Homeआरोग्यजागतिक आनंद दिन व जागतिक चिमणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जागतिक आनंद दिन व जागतिक चिमणी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज २० मार्च हा जागतिक आनंद दिन आहे तसाच जागतिक चिमणी दिनही आहे. संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) च्या माध्यमातून दर वर्षी जागतिक आनंद दिन जगभर साजरा केला जातो. दिनांक २० मार्च २०१३ रोजी पहिला जागतिक आनंद दिन साजरा केला गेला. याचा अर्थ हाच की मानवी जीवनात आनंद नसेल तर जीवनाला अर्थ नाही हे जगाला हल्लीच म्हणजे फार उशिरा कळले. ही एवढी महत्त्वाची गोष्ट कळायला जगाला हजारो वर्षे का बरे लागली असावी? असो, उशिरा का असेना पण कळले त्यात समाधान मानून घेऊया. पण जगातील सगळ्या माणसांनी आनंदी रहावे असे जगातील किती माणसांना मनापासून वाटते? जगातील मूठभर श्रीमंतांपैकी किती श्रीमंतांना वाटते की जगातील गरिबी दूर व्हावी? भारतातील किती लोकांना वाटते की देशातील जातव्यवस्था नष्ट होऊन देशात सामाजिक समता प्रस्थापित व्हावी? जगातील विविध धर्माच्या किती लोकांना वाटते की सर्वधर्म समभावाने व समविचाराने सर्व धर्म एक होऊन जगात एकच धर्म प्रस्थापित व्हावा? खरं तर, हे असे सर्व झाल्याशिवाय जगात शांतता प्रस्थापित होणार नाही आणि शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय जगात आनंद निर्माण होणार नाही. जगात आनंदाची समान वाटणी व्हावी असे वाटत असेल तर जगात शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व त्याबरोबर धार्मिक व एकंदरीतच सामाजिक समता प्रस्थापित झाल्याशिवाय जगात समान आनंद कसा निर्माण होणार? पण हा सुद्धा फक्त मानव समाजापुरताच संकुचित विचार झाला. मानव समाज निसर्गाचा फार छोटासा भाग आहे. विकासाच्या नावावर पर्यावरणाची वाट लावून मानव समाज आनंदी राहू शकतो का? पर्यावरणाचे संतुलन हा तर जगातील आनंदाचा मूलभूत पाया आहे. म्हणून तर २० मार्च जागतिक चिमणी दिन म्हणूनही साजरा केला जातोय. हल्ली चिमण्या फार दुर्मिळ होत चालल्या आहेत आणि उंदरे, डासांची संख्या वाढत चाललीय. करोना नावाचा विषाणू मध्येच उपटलाय व त्याने जगाच्या आनंदाचा विचका करून टाकलाय. हा विषाणू असा अचानक आला कुठून? पर्यावरणात मानवाने काहीतरी गडबड केल्याचे हे लक्षण आहे. अशा भीतीने ग्रासलेल्या वातावरणात जागतिक आनंद दिन साजरा करायचा म्हणजे विरोधाभास वाटत नाही का? असो, चिमण्यांना सांभाळा! घराच्या आजूबाजूला चिमण्यांचा किलबिलाट नसेल तर मजा नाही. माझ्या लहानपणी केवढ्या चिमण्या होत्या! आता अधूनमधून दिसतात. जरा त्यांना सुद्धा जगू द्या! स्वतःच्या आनंदासाठी इतरांचा आनंद हिरावून घेऊ नका. तुम्ही आनंदी रहा व इतरांनाही आनंदी राहू द्या!

जागतिक आनंद दिनाच्या व जागतिक चिमणी दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

  • ॲड.बी.एस.मोरे©
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular