Homeसंपादकीयआपल्याला लाईफस्टाईल बदलायला हवी ..

आपल्याला लाईफस्टाईल बदलायला हवी ..

मनाची चलबिचल हृदयाला जाणवायला लागली आणी रागाच्या पाऱ्याबरोबर ब्लडप्रेशरच्या मशीनमधला पारा वरवर चढायला लागला. आता काही तरी केले पाहिजे हे जाणवायला लागले.
डॉक्टरी सल्ला देणारा तज्ञ घरातच आहे त्यामुळे निंदकाचे घर असावे घरात “याचा फर्स्ट हॅंड, फर्स्ट क्लास” अनुभव मी घेतच असते. मी कशी सतत धावपळ करत असते. सतरा दगडांवर एकावेळी पाय ठेऊन मी सतत टेंशनमध्ये असते या व इतर अनेक चुका मला सातत्याने ध्यानात आणून दिल्या जातात.अर्थातच यामागे माझी व माझ्या तब्येतीची काळजी हाच हेतू आहे हे मला माहित आहेच.असो!
आपल्याला लाईफस्टाईल बदलायला हवी आणि थोडे स्लो डाऊन व्हायला हवे हे ही जाणवायला लागले. जरा मित्रमंडळीमध्ये या गोष्टीचा सुतोवाच केला आणि मग काय सल्ले, विविध फोन नंबर्स, यूट्युबवरच्या लिंक्स, गुगल डाऊनलोड यांनी माझा इनबॉक्स ओसंडून वाहायला लागला. योगा, पॉवरयोगा, जीम, प्राणायाम,ट्वीन हार्ट मेडिटेशन, ओंकार साधना इत्यादी अनेक प्रकारांनी माझे प्रेशर कसे आटोक्यात येऊ शकते यावर माझे विविध मार्गानी बौद्धिक घेणे सुरु झाले. प्रेशर पत्करले पण सल्ले नकोत अशी माझी अवस्था झाली होती. या सल्ल्यांनी मला सळो की पळो करून टाकले होते…….
मी पण फावल्या वेळात यातले काहीबाही पहात होते. योग, प्राणायाम, मेडिटेशन यात एक गोष्ट समान आहे. ‘विचार रहित अवस्था’.
ही संकल्पना समोर आली आणि अचानक जाणवले की आपण सतत कसला ना कसला तरी विचार करत असतो. स्वप्ने पहाणे म्हणजे देखील एकप्रकारे खयाली पुलावच आहे. विचार नाही अशी अवस्था असतच नाही. आत्ता हे लिहिताना देखील बॅकग्राऊंडला इतर अनेक बारिकसारिक विचार चालूच असतात. अगदी अतिशय आनंदाच्या किंवा दुःखाच्यावेळी सुद्धा विचारांची मनात गर्दी असते.या विचारांच्या ट्रॅफिकजॅममुळे सुद्धा काही दुखणी नक्कीच उद्भवत असतील.
आपल्या मनात एकाचवेळी किती विचार आहेत. हे ओळखण्याचा मी प्रयत्न करत होते. तेव्हा असे लक्षात आले की एकावेळी आपण कमीतकमी आठदहा विचार करत असतो. म्हणजे मग मन एकाग्र होणे ही अवस्था जवळपास अशक्यच समजायला हवी. कारण कसलाच विचार करायचा नाही. हा विचार तरी असतोच ना मनात!
काही जण असेही सांगतात की मनातल्या विचारांकडे त्रयस्थपणे बघायला शिका म्हणजे विचारांबरोबर येणाऱ्या मानसिक आंदोलनांना काबूत ठेवता येईल. विचार येतील पण विकारांवर ताबा राहिल.

आपले ऋषी मुनी ध्यानधारणेला बसत तेव्हा त्यांना निर्विचार अवस्था प्राप्त करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले असतील. म्हणूनच जर कोणी त्यांचा तपोभंग केला तर त्यांना एवढा राग येत असेल. एकतर कितीतरी वेळ सगळ्या भावभावनांना थोपवून ठेवलेले असेल त्यात प्रयासाने मिळविलेली अवस्था परत मिळवायला कष्ट पडणार असा दुहेरी उद्रेक होत असेल.
काही जण अशी अवस्था प्राप्त कशी करावी यासाठी मार्गदर्शनही करतात. युट्यूबवर तर काही रेकॉर्डिंगस् आहेत. जी ऐकताना आपण गुंग होऊन जातो व हळूहळू ध्यानावस्थेत जातो.

मी स्वतःच्या बाबत विचार करायला लागले तेव्हा जाणवले. आवडीचे काम करताना किंवा सिनेमा पाहाताना, गाणी ऐकताना माझ्या मनात इतर विचार येत नाहीत. क्लिनिक मध्ये पेशंटला ट्रीटमेन्ट देताना माझ्या मनात घरी पाहुणे आलेत किंवा भाजी संपलीय असे विचार येत नाहीत. म्हणजे आवडीचे काम असेल तर आपण एकच एक विचार करतो. अनेक विचार एकावेळी करण्यापेक्षा एका वेळी एक विचार करणे बरे. हो ना?

ध्यानधारणे मुळे माझा ब्लडप्रेशरचा पारा खाली येईल का नाही, मला मेडिटेशन करायला जमेल की नाही हे माहित नाही. पण मला निर्विचार अवस्था प्राप्त करायचा एकच सहजसोप्या मार्ग माहित आहे. झोपणे!!!!… मे महिन्यातल्या रविवारी दुपारी आमरस चापल्यानंतर कोणालाही दोनतीन तास झोप काढून अशी निर्विचार अवस्था सहज प्राप्त करता येईल हे नक्की!!

  • डॉ. समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular