Homeवैशिष्ट्येआई की माय ?

आई की माय ?

मिट्ट काळोखात मिणमिण करणारा दिवा सरस्वतीच्या घरातला काळोख अधिकच गडद करत होता. तिची जुळी मुले काही वेळापूर्वीच उपाशी रडतरडत एकमेकांच्या उबेत फाटक्या चादरीखाली झोपली होती. सरस्वती आपल्या नशीबाला बोल लावत डोक्याला हात लावून नवऱ्याच्या घरी येण्याची वाट बघत होती. गावात सतत दुष्काळ पडायचा म्हणून ती दोघं मुंबईत आलेली. तशी दोघेपण थोडीफार शिकलेली पण त्या अर्धवट शिक्षणाचा नोकरीसाठी उपयोग नव्हता. त्यांचे जेमतेम भागत असे. महिना अखेरीचे चारपाच दिवस तर तंगीचेच असायचे. या महिन्यात तिचे एक काम सुटले. नवऱ्याच्या हातून कामाच्या ठिकाणी काहीतरी चूक झाली आणि त्याच्या मालकाने पगारातून पैसे कापून घेतले. त्यामुळे फारच ओढाताण होत होती. आज घरात काहीच खायला नव्हते. त्यात भर म्हणून सरस्वतीला सकाळपासून कोरड्या उलट्या होत होत्या. आपल्याला मोठा काही आजार तर नसेल ना? आपल्याला काही झाले तर मुलांचे काय होईल?
भिंतीला टेकून बसलेल्या तिच्या मनात नाही नाही ते विचार सुरू होते.
एकीकडे ती नवऱ्याची वाटही पहात होती. थोड्याच वेळात तिचा नवरा आला. येताना त्याच्या हातात सामानाच्या पिशव्या बघून तिचा जीव सुपाएवढा झाला.
” सामान आणायला कोणी पैसे दिले? साहेबांनी आगाऊ पैसे दिले काय? कोणी मित्राने उधार दिले?”

“अग हो! किती प्रश्न विचारशील. पोरांनी काही खाल्ले नसेल ना? आधी काहीतरी बनव. त्यांना खायला दे. आपण पण खाऊया. एके ठिकाणी संध्याकाळचे काम मिळालेय. रोजचे पैसे रोज देणारेत. आजच्या मिळालेल्या पैशात हे आणलय. “

खायचे पदार्थ पाहिले आणि सरस्वतीची मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. तिने चटाचटा आमटी भात केला. आमटीच्या आणि शिजणाऱ्या भाताच्या वासाने मुले जागी झालीच. तिने आधी मुलांना आणि नवऱ्याला खाऊ घातले आणि स्वतः जेवायला बसली. पहिल्या एकदोन घासांनंतर तिच्या पोटात पुन्हा ढवळायला लागले. तरीही दडपून तिने चार घास खाल्ले पण पाचव्या मिनिटाला सारे उलटून पडले. राजूच्या, तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. “काय ग सरे? काय होतय?”
. “काही नाही हो, जरा पित्त झालय सकाळपासून.” सरस्वती म्हणाली.घरगुती औषधे घेऊनही
पुढचे चार पाच दिवस तिच्या उलट्या कमी होईनात. तिला काळजी वाटू लागली. आता दवाखान्यात जायचे म्हणजे पैसे हवेत. जरी दवाखाना सरकारी असला तरी थोडे पैसे लागणारच! असा विचार करतच ती कामावर निघाली. चार घरचे धुण्या भांड्याचे काम ती करायची. तेवढाच घराला आधार! त्यात कोणी काही द्यायचे. जुने कपडे, शिल्लक अन्न, इतर काही सामान. त्याचाही उपयोग व्हायचाच. या लोकांमध्ये वावरून ती प्रयत्नपूर्वक शुद्ध बोलायला देखील शिकली होती.मुलेही शुद्ध बोलायला शिकत होती.

प्रधानांच्या घरची बेल वाजवताना तिच्या डोक्यात उलटसुलट विचारांचा गुंता सुरू होता.
प्रधानवहिनींनी दार उघडले. त्यांचा चेहरा बघून सरस्वतीच्या मनात चर्ऽर झाले. “काय झालं वहिनी? तुमचा चेहरा असा का दिसतोय? तुम्ही रडत का होतात?” हिच्या प्रश्नांनी रेवती प्रधानला आणखीनच रडू यायला लागले. पण ती काही न बोलताच आत गेली. थोड्याच वेळापूर्वी रेवतीची प्रेग्नन्सी टेस्ट पुन्हा निगेटिव्ह आली होती.
सरस्वती आपली नेहमीची कामे भरभर करू लागली. एकीकडे उलट्यांनी बेजार झाली होती तरी खाडा नको म्हणून ती तशीच दडपून कामे करत होती. मनात प्रधान वहिनींचाच विचार सुरू होता.
थोड्या वेळाने रेवती किचनमध्ये गेली. तिने दोघींसाठी चहा केला. आता ती जरा सावरल्यासारखी वाटत होती.
चहा प्यायल्यावर पुन्हा सरस्वतीला उलटी झाली.
“काय ग? केव्हापासून होतायत उलट्या?” रेवतीने विचारले.
“झाले की सातआठ दिवस. आधी इतका नव्हता पण दोन दिवसांपासून जास्तच त्रास होतोय बघा.”

“तुझी पाळी येतेय नं वेळेवर?”

“अं!! म्हणजे..” सरस्वती अडखळली. तिने मनातल्या मनात हिशोब केल्यावर तिच्या अचानक लक्षात आले की तिची नेहमीची तारीख उलटून पंधरा दिवस झाले आहेत.
आता ती मनातनं हादरली. म्हणजे आपण पुन्हा?.
” वहिनी, तसे पंधरा दिवस उलटलेत. पण मी तांबी बसवलेय. तसं काही नसेलच. “ती स्वतःचीच समजूत काढल्यासारखी म्हणाली.

“हे बघ माझ्याकडे घरच्या घरी प्रेग्नन्सी तपासायची किट आहे. आपण बघूया तर खरं!”

टेस्ट पॉझिटिव्ह होती. सरस्वती खरोखरच गरोदर होती..

रेवतीच्या मनात क्षणभर असूया निर्माण झाली. आपण गेल्या सात आठ वर्षात इतके डॉक्टर, वैद्य, नवस , गंडेदोरे केलेयत पण आपल्याकडे पाठ फिरवलेल्या नशीबाने हिला हे दान इतक्या सहजपणे दिले!!

आपण गरोदर आहोत यावर सरस्वतीचा विश्वास बसेना. हे असं कसं झालं? तांबी बसवलेली असताना! काय करायचं आता? हे मूल आपण कसे जन्माला घालणार? आपल्याला दोन मुले सांभाळणे अशक्य असताना जुळी झाली. देवाची मर्जी असे समजून आपण त्यांना जन्माला घातले. त्यांनाच धड सांभाळता येत नाही. अनेकदा भाकरी असते तर भाजी नाही अशी परिस्थिती असते. वेळेला त्यांना पोटभर अन्नसुद्धा मिळत नाही.लाड पुरवायचे तर दूरच राहिले. आता तिसरे मूल जन्माला घालायचे आणि त्याच्या पोटाला काय घालायचे? आधीच पहिल्या दोनांवर पण आपण अन्यायच करतोय. याच्यावर कशाला अन्याय करा?
मन आणि पोट यातील लढाईत पोटाचा जय झाला. आधी पोट मग जमलच तर मनबीन. हे तिच्या परिस्थितीने तिला चांगलेच शिकवले होते. मूल नको हा निर्णय तिने काही मिनिटात घेतला.
” वहिनी जास्त दिवस झाले नसतील. मी उद्याच सरकारी दवाखान्यात जाते आणि मोकळी होते. सध्याच्या परिस्थितीत मला तिसरे मूल परवडणारच नाही.फक्त दोनतीन दिवसाची रजा द्या. पाहिजे तर खाडा कापून घ्या. हे निस्तरुन मी येतेच परत.”
परिस्थितीमुळे देवाने दिलेले दान स्विकारता येत नाही याबद्दल सरस्वतीला वाईट वाटत होतं. आपण किती पटकन मूल नको हा निर्णय घेतला याचे वैषम्यही वाटत होते. तिला स्वतःच्या परिस्थितीचा रागही येत होता. देव पण कसा आहे. आपल्याला नको असताना देतोय आणि प्रधान वहिनींना हवे असताना देत नाही. देवाच्या मनात काय आहे त्यालाच ठाऊक.

रेवतीच्या मनात वेगळेच विचार येत होते. मनाशी काहीतरी ठरवून ती सरस्वतीला म्हणाली “चल मी तुला माझ्या डॉक्टर मॅडमकडे नेते. त्यांच्याकडून तुला तपासून घेऊ.”

“नको वहिनी मी जाईन सरकारी दवाखान्यात. मला तुमच्या मॅडमची फी कशी परवडणार?”

“अग त्याची काळजी करू नकोस. मी भरेन बील. तू चल. “
सरस्वती नाही म्हणत असताना देखील रेवती तिला तिच्या गायनॅकॉलॉजिस्ट कडे घेऊन गेली. त्या मॅडमनी पण सोनोग्राफी करून सरस्वती प्रेग्नंट असण्यावर शिक्कामोर्तब केले.
आता रेवतीच्या मनात प्लॅन सुरू झाला होता. तिने खरेतर अनाथाश्रमातून मूल दत्तक घ्यायचा विचार केला होता पण असे पूर्णपणे अनोळखी आणि अनौरस मूल दत्तक घेणे तिच्या नवऱ्याला पटत नव्हते.
“त्या मुलाचे आईवडील कोण? कसे आहेत हे देखील आपल्याला माहीत नाही. असे मूल दत्तक घ्यावेसे नाही वाटत ग रेवू. “तिचा नवरा म्हणाला होता.
मग आपण सरस्वतीचे बाळ दत्तक घेतले तर! एकतर सरस्वती आणि तिचा नवरा चांगले आहेत. शिकलेले, संस्कारी आहेत. गरीबी असूनही कधीही एका पैशाची अफरातफर केलेली नाही. एवीतेवी तिला तिसरे मूल नकोच आहे. तिला हे मूल जन्माला देखील येऊ द्यायचे नाही. आपण तिला खूप पैसे देऊ आणि तिला सांगू की तिने हे मूल होऊ द्यायचे आणि ते माझ्या ओटीत द्यायचे. तिने जन्माआधी करण्याऐवजी जन्मानंतर त्याचा त्याग करायचा. हे सारे सरस्वतीला सांगायचे असा निर्णय मनाशी घेऊन
तिने लगोलग नवऱ्याला संदेशला फोन केला. त्याला महत्त्वाच्या कामासाठी ताबडतोबीने घरी यायला सांगितले. तो ही काळजीने धावतपळत घरी आला.
रेवतीने तिच्या मनातले विचार त्याच्या समोर मांडले. त्याला तिचे म्हणणे फारसे पटले नव्हते. तसे बघितले तर सारेच बेकायदेशीर होते. ती मोलकरीण आणि तिचा नवरा आत्ता हो म्हणाले आणि नंतर ब्लॅकमेल करायला लागले तर? मूल झाल्यावर त्यांनी ते मूल द्यायला नकार दिला तर? मुख्य म्हणजे आपण त्या मुलाला बापाची माया देऊ शकू का? एक ना अनेक प्रश्न संदेशच्या मनात येत होते.
रेवती च्या बाजूने विचार केला तर तिची आई होण्याची आंतरिक इच्छा पूर्ण होईल. ती आनंदी होईल. आयुष्यावर एक प्रकारचे मळभ, औदासिन्य आलेय ते दूर होईल. आपण नाही म्हणालो तर आपली रेऊ कोलमडून पडेल.तरीही आपण तिला हा वेडेपणा करण्यापासून थांबवायला हवे. विचारांच्या आवर्तनात संदेश पूर्ण बुडून गेला. त्याने रेवतीची समजूत घालायचा खूप प्रयत्न केला पण रेवतीचा निर्णय पक्का होता. ती देखील अजिबात बधली नाही. त्याच्या प्रत्येक प्रश्नाला तिचे उत्तर तयार होते.
बऱ्याच चर्चा, वादविवाद, रडणे मनवण्यानंतर संदेश तयार झाला.

रेवतीने सरस्वतीला तिच्या नवऱ्याला घेऊन संध्याकाळी घरी यायला सांगितले. तोपर्यंत रेवतीने आणि तिच्या नवऱ्याने एकंदरीत काय बोलायचे ते ठरवून घेतले.
संध्याकाळी सरस्वती आणि तिचा नवरा दोन्ही मुलांना शेजारणीकडे ठेऊन रेवतीकडे आली.
थोडा वेळ अवघडलेपणात गेला पण मग रेवतीनेच संभाषणाचा ताबा घेतला.
स्पष्ट शब्दात तिने त्या दोघांना त्यांचे होणारे मूल तिला तिचे मूल म्हणून हवे असल्याचे सांगितले. रेवती आणि सरस्वती तिच्या मुलांसकट काही दिवसांनी रेवतीच्या गावच्या घरी रहायला जातील. त्यानंतर डिलिव्हरी होईपर्यंत त्या तिथेच राहातील. लवकरात लवकर रेवतीचा नवरा दुसऱ्या शहरात बदली करून घेईल आणि बाळाला घेऊन ते सरळ नवीन
गावी जातील. सरस्वती पुन्हा इथेच येईल किंवा तिच्या गावी परत जाईल.

या बदल्यात तिच्या जुळ्या मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी रेवती उचलेल. सरस्वती आणि तिच्या नवऱ्याला योग्य वाटेल ती रक्कम देण्यात येईल.
मूल जन्माला येईल तेव्हा जन्म दाखल्यावर आईवडील म्हणून रेवती आणि तिच्या नवऱ्याचे नाव असेल.मूल जन्माला आल्यापासून बाळाचा आणि सरस्वतीचा काहीही संबंध असणार नाही.

रेवती असे काही बोलेल हे सरस्वतीला स्वप्नात देखील वाटले नव्हते. ती आणि तिचा नवरा अवाक् होऊन एकमेकांकडे नुसतेच पहात होते.
“तुम्हाला विचार करायचा असेल तर थोडा वेळ घ्या. एकदोन दिवसात तुमचा निर्णय कळवा.” संदेश, रेवतीचा नवरा त्यांना म्हणाला.
“सरस्वती, तू हो म्हणशील ना? मला आई व्हायचय गं.. प्लीज विचार कर.”
रेवती काकुळतीला येऊन म्हणाली.

“तुम्हालाही पैशाची ददात रहाणार नाही. पोटासाठी वणवण फिरायला नको. “संदेशने त्याच्या परीने सांगितले.
” उद्या काय ते कळवतो. आत्ताच काही सुधरना झालय.” असे म्हणून राजू सरस्वतीला घरी घेऊन आला.
घरी येईपर्यंत सरस्वती गप्प गप्पच होती. राजूला रेवतीचा प्रस्ताव आवडला होता. मिळालेल्या पैशातून दोन्ही मुलांचे शिक्षण आणि पालनपोषण व्यवस्थित झाले असते. राजूदेखील काहीतरी छोटामोठा उद्योग करू शकला असता. उरलेले आयुष्य सुखात गेले असते. तो सरस्वतीला सुखी भविष्याचे स्वप्न दाखवत होता.
“अहो पण म्हणून आपण आपले पोर विकायचे? मला नाही हो पटत.”
“अग विकायचे कशाला म्हणतेस? आपण काही आपल्या मुलाचा सौदा करणार नाही आहोत. ते स्वतःहून राजीखुशीने देतील तेवढे पैसे घेऊ.”

“तरीही मला हे काही पटत नाही “
“आपल्या दोघा मुलांचा विचार करुन तरी हो म्हण ग.त्या प्रधानबाईंना पण आई झाल्याचा आनंद मिळेल. त्या तुला खूप दुवा देतील. एक कुटुंब सुखी होईल. “
सरस्वतीने होकार द्यावा म्हणून राजू आपल्या परीने तिची समजूत काढत होता.
त्या रात्री सरस्वतीचा डोळ्याला डोळा लागला नाही. पोटातला गर्भ पाडला तरी मन खात राहील. मूल आपले आपण पोसायचे, ते तर अजिबातच शक्य नाही. मग काय प्रधान वहिनी म्हणतात तसे करायचे? आपले मूल त्यांना द्यायचे? त्याबद्दल पैसे घ्यायचे?
तिचा निर्णय होईना.
पहाटे पहाटे तिचा डोळा लागला. जवळच असलेल्या देवळातून येणाऱ्या बासरीच्या सुरांनी तिला जाग आली. ते सूर ऐकत ती काही वेळ तशीच पडून होती. अचानक तिला आपण काय तोडगा काढायचा ते सुचले.
इथे रेवती आणि संदेशलाही कधी सकाळ होतेय आणि सरस्वती काय निर्णय देतेय असे झाले होते.
सकाळी उजाडतानाच राजूचा “आम्ही थोड्याच वेळात येतोय.” असे सांगायला फोन आला. रेवतीची उत्कंठा अगदी शिगेला पोचली होती. “सरस्वतीचा एक होकार आणि आपण आई होणार. पण… पण जर ती नाही म्हणाली तर??
छे छे, अशी कशी नाही म्हणेल? आपण तिच्या विनवण्या करू, ती मागेल तेवढे पैसे देऊ. पण तिला हो म्हणायला लावू.” रेवतीचा स्वतःशीच संवाद सुरू होता.
सरस्वती राजूबरोबर रेवती कडे आली.
“ये सरस्वती. आम्ही तुझीच वाट पहात होतो. “त्या दोघांसमोर गरमागरम चहाचे कप ठेवत रेवती म्हणाली. सरस्वतीच्या चेहऱ्याकडे बघत तिच्या मनात काय चाललंय याचा अंदाज करायचा प्रयत्न ते दोघेही करत होते.
चहा पिऊन होईपर्यंत कोणीही काहीही बोलले नाही.
” मग तुम्ही काय ठरवलय? “संदेशने विचारले.
“वहिनी, दादा मी तुम्ही काल जे म्हणालात त्याला होकारही देतेय आणि नकारही.” सरस्वती म्हणाली.

रेवती गोंधळली. “म्हणजे? मला काहीच कळत नाहीये. तुला नक्की काय म्हणायचय? तुला हवे तेवढे पैसे देईन. तू म्हणशील ते तुला देईन. तू फक्त सांग. “रेवती भराभरा बोलू लागली.
“वहिनी शांत व्हा. मी काय म्हणते ते नीट ऐकून घ्या. मी माझे मूल तुम्हाला द्यायला तयार आहे. पण माझ्या काही अटी आहेत. “.
हे शब्द ऐकल्यावर रेवती ताडकन उठली. तिला इतका आनंद झाला होता की त्याक्षणी सरस्वतीने काहीही मागितले असते तरी तिला मिळाले असते.
“तुझ्या अटी न ऐकताच मान्य आहेत. तुला काय हवं ते माग तू. “रेवती म्हणाली
” वहिनी, मी काय म्हणते ते ऐका तर आधी. मी माझे बाळ तुम्हाला देईन पण विकणार नाही. मला मोबदला म्हणून एकही पै नको. फक्त पुढचे आठ नऊ महिने तुम्ही माझी आणि माझ्या जुळ्यांची खाण्यापिण्याची सोय करा. माझे बाळंतपण झाल्यावर काहीच दिवसात मी पुन्हा माझ्या घरी जाईन. कष्ट करून आम्ही आमची मुले वाढवू. असे आयते पैसे नकोच. मी नवीन बाळावर आई म्हणून कसलाच हक्क सांगणार नाही.देवाने हे दान तुमच्या ओटीत घालण्यासाठी माझ्याकडे काही दिवस सांभाळायला दिले होते असे मी समजेन. स्वतःहून तुमच्या, बाळाच्या समोरही कधीच येणार नाही. पण, कितीही झाले तरी मी त्याला जन्म देणार आहे. त्यामुळे तुम्ही मात्र माझ्या बाळाची खुशाली मला कळवायची. आणखी एक, पुढे तुमची कूस उजवली आणि तुम्हाला तुमचे बाळ झाले तर माझ्या या बाळाला अंतर देऊ नका. आणि हो, भविष्यात कधीही तुम्हाला हे मूल सांभाळणे शक्य नाही असे वाटले तर माझ्या घराचे दरवाजे त्याच्यासाठी नेहमीच उघडे असतील. देवकीने कृष्णाला यशोदेकडे पाठवले कारण तिला खात्री होती की नंदयशोदा कृष्णाला आईवडिलांचे प्रेम देतील. देवकीचा कृष्ण गोकुळात सुखी असेल. तुम्ही पण माझ्या बाळाच्या यशोदामाई व्हाल ना? “
रेवतीच्या डोळ्याला अखंड धारा लागल्या होत्या. तिने सरस्वतीला चक्क वाकून नमस्कार केला. आज तिला सरस्वती देवाहूनही मोठी, खूप मोठी वाटत होती.

  • डॉ. समिधा गांधी
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular