Homeवैशिष्ट्येराजाशिवछत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा …….

राजाशिवछत्रपती महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा …….

बरेच दिवस झाले काही लेख नाही असा वाचकांचा मेसेज पाहून मलाही जाणवलं होय कि खरच काही लिखाण च केलं नाही , यावेळी माझी सहल प्रतापगड आणि रायगड ठिकाणी झाली.

नेहमी काहीतरी नावीन्य असावं  हेच माझं ध्येय , काय बोलावं यावेळचा प्रवास बापरे … ! वळणावळचे घाट ….डोंगर माथा आणि खोल दरी…

गड किल्ले फारतर मी पुस्तकात च पहिले होते आणि चित्रपटात च, सध्याच पावनखिंड पाहिल्या नंतर गड चढायचाच हे मात्र नक्की झालं.

तसा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा प्रवास सुरु झाला मग त्यात वयोवृद्ध पासून छोट्या दीड वर्षाच्या चिमुकलीचा ही आमच्या सहलीत समावेश होता. तब्बल २० जण आम्ही प्रवास करत होतो.  पहिल्या दिवशी प्रतापगड चढून झाल्यांनतर रायगड ला जाण्याची तयारी सुरु झाली.

प्रतापगड च्या पायथ्याशी वाहने जात असल्याकारणाने चढण्याची फारशी गरज भासली नाही .

प्रतापगडाला जाण्यासाठी जवळचे ठिकाण – महाबळेश्वर, जिल्हा : सातारा.

उत्तर सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात महाबळेश्वराच्या पश्चिमेस ८ मैलावर प्रतापगडाचा डोंगर आहे. पार आणि किनेश्वर या दोन गावांमधल्या डोपऱ्या नावाच्या एका टेंभावर या किल्ल्याची बांधणी झाली आहे. गड चढताना प्रत्येक व्यक्तीच्या मुखात एक च घोषणा  होती….

छत्रपती शिवाजी महाराज की….  जय….. !

तुमचं आमचं नातं काय ? … जय जिजाऊ जय शिवराय ….. !

महाबळेश्वरहून महाडला जाणारी गाडी कुमरोशी गावाजवळ आली की तेथून अर्ध्या तासाच्या प्रवासात प्रतापगडला जाता येते. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्य पूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती श्री हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे.ह्या मंदिरासमोरून बालेकिल्ल्याकडे चालू लागल्यास उजव्या हाताला समर्थस्थापित हनुमानाची मूर्ती दिसते; पुढे बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो. मंदिरात भव्य शिवलिंग आहे.

अशा या जावळीच्या प्रांतात पायथ्यापासून प्रतापगड सुरू होतो. त्या गडाच्या खाली डाव्या हाताला एक पायवाट दिसते. दर्गा शरीफ म्हणजे अफजलखानाची कबर. या गडाला एकच महाद्वार आहे. त्याच्या खालच्या बाजूला वरून आलेले पाणी खाली लोटणारा पावसाळी ओढा आहे.

प्रवासात भरपूर वेळ गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रायगड चढायचा होता त्यामुळे संध्याकाळ होताच पुरेपूर पाहणी झाल्यानंतर परतीची वाट धरली . तिथून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आरामाची गरज होती आणि ध्येय होते रायगड सर करायचा. रात्री मुक्काम ठरला महाड. एक छानसं हॉटेल पाहून राहण्याची आणि जेवणाची सोय झाली.

पहाटे ४ वाजता उठून फ्रेश होऊन ५ ला गाड्या रायगड च्या दिशेने वळू लागल्या. हलकीशी न्याहारी करून आणि वयोवृद्धांना रोपवे ची सोय करून आम्ही रायगडच्या पायथ्याशी येऊन नतमस्तक झालो. तिथूनच टकमक टोक अगदी ठळकपणे दिसत होत. रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते.

किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून सुमारे ८२० मीटर (२७०० फूट) उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला.

या किल्ल्यावर पोहोचण्या साठी आपल्याला जवळ-जवळ 1400 ते 1450 पायऱ्या चढून जाव्या लागतात.

वर जात असता  रायगडचे वारे थंड गार भासत होते. अवतीभोवतीच्या हिरवळी च दर्शन घेणं म्हणजे एक अद्भुत नयनरम्य सोहळाच जणू . जसं जसं वर जात होतो तशी जमिनीवरची ठिकाण लहान लहान दिसत होते. अवती भवती पिवळ्या रंगाची गोजिरवाणी डौलदार फुल , रंगीबेरंगी फुलं, हिरवे रान वाऱ्या सोबत डुलत होती.

पायऱ्या चढू लागलो तसा प्रत्येक मावळा “छत्रपती शिवाजी महाराज कि जय * ची घोषणा देत पायऱ्या चढत होता . आमचे कुटुंब सोडूनही बरेच जण गड चढत होते. बहुतेक जणांच्या हातात भगवी पताका झळकत होती . पायऱ्या चढत असता ना निसर्गातील  प्रत्येक घटक राजांच दर्शन देत होता . आम्ही सर्व कसा होता माझा राजा हे जाणून घेत होतो. तेंव्हा आठवत होत ते गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील लयबद्ध झालेले संगीत.

शोधू कुठं रं, धावू कसं रं?
मीच स्वतःला पाहू कसं रं?
ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला रं!

माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं, माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं
शोधू कुठं रं, धावू कसं रं?, मीच स्वतःला पाहू कसं रं?

कसा माझा राजा त्या काळात कठीण प्रसंगातही गड किल्ले जिंकत होता. ना होती स्याटलाईट ना होत गूगल तरीही जंगलातून मावळे रस्ते काढत लढाई जिंकत होते. आणि आता इतक्या सुविधा असूनही माहीत नाही महाराष्ट्र अजून कुठे आहे आणि कुठे पोहोचणार आहे की मावळे फक्त राजकारणात च अडकून बसणार आहेत.

माझा राजा त्या कणाकणात आहे सह्याद्री च्या वाऱ्यात आहे. तुम्ही समुद्रातील लाटा पाहिल्या असतील पण रायगडावर येऊन पाहावं गवताच्या हि सुंदर लाटा असतात फुलाच्या बहरलेल्या सुंदर वाटा असतात. इतक्या उंच असणारा आपला रायगड किती दिमाखदार उभा आहे हे मात्र तिथे गेल्यावरच कळत. रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे नाव घेईल तितके कमीच इतकी सुंदर कल्पना आणि विचार सरणी कोणत्या बर शाळेत इंजीनियर झाले असावे . शिकावं त्यांच्याकडून काहीतरी . नतमस्तक झाले रायगड पाहून . नाहीतर आताचे रस्ते डिग्री असूनही रस्त्यात रस्ते कमी अन् खड्डेच खड्डे दिसतात.

रायगड बद्दल बोलावं तितक कमीच आहे पण जितकं मी अनुभवल पाहिलं ते थोडक्यात मांडते. येथे पाहण्यासारखे खालीलप्रमाणे ठिकाणे आहेत.

१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा.  पायऱ्यांची एक उत्तम विहीर, तसेच जिजाबाईंना बसण्यासाठी केलेले दगडी आसन बघण्यासारखे आहे.

२. खुबलढा बुरूज : गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.

३. नाना दरवाजा : या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत.

४.  मशीदमोर्चा : चित्‌ दरवाजाने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकऱ्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. तेथे एक प्रचंड तोफही दिसते. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.

५. महादरवाजा : महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत दरवाजावर असणाऱ्या या दोन कमळांचा अर्थं म्हणजे किल्ल्याचा आत ‘श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ‘श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ‘विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंचं आहे.  महादरवाजातून आत आल्यावर पहारेकऱ्यांचा देवड्या दिसतात तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याचा खोल्या दिसतात. महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे.

६. चोरदिंडी : महादरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.

७. हत्ती तलाव : महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

८. गंगासागर तलाव : हत्तीतलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० -६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले.

९. स्तंभ : गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते.  बांधकामात नक्षीकाम आढळते.

१०. पालखी दरवाजा : स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून ३१ पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.

११. मेणा दरवाजा : पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

१२. राजभवन : राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीचा मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याचा अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.

१३. रत्‍नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्‍नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.

१४. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झ़ाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते.

१५. नगारखाना : सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे.

१६. बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे.

शिरकाई देऊळ
१७. शिरकाई देऊळ : महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता.

जगदीश्वर मंदिराची पहिली पायरी, ज्यावर रायगडाचे वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर यांचे नाव कोरलेले आहे.

१८. जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेचा खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर आहे.  मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे.
 मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याचा भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते.

१९. महाराजांची समाधी : मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी.

२०. कुशावर्त तलाव : होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर फुटलेल्या अवस्थेतला नंदी दिसतो.

२१. वाघदरवाजा : कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते.

२२. टकमक टोक : बाजारपेठेचा समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूचा कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते.आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.

२३. हिरकणी टोक : गंगासागराचा उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते ती हिरकणी टोकाकडे जाते.

२४. वाघ्या कुत्र्याची समाधी. इतिहासात असे म्हटले जाते की शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली.

प्रत्येक राणी साठी राणीवस ही खूप सुंदर बांधले आहेत.

खूप सुंदर आहे रायगड माझा देव येथे राहत होता, राहत आहे, प्रत्येक चराचरात ते राहतात. प्रत्येक वेळी त्यांचाच भास आहे. त्यांचाच वास आहे.

इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे. वाईट वाटत पाहून माझ्या राजाने इतकी मेहनतीने साकारले ले रायरी आणि गडकिल्ले असे पडलेलं दिसताना नासधूस केलेली दिसताना. माझ्या बंधू भगिनी सर्वांना विनंती आहे.

गड किल्ले पाहायला जा मुलांना घेऊन जा. कोणतंही प्रदूषण करू नका. अजून हि कचरा करण्यास काही लोक कारणीभूत आहेत. विकेंड ला रिसॉर्ट ला जाऊन मज्जा घेण्या पेक्षा राज्यांनी आपल्यासाठी काय काय केलं. कसे संघर्ष केले हे लहान पणापासून रुजवा आताची पिढी फक्त मोबाईल मध्ये गुंतून आहे.
पण पहा आजही भगवा फडकवायला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
राजांचे पोवाडे गात जातात.

रायगडावर रोपवे ची सुविधा आहे परंतु काही कालावधी त्यात जातोच. वयोवृद्ध व्यक्तींना सोईस्कर आहे. हॉटेल आणि घरगुती खानावळी उपलब्ध आहेत.

आस्ते कदम
आस्ते कदम
आस्ते कदम
महाराsssssज
गडपती
गजअश्वपती
भूपती
प्रजापती
सुवर्णरत्नश्रीपती
अष्टवधानजागृत
अष्टप्रधानवेष्टित
न्यायालंकारमंडित
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
राजनितिधुरंधर
प्रौढप्रतापपुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधिश्वर
महाराजाधिराज
राजाशिवछत्रपती
महाराजांचा विजय असो.

राजाशिवछत्रपती महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा …….

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular