Homeकला-क्रीडाकधी सुरू होईल शाळा ?

कधी सुरू होईल शाळा ?

यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू झाले. तसे पालक विद्यार्थ्यांचे फोन सुरू झाले. सर, शाळा कधी उघडणार आहेत ? या प्रश्नाचे उत्तर आजतरी कुणाकडेही नाही. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना शाळा सुरू व्हावी असे मनापासून वाटते. शाळा परिसर, वर्गखोल्या स्वच्छ करून ठेवले आहेत. शाळांचे निर्जंतुकीकरण केले आहे. हा कोरोना जाईन, लवकर माझी शाळा भरेल या आशेवर.
दीड वर्षापासून शाळा मुलांची वाट पाहत आहे. शाळेत मुलं आली की, दंगा, मस्ती, मौजमज्जा, शिस्त अभ्यास, खेळ बरेच काही. हसत खेळत शिक्षण चालू व्हायचे. सकाळी मुलं शाळेत आली की परीपाठाला सुरुवात करायची. राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना, बोधकथा, सुविचार, सामान्य ज्ञान, समूहगीत, पसायदान सुरू होई. यातून मूल्यशिक्षण नैतिक मूल्ये रुजले जात होते. मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम परिपाठात व्हायचे. परिपाठातील सुमधुर आवाजातील अर्थपूर्ण प्रार्थना सु संस्काराचे धडे द्यायची. ‘
‘हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे ‘.
मानवता, राष्ट्रभक्ती, प्रेरणा, व्यक्तिमत्व विकास हे परिपाठातून विकसित होई. नंतर वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास. खेळ, गाणी, गोष्टी याची रेलचेल असायची.
वर्षभर वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, महापुरुषांची जयंती पुण्यतिथी यातून मुले घडत होती.प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन यातून देशभक्ती मनामनात रुजत होती. वेगवेगळ्या कार्यक्रमातून मुलांमध्ये जोश यायचा. अंगामध्ये मुरलेला जोश स्टेजवर जाऊन निघायचा. शाळांमध्ये मुलं व्यक्त होत होती. आपल्या भविष्याचे स्वप्न पहात होती. परंतु कोरोना आला आणि विद्यार्थ्यांना शाळेपासून दूर घेऊन गेला. जणू त्यांचा आनंदच हिरावला.
आज जेव्हा मी मुलांच्या गृहभेटी घेतो . अभ्यासाविषयी चर्चा करतो. तेव्हा पालक हतबल झालेली दिसून येत आहेत. मुलांच्या भविष्याविषयी बोलत आहेत. ग्रामीण भागात दिवसभर कामाला जाणारे आई वडील आहेत. ते मुलांचा अभ्यास कधी घेणार ? काहींनी मोबाईल घेऊन दिले मुलांसाठी. परंतु त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुलांना मोबाईलचं जणू व्यसनच जडले आहे. मोबाइल जितका चांगला तितकाच तो घातकच आहे. हे दुधारी शस्त्र आज मुलाच्या हातात आहे. यासाठी मुलं मोबाईलवर काय पाहतात याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. ऑनलाईन अभ्यास पालकांनी लक्ष देऊन करून घ्यावा ही गरज बनली आहे. शिक्षकांनी पालकांशी संपर्क साधून मार्गदर्शन करावे. मुलांकडून काय अभिप्रेत आहे याची चर्चा व्हावी.
दाखल पात्र विद्यार्थी शोध मोहिमेत अनेक जणांच्या घरी गेलो. अनेक समस्या पालकांनी मांडल्या. पालक म्हणाले,’ मुलांचं खूप नुकसान झालं. मुलं घरी अभ्यास करत नाहीत. सारखं मोबाईल पाहतात. आमचं ऐकत नाहीत.लवकर शाळा सुरू व्हावी. तस मी म्हटलं, हे खर आहे. पण हा आजार तितकाच गंभीर आहे. अगोदर याच्याशी आपण लढू. आज आपण मुलांकडे घरीच लक्ष देऊ. हा आजार निघून गेला की, शाळा सुरू होतील. पुन्हा नव्या जोमाने नव्या उत्साहाने कामाला लागू. वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांची गुणवत्ता वाढवू.
आज ज्यांच्या घरी कोरोना आला. कित्येक घरं उद्ध्वस्त झाली आहेत. धडधाकट माणसांचा बळी कोरोनाने घेतला आहे. आपण आज सुरक्षित आहोत. आता आपण काळजी घेऊ, जगूया. आणि पुन्हा सारे मिळून लढूया.. तेव्हा ते म्हणायचे खर आहे सर. त्यांच्यामध्ये विश्वास देण्याचे काम मी आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री.भालचंद्र शिंदे सर करत होतो.
अनेक पालक विद्यार्थी रस्त्याने, घरी भेटत होते. चर्चा करत करत पुढे जात होतो. कोरोना नियमाचे पालन करत ही मोहीम सुरू होती. आपल्या घरी सर आले . पालक विद्यार्थी यांच्या मनात वेगळीच भावना असते. आम्ही मुलांशी गप्पा मारत होतो. अभ्यासाचं सांगत होतो. मुलही निरागस भावनेने माना डोलत होती.
गेल्या दीड वर्षात नक्कीच मुलं काहीना काही शिकली आहेत. त्यांनी कुटुंबाची परिस्थिती जवळून पाहिली आहे. आपल्या कुटुंबाचा संघर्ष ते अनुभवत आहेत. शाळेचे शिक्षणाचं महत्व पटलं आहे. त्यांची समज वाढलेली दिसून आली. आज पुस्तकातलं ज्ञान कमी मिळाले असेल . परंतु इतर गोष्टी मुलं अवगत करत असतात.
एका वस्तीवर आम्ही गेलो. तर तिथं दीक्षा भिसे ही मुलगी जवळच्या सर्व लहान मुलांचा अभ्यास घेते . हे पालकांनीच सांगितले.खूप बरं वाटलं आणि तिचं कौतक केलं. काही गरज पडली तर आम्हाला फोन करायला सांगितले.. दीक्षा सारख्या आणखी मुली अशा तयार झाल्या तर आसपासची मुलं अभ्यास करतील. पालकांनी, शिक्षकांनी अशा मुलांना प्रोत्साहन द्यावे. जरी शाळा बंद असली तरी शिक्षण चालु आहे.पण त्याची गती वाढावी.
येत्या काही दिवसात नक्की शाळा भरतील. पुन्हा विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्य येईल. त्यांचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होईल.

         नक्की शाळा सुरू होईल 
         शाळा गजबजून जाईल.
         शाळेतल्या झाडांना वेलींना
        पुन्हा बहर येईल…. 

        दंगामस्ती गाणी गोष्टी
        पुन्हा अभ्यास सुरू होईल
        मैदानावरची माती उडेल
        आकाशी उंच उंच जाईल … 

         भिंतीमध्ये चेतना येऊन
         बोलू लागेल पुन्हा फळा
         नवनवीन उपक्रम घेतील शिक्षक
          मुलांना लागेल शाळेचा लळा .. 

         नक्की जाईल हि महामारी
         मुलांनो काळजी घ्या घरी
         लढूया या कोरोनाशी
          ऑनलाइन शाळा सध्या बरी … 

          नक्की होईल शाळा सुरू
          नियमित करा तुम्ही अभ्यास
          भविष्य तुम्ही या देशाचे
           आमच्यासाठी तुम्ही खास …. 

आज या महामारीशी लढणे सर्वांची जबाबदारी आहे.

तशी मुलांच्या भविष्याकडे लक्ष देणे . ही सुद्धा सर्वांची जबाबदारी आहे. पालक शिक्षक विद्यार्थी समन्वय ठेऊन काम करत राहावे. सध्या तरी ऑनलाईन शाळेला पर्याय नाही. पालकांना आपल्या मुलांसाठी वेळ काढावाच लागेल. त्यांच्याकडे लक्ष द्यावेच लागेल. शिक्षकांच्या मदतीने त्यांचा अभ्यास घ्या. ज्यावेळेस शाळा सुरू होतील. अभ्यासाची गती आणखी वाढेल यात कसलीही शंका नाही….

लेखक,कवी – श्री किसन अर्जुन आटोळे
प्राथमिक शिक्षक
वाहिरा ता.आष्टी जि.बीड

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular