Homeकला-क्रीडा"शब्दसम्राट"

“शब्दसम्राट”

( कुसुमाग्रजांची माफी मागून नटसम्राटमधील स्वगताचे विडंबन )



लिहावं की सोडावं ?
हा रोजंच सवाल आहे….
या फेसबुकच्या पानावर
बेभरवश्या पोस्टचा तुकडा टाकून
मागाव्या कमेंटस् आणि लाईक्स लाचार होऊन..
की फेकून द्यावी ही उपाधी ह्रदयात साठवलेल्या शब्दसाठ्याच्या संग्रहासह
रोज भास होणाऱ्या अनिश्चित भविष्यामध्ये?
आणि करावा सगळ्याचा शेवट
शब्दरूपी प्रहाराने
माझा, वाँट्सअँपचा आणि फेसबुकचाही….

स्पर्धेतल्या रचनेमधून
नकली परीक्षकाला असा टोमणा मारावा
की नंतर निकाल देताना
त्याने करावा पुन्हा पुन्हा विचार!!!!
पण त्या निकालानंतर पुन्हा
तो सूड घेऊ लागला तर
तर….तर…
इथचं सारी गेम आहे.

नव्या नियमांच्या पोरकट कारभारात
कधी लिहण्याची इच्छाच होत नाही
तरीही मी सहन करतो
बेगडी सन्मानपत्रासाठी नको तसलं लेखन…
तेही केवळ फेसबुकवरच्या मैत्रीपोटी अगदी निर्लज्जपणानं….
कवीमनावर होणारे अत्याचार…
वेगवेगळ्या स्पर्धात अटीमधून होत असलेली कुचंबना…
आणि अखेर सन्मानपत्राचा भलामोठा बँनर घेऊन
पोस्ट करतो ताठ मानेने
जिथे स्पर्धा झाली त्याच समूहात????

वाचका , तू इतका आळशी कसा झालास?
एका बाजूला ,आम्ही ज्यांना कमेंट दिली
ते आम्हाला विसरतात
आणि दुसऱ्या बाजूला तू , नेटपँक स्वस्त असतानाही फुकटची कमेंट करायला कचावतोस…?

मग सुंदर डिझाईन केलेल्या ग्राफिक्सला आलेलं अपयश बघून
हे वाचका ,
आम्ही लेखकांनी
कोणाच्या माथी खापर फोडायचं रे !
कोणाच्या – माथी- कोणाच्या…


✍️ श्री.विजय शिंदे…
३२शिराळा,सांगली.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular