Homeमुक्त- व्यासपीठ○ मानसिक आणि शाब्दिक बलात्कार

○ मानसिक आणि शाब्दिक बलात्कार

                 आज खूप दिवसांनी उसंत मिळाला म्हणून निवांत घराच्या पायरीवर बसले होते. थोडासा वेळ मिळाला म्हणून म्हटलं मोबाईल घ्यावा हातात. तेवढ्यात समोरून तिथे आरुषी धावतच माझ्या दिशेने आली आणि हापत हापतच म्हणाली, ताई ताई तुला एक गोष्ट सांगायची आहे" एकदम रडवेल्या आवाजात ती माझ्याशी बोलत होती नक्कीच काहीतरी गंभीर आहे हे मला जाणवलं. काय आरू काय झालं अशी घाबरलीस कशाला ? 

कुणी काही बोललं का तुला ?
घरात वाद झाले का ?
नाही, नाही अशी मान हलवत ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते मी तिला पाणी दिले.पाणी देऊन तिला मी थोडा वेळ शांत केले आणि मग म्हणाले, आता बोल काय झालं आहे; एवढी घाबरली का आहेस?
थोडी शांत झाल्यावर ती म्हणाली, ताई मी आपल्या रोजच्या रस्त्याने चालत येत होते. तर त्या कोपऱ्यावरची टवाळकी मुलं मला वाटेल तसं बोलत होते. ताई त्यांच्या बोलण्यानं मी घाबरले ते माझ्या मागे मागे माझा पाठलाग करत होते. बोलता बोलता तिला रडू आवरलं नाही आणि ती ढसाढसा रडू लागली. काय गं आरु ती मुलं तुझी छेड काढत होते तर तू का घाबरलीस, त्यांना प्रत्युत्तर का नाही दिलंस.
ताई मी इतके घाबरले की, मी धावतच तुझ्यापाशी आले आणि ताई तिथे पाच सहा मुलांचा समूह होता त्यांना मी एकटीने कशी काय सामोरे गेले असते तूच सांग ना ? ताई आता मी रस्त्याने एकटी कधीच जाणार नाही मला खूप भीती वाटत आहे. त्यांच्या त्या शब्दांचा मला खूप त्रास होत आहे. एकटी मुलगी दिसली की तिची छेड काढायची, तिला काहीबाही बोलायचं यातच ते पुरुषत्व गाजवत असतात; पण आपण घाबरायचं नाही आरु. आरुला शांत करीत मी तिला माझ्याजवळ बसविले. ती खूप जास्त घाबरली होती. शरीर थंड पडले होते, हात पाय थरथरत होते. आईला घरी जाऊन सांगू शकत नव्हते ती समजून घेणार की नाही घेणार या प्रश्नात ती अडकली होती.

तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवत माझी विचारांची तंद्री लागली. बलात्कार हे नाव ऐकताच अंगावर काटा उभा राहतो मनात तेवढाच क्रोध, संताप निर्माण होतो. काही क्षणाच्या सुखा पोटी एखाद्याच्या आयुष्याची राखरांगोळी होते. या गोष्टींना कधी आळा बसणार का ? मुली चंद्रावर गेल्या पण त्यांच्यावर घडणारे हे जीवघेणे छळ कधी बंद होणार काय माहीत ?
बलात्कार हा नेहमी शारीरिक होतो असे नाही. कधी कधी मानसिक बलात्कार केला जातो तर कधी कधी शाब्दिक बलात्कारही केला जातो. आता तुम्ही म्हणाल मानसिक बलात्कार आणि शाब्दिक बलात्कार हे कसं काय ?
अहो एखाद्या रस्त्याला जाताना मुलींची एखाद्या मुलानी छेड काढली तिला अश्लील बोलला की मनाला किती आरपार जखम होते हे कधी अनुभवले आहे का ? पाहिलाय का कधी ?
प्रतिकार केलाय का या गोष्टीचा ?
हे ज्याच्यावर घडते ना त्याला समजते.

रस्त्याने जाताना आजूबाजूला नजर फिरवली ना तर तुम्हाला दिसेल, शाब्दिक आणि मानसिक बलात्कार रोज रोज केला जातो. कुणी विकृत, हो मी त्या व्यक्तीला विकृतच म्हणेन शब्दांनी एखाद्या महिलेची छेड काय काढेल, काही शब्दांची चिखलफेक काय करेल यात काही मुली अशीही असतील की त्या त्यांचा प्रतिरोध करतील पण काहीच मुली असे करताना दिसतात. सर्वच नाही, काहीजण हे फक्त सहन करतील. रोड रोमिओ काही कमी नाही आहेत. अहो आता शाब्दिक आणि मानसिक बलात्कार हा फक्त रोडवर होतो असं नाही बरं, येता जाताच मुलींची छेड काढली जाते असं नाही काही.

कधी शेजारी अगदी आपल्या घरातसुद्धा असं होते. हल्ली नात्यांची ओळख राहिलीच कुठे हो !!
मला अजूनही आठवते नात्याने काका असलेल्या अनन्याचे सख्खे काका तिला हात लावण्याची एकही संधी सोडत नसे. पण काकांविषयी आई आणि बाबांना कसं सांगणार. ते आपल्यावर विश्वास नाही ठेवणार या भीतीपोटी ती आयुष्यभर हे सगळं सहन करत बसली. मानसिकरीत्या ती पूर्णपणे ढासळली होती. अगदी ती समोर दिसताच जणू काही त्याच्यातला राक्षस जागा व्हायचा. ये गं माझ्या मांडीवर बस, तू खूप छान दिसतेस, माझी आहेस ना तू, असे शब्द वापरत असे तो विकृत माणूस. काका आहेत म्हणून या सगळ्या गोष्टींकडे तिचे आईबाबा दुर्लक्ष करत. त्यांचं अनुवर खूप प्रेम आहे असे त्यांना वाटे. पण हे प्रेम नाही, ही त्याची वासना होती आणि या वासनेने नात्यांचा बळी जात होता.
एका मुलीला, एका बाईला रोज रोज अशा गोष्टींना सामोरे जावे लागते. का ? तर ती फक्त एक बाई आहे म्हणून !!
पुरुषत्व गाजवायचा असेल ना तर एका स्त्रीला सन्मान देऊन बघा. अहो, आपल्याच मुळे आपल्या समाजात राहणारी स्त्री, आपली मुलगी, आपली बायको, आपली आई सुरक्षित नाहीये. अहो, शारीरिक बलात्कार वाईटच, खूप वाईट, अतिशय वाईट पण तेवढाच शाब्दिक आणि मानसिक बलात्कारही वाईट हो.
अश्लील शब्दाचा गोळीबार करणे म्हणजे बलात्कारच होत असतो नेहमी, रोज, काल, आज, उद्या, रोज होत आहे.

या सर्व गोष्टींवर कायमचा प्रबंध करायचा असेल तर मुलींनी, महिलांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःच सक्षम बनले पाहिजे. मूल लहान असल्यापासून त्याला किंवा तिला समाजात कसे वावरावे याचा धडा आई वडिलांकडून घरातूनच मिळायला हवा तरच मुलं मोठी झाल्यावर सर्वांचा आदर करतील, सन्मानाने जगतील.

लेखिका…
नेहा नितीन संखे
( बोईसर )

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular