Homeमुक्त- व्यासपीठहे विठ्ठला ….

हे विठ्ठला ….

हे विठ्ठला…
विठ्ठल विठ्ठल म्हणत, तुझ्या नामाचा जयघोष करत वारकरी दरवर्षी तुझ्या दारात येतो रे…
आता तरी कमरेवरची सोड ती दोन हाताची ठेवण आणि कधीतरी त्याच्याही दारात जाऊन उभा राहा…
हवं तर घे संगतीला तुझ्या रखुमाईला,
दाखव तिला त्याच्या घरात राब राब राबणारी ती माऊली…
सांग तिला तुझा राया इतकी वर्ष माझ्यापाशी आला आज आम्ही तुझ्याजवळ आलो आहोत…

बघ तिच्या डोळ्यांत डोळे घालून, देव घरी आला म्हणून बघ तिची चाललेली धावपळ…..
एकदा नजर फिरव तुझ्या भक्ताच्या घरावरून आणि मोडकळीस आलेल्या वास्यावरून…
तुटलेल्या कौलांच्या छिद्रातून डोकावणाऱ्या कवडस्याला विचार ठणकावून का इतकी वर्ष रोज येतोस तू इथे…?
सांगेल तुला तो, वारकऱ्यांच्या घरातील व्यथांना उजळवून टाकण्यासाठी…
म्हणेल तो, रोजच यांची धावपळ आणि सळसळ चालू असते सकाळच्या पारापासून…

रुक्मिणीला सांग एकदा त्या घरातल्या रुख्मिणी बरोबर शेताच्या बांधावर जाऊन बघ…
मग दिसेल तिथे त्यांच्याच कर्माने जगविलेल्या जमिनीतील हिरवी पंढरी…
पाण्याने व्याकूळ झालेल्या दगडांच्या एकसंधाने चिकटून त्या बापाला साथ देणाऱ्या बघ त्या विहिरी…
डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या तर त्या माऊलीच्या पदराने पुसून काढ…
तिलाही कळेल माझ्या भक्तीचा पाझर आज माझ्याच शेतात गहिवरून श्वास घेतोय…

जेव्हा निघाल पुन्हा परतण्यासाठी तेव्हा तिथलीच माती तुझ्या पंढरीत घेऊन जा…
उधळवून टाक साऱ्या पंढरपुरात आणि सांग जगाला ओरडून ही माती माझ्या खऱ्या पंढरीची आहे…
इथे, इथे मी जाऊन आलोय, बघून आलोय या मातीची किंमत आणि हीच माती घडवणाऱ्या हातांची हिम्मत…
येऊन उभा राहा परत कमरेवर हात ठेऊन विटेवर भक्तांना दर्शन द्यायला आणि बघत रहा फक्त तुझी गजबजलेली पंढरी अन् ते पंढरपूर….

विजय वैशाली दत्ताराम पराडकर- आण्णा
( विरार )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular