Homeवैशिष्ट्येउन्हाळा स्पेशल - लिंबूपाणी

उन्हाळा स्पेशल – लिंबूपाणी

पूर्वी ऋतू बदलाची चाहूल निसर्गातून मिळायची. पावसाआधी येणाऱ्या काळ्या मुंग्या, पाऊस जाताना भिरभिरणारे चतूर नावाचे किटक पानगळ वगैरे वगैरे आताशा टिव्हीवरच्या जाहिराती ऋतू बदलत असल्याचे जाणवून देतात.
व्हॅसलिन, बोरोलिन वगैरे गुबलीगुबली गुश म्हणून थंडीचे स्वागत करतात तर कतरिना, शाहरुख, ऋतिक इत्यादी थंड पेये प्यायला लागले की अरेच्चा उन्हाळा आला वाटतं (तशी मुंबईत थंडी पण सर्दीमें भी गरमी का एहसासच देत असते म्हणा)
अस वाटायला लागतं.
ही सगळी कोल्ड ड्रिंक्स खिसा आणि जीभ थंडगार करतात पण तहान भागवत नाहीत. कितीही प्यायले तरी पाचव्या मिनिटाला परत तहान लागते. मग आपली पावले आपसूक बाजाराकडे वळतात.
एरवी सुट्ट्या पैशाऐवजी एक दोन लिंब एवढीच किंमत असणाऱ्या लिंबांना अचानक भाव येतो. डझनावारी विकत घेतली जातात. लिंबांना पण सोन्याचा भाव येतो.
घराघरात दुपारच्या वेळी लिंबूसरबत तयार होऊ लागते.
तसे टॅंग, रसना आणि रुह आफजा वगैरे असतात पण त्यांना तितकासा भाव दिला जात नाही.
लिंबू सरबत बनवणे ही एक कला आहे. लिंबू पिताना इतकेच पिळायचे की सालात रस राहाणार नाही पण सालाचा कडवटपणा सरबतात उतरणार नाही. त्यात साखर मीठही प्रमाणात हवे. कधी केशर वेलची तर कधी जिरे मिरी आणि सैंधव घालून त्याची चव अधिक बहारदार करायला जमायला हवी. यातही लिंबू पिळताना त्या लिबू पिळायच्या यंत्रात छोटा आल्याचा तुकडा पण टाकायचा आल्याच्या चवीचे लिंबू सरबत भाऽरी लागते.
माझी एक मैत्रिण लिंबू सरबतामध्ये गुलाबपाणी आणि सब्जा घालते. रुचीपालट म्हणून तेही छान वाटले होते.
काही जण लिंबूसोडा पितात तोही नीट जमला तर तोऽडू लागतो असे माझा लेक म्हणतो. मला स्वतःला सोड्याला सोडून लिंबूसरबत पिणे जास्त आवडते.
काही जणांचा (डाएट कॉन्शस यु नो)सरबतातल्या साखरेला विरोध असतो मग ते फक्त पाण्यात कळेल न कळेल एवढे मीठ घालून लिंबू पिळून ते पितात. हे असे रसायन त्यांचे त्यानाच लखलाभ होवो.
भर उन्हाळ्यात दुपारच्या टळटळीत उन्हाच्यावेळी घरी आल्यावर गार पाण्याने हातपाय धुवून पंख्याखाली बसून गारेगार आंबटगोड लिंबूसरबत पिणे म्हणजे अमृत प्यायला मिळाल्याचा आनंद..
उन्हाळ्यात आणखी काही घरगुती पेये प्यायला पण तितकीच मजा येते त्यांच्या विषयी

क्रमशः

  • डॉ. समिधा गांधी

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular