपण उद्याची प्रगल्भ विचारांची स्त्री नाही माणूस म्हणून घडवूया.राकेश आज ना उद्या येईलच बघ परत पण तू आणि अशा सैनिकांच्या बायका या अखंड भाग्यवान आहात. तुमचे पती देशासाठी एखादी लढाई लढतात तुम्ही मात्र रोज लढता आणि आपल्या घराचे रक्षण करता. “
खाली हॉल मध्ये कुंकवाची कोयरी मात्र जो पर्यंत पारंपरिक विचार करणाऱ्या बायका आणि पुरुष समाजात आहेत तोपर्यंत आपल्याला अढळ स्थान आहे म्हणून निर्धास्त होती.

  • डॉ. समिधा गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular