सकाळीच whatsapp उघडल आणि एका मित्राचं स्टेटस पहिलं की आपल्या सर्वाचे प्रिय घाटगे सर आपल्याला सोडून गेले… भादवण हायस्कूल मध्ये खुप वर्षे कार्यरत असलेले घाटगे सर इंग्रजी चे शिक्षक.. सरांच इंग्रजीत भारी प्रभुत्व.. त्यांची शिकवण्याची पद्धतच वेगळी.. प्रत्येक विद्यार्थ्यांवरती वैयक्तिक लक्ष असायचं सरांचं.. शिकवताना असं शिकवायचे की ते प्रत्येक विद्यार्थ्यांला समजलंच पाहिजे..
1999-2000 ची गोष्ट आम्ही नववीत होतो. सरांचा मेन विषय इंग्रजी पण ते आम्हाला इतिहास व नागरीक शास्त्र शिकवायचे . सहामाही परीक्षा झाली दिवाळीची सुट्टी पण संपली आणि शाळा सुरु झाली. त्यावेळी सरांनी सगळ्यांच्या वह्या तपासायचं ठरवलं प्रत्येकाची वही तपासत सर माझ्या जवळ आले आणि माझी वही बघत होते. त्यांनी माझी वही पहिली आणि एक स्मितहास्य देऊन पुढे जाऊन फळ्याकडे तोंड करुन उभ रहायला संगितले. मला आता समजलं होत की आज आपली काही खैर नाही. सगळ्या वर्गाच्या वह्या तपासल्या नंंतर सर माझ्या जवळ आले.सगळ्या वर्गात मी एकटाच सापडलो याचं खुप वाईट वाटत होत पण ते फार काळ टिकलं नाही. येताना सरांनी सोबत अजुन एक माझाच मित्र संजय बाटे त्यालाही आणलं होतं आणि माझ्या बाजुलाच उभा केलं होतं.. आता माझ्या सोबतीला अजुन कोणी तरी आहे याचा आनंद ही होता.. पण तोही फार काळ टिकला नाही. तर झालं होत असं की शाळा सुरु होऊन सहा महिने झाले, परीक्षा संपली, दिवाळीची सुट्टीही संपली तरीपण माझ्या नागरीक शास्त्राच्या वहिची फक्त दिड पानं भरली होती आणि मित्राची दोन पानं.. सरांच्या शिक्षकी कार्यकाळात असा कारनामा कोणी केला नसेल तो त्यावेळी आम्ही केला होता. त्यादिवशी सरांनी ड्रम च्या काठीने (ती काठी पण आम्हालाच आणायला लावलेली) आमच्या लवण्या (गुडघ्याच्या पाठीमागील भाग) सुजवल्या होत्या. सरांचा मार खाण्यात पण एक वेगळीच मजा होती कारण मार देताना सर आपल्याला seriously मारत आहेत अस वाटतच नसायचं, तरी पण तो मार आजपर्यंत आमच्या आठवणीत आहे.. पण घाटगे सर ते घाटगे सरच दुसर्या दिवशी अगदी आपुलकीने त्यानी आमची विचारपूस केली केसरकरा जास्त लागलं नाही ना रे.. आणि गधड्यांनो अभ्यास करा शहाणे व्हा आणि खुप मोठे व्हा असा आपुलकीचा सल्ला पण दिला.. असे हे घाटगे सर जेवढे कठोर तेवढेच प्रेमळ.. सरांनी आपलं अर्ध आयुष्य, आमचं अर्ध भादवण घडविण्यात घालवलंय.. त्यांच्या हाताखालून शिकुन गेलेले विद्यार्थी आज सातासमुद्र पार जाऊन आपल आयुष्य घडवत आहेत… याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.. गावी गेल्यावर आजरयाला गेलो असता कधी भेटले तर आवर्जुन विचारपूस करायचे.. मागे महिन्याभरापुर्वी आमचे गोविंद पाटील साहेबांनी सरांची राहत्या घरी भेट घेउन आपल्या आठवणींना उजाळा देत सरांचा एक फोटो ग्रुप वर शेअर केला होता. त्यावेळी सरांची तब्येत खालावलेली वाटत होती. तर असे आमच्या सर्व माजी विद्याथ्यांचे लाडके घाटगे सर आज आपल्यात नाहीत.. आम्हा सर्वांकडून सरांना भावपुर्वक आदरांजली…
सर तुम्ही कायम स्मरणात रहाल..
आपलाच एक विद्यार्थी..
महेश केसरकर..
मुख्यसंपादक