Homeवैशिष्ट्येउन्हाळा स्पेशल- देवाची करणी अन..

उन्हाळा स्पेशल- देवाची करणी अन..

देवाची करणी

आपला निसर्ग म्हणजे अनेक प्रकारच्या चमत्कारांचे आगरच आहे जणू. निसर्गातील अनेक गोष्टींचे निरिक्षण केले की आपल्या ज्ञानात भर पडत राहाते. यातील एक चमत्कार म्हणजे आपला नारळ! इतक्या कठीण कवचाच्या आत इतके मृदू खोबरे आणि मधूर पाणी असते याचा ज्या मानवाला पहिल्यांदा शोध लागला असेल त्याला किती नवल वाटले असेल नाही!
नारळाचे झाड हे जर कल्पवृक्ष मानले तर नारळपाणी म्हणजे जणू पृथ्वीवरचे अमृत!
नारळपाणी म्हटले की एकाच शहाळ्यात दोन स्ट्रॉ घालून पाणी पिणारे हिरो हिरॉईन आठवतात. एके काळी प्रेमाची परिसीमा असायची ती. माझा जीव मात्र” अरेरे, हिरॉईनला अर्धेच नारळपाणी मिळणार” या विचाराने खालीवर होत असे!
लहानपणी समुद्रावर फिरायला गेल्यावर चौपाटीवरची भेळ खायला परवानगी नसे पण कधीतरी नारळपाणी प्यायला आईपपांची हरकत नसायची. नारळपाण्याने आपली मुले आजारी पडणार नाहीत याची त्यांना खात्री होती. त्याचे मुख्य कारण हे की नारळपाणी म्हणजे पूर्णपणे निर्जंतुक!

आजकाल म्हणतात ना तसे कोणताही मानवी स्पर्श नसलेले पेय!! अनेक औषधी गुण ठासून भरलेले, तरीही चवीष्ट आणि मन, पोट शांतवणारे हे पेय कितीही वेळा प्यायले तरी आपल्याला त्याचा कंटाळा म्हणून येत नाही.
जशी हापूसच्या आंब्याची चव गावागणिक बदलते तशीच नारळपाण्याची चवही बदलते.
दक्षिण भारत आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर नारळाचे उत्पन्न मुबलक असते. त्यामुळेच भात, मासे आणि नारळ हे त्यांच्या आहाराचे महत्त्वाचे घटक असतात.
कोणाचे पोट बिघडले आहे?
तापानंतर थकवा वाटतो आहे? डिहायड्रेशनमुळे गरगरते आहे?
मुत्राशयाचा किंवा मुतखड्याचा त्रास होतो आहे तर या सगळ्यावर घरगुती उपाय एकच! नारळपाणी!!
आजही भर दुपारी उन्हातून घरी आल्यावर जर नैसर्गिक गोडवा असलेले साखरविरहीत पेय हवे असेल तर नारळपाण्याला पर्याय नाही.
अगदी ॲसिडिटी झालेली असेल तरी नारळपाणी उपयोगी पडते.

शहाळे अगदी कोवळे असेल आणि आतली मलई तयार नसेल तर असे नारळपाणी तुरट लागते पण जर थोडी कोवळी मलई तयार झालेली असेल तर मात्र पाणी अतिशय मधुर लागतेच आणि ती मलई देखील चविष्ट लागते.
नारळपाणी किंवा शहाळी विकणारा माणूस हा एक वेगळ्या लेखाचा विषय होईल. एखाद्या सर्जनच्या सफाईने तो हातातला धारदार चाकू त्या शहाळ्यावर फिरवतो. इतक्या वेळा शहाळ्याचे पाणी प्यायलोय पण कधीही शहाळे सोलताना या शहाळेवाल्याचे बोट कापलेले किंवा शहाळ्याचा चुकीचा टवका उडाल्याचे पाहिलेले नाही. शहाळ्यातले पाणी पिऊन झाले की आतली मलई देखील शहाळ्याच्या एका कपचीने तो काही सेकंदात काढतो. ती खाऊन झाल्यावर आशाळभूतपणे शहाळ्यात कुठे थोडी मलई बाकी आहे का हे पहायला गेले लक्षात येते की आतली मलई अगदी पूर्णपणे कोरून काढलेली आहे. आपण नाईलाजाने ते रिकामे शहाळे नारळवाल्याच्या ताब्यात देतो. शहाळे सोलणे ही देखील चौसष्ट कलांपैकी एक कला आहे का हे पाहिले पाहिजे. मलेशियात शहाळे बाहेरून पूर्णपणे सोलतात व शहाळे आतल्या पाण्यासकट आपल्यासमोर आणले जाते. यू ट्यूबवर याचा व्हिडीओ बघताना आत्ता चूकून शहाळे फुटणार आणि पाणी वाया जाणार या विचाराने माझा जीव खालीवर होत होता. पण त्या मलेशियन नारळपाणी वाल्याने लिलया शहाळ्याचे पाणी पोटात असलेला मलईसकटचा पांढरा शुभ्र गोळा गिऱ्हाईकासमोर पेश केला आणि त्या शहाळ्याबरोबर माझाही जीव भांड्यात पडला!!
काही वर्षांपूर्वी कोणीतरी नारळपाण्याची भुकटी करून ती छोट्या सॅशे मध्ये भरून श्रीजल या नावाने मार्केट मध्ये आणलेली पाहिली होती. त्यावेळेस पाच रुपयाला ते सॅशे मिळायचे. एक ग्लास पाण्यात घालून ढवळले की नारळपाणी तय्यार! मी कुतूहल म्हणून ते श्रीजल प्यायले. त्या पेयाला नारळपाणी म्हणायचे म्हणजे खेळण्यातल्या विमानाला जंबोजेट म्हणण्यासारखे किंवा कोणत्याही डावखुऱ्या , उंच माणसाला अमिताभ बच्चन म्हणण्यासारखे आहे.

सध्या लॉकडाऊन आहे त्यामुळे नारळपाणी आणायला देखील बाहेर पडू नका. पण लॉकडाऊन उठल्यानंतर भरपूर खरेदी करून झाल्यानंतर आपण भविष्यात कधीतरी नारळपाणी प्यायचे, या विचारानेच कलेजे को ठंडक मिळाली ना?

  • डॉ. समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular