: झुंज : भाग २४ ( अंतिम ) –
आपल्या समोर किल्लेदाराला पाहताच छत्रपतींच्या चेहऱ्यावर नापसंतीची एक पुसट रेषा उमटली. किल्लेदारालाही या गोष्टीची चांगलीच कल्पना होती.
“बोला किल्लेदार… याच साठी का आम्ही तुमची रामशेजवर नियुक्ती केली?” काहीशा नापसंतीने महाराजांनी विचारले.
“माफी असावी म्हाराज… पन किल्ल्यावरील रसद संपत आली व्हती. किल्ल्यावरील लोकंबी हवालदिल झाले. आन रयतेचा इचार करून मला ह्यो निर्नय घ्यावा लागला. तरी पन तुमाला यात आमी कसूर केली असे वाटत असेल तर तुमी द्याल ती शिक्षा मला काबुल हाये…” आपल्या हातातील पन्नास हजारांची थैली महाराजांच्या शेजारी उभ्या असलेल्या कारकुनाकडे सोपवत किल्लेदार हात बांधून उभा राहिला. महाराजांनी त्याच्या चेहऱ्याकडे एकदा रोखून पाहिले आणि किल्लेदार खरे बोलतो आहे याची त्यांना मनोमन खात्री पटली.
“ठीक आहे… झाले ते झाले… काही वेळेस माघार घेणेही गरजेचे असते. लवकरच तुम्हाला नवीन मोहिमेवर पाठवले जाईल. तो पर्यंत विश्राम करा…” इतके बोलून राजांनी किल्लेदाराबरोबरचे संभाषण संपवले.
इकडे बादशहा मात्र खूपच खुश होता. त्याच्या मार्गातील सगळ्यात मोठा काटा, हंबीरराव एकाएकी नाहीसा झाला होता. नाशिक आणि बागलाण प्रांतातील बराचसा प्रदेश मुगल राजवटीत सामील झाला होता. विजापूर आणि गोवळकोंडा मुगली अमलाखाली आले होते. आणि त्यातच अनेक वर्ष झुंजून देखील हार न जाणारा रामशेज त्याच्या ताब्यात आल्यामुळे ही आपल्यावर अल्लाची मेहेर असल्याची भावना बादशहामध्ये रुजली. रामशेज आपल्या ताब्यात येणे म्हणजे अल्लाची रेहमत म्हणून या गडाचे नांव रहीमगड असे बदलण्यात आले. या किल्ल्यावरून बादशहाला नाशिक, बागलाण, अहमदनगर, ठाणे आणि औरंगाबाद या सगळ्याच प्रांतावर लक्ष ठेवणे सोपे जाणार होते. तसेच हा किल्ला दिसायला जरी लहान असला तरी किती चिवट झुंज देऊ शकतो याचा त्याला चांगलाच अनुभव आला होता. त्यामुळेच या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले.
एक महिन्यापेक्षाही कमी कालावधीत रामशेजचा कायापालट झाला. पडझड झालेल्या भागांची नव्याने बांधणी केली गेली. गडावर दारुगोळा मुबलकप्रमाणात उपलब्ध करून दिला गेला. जवळपास २० एक लहान मोठ्या तोफा गडावर तैनात करण्यात आल्या आणि बादशाही अमलास सुरुवात झाली.
या प्रत्येक गोष्टीची माहिती संभाजी महाराजांचे हेर त्यांच्यापर्यंत पोहोचवत होते.
आणि एक दिवस छत्रपतींनी किल्लेदारास बोलावणे पाठवले. दोनच दिवसात किल्लेदार छत्रपतींसमोर हजर झाला.
“या किल्लेदार… आज तुम्हाला मोहिमेवर निघायचे आहे.” महाराजांनी सुरुवात केली.
“आज्ञा म्हाराज… मोठ्या मनाने तुमी आमच्या चुका पदरात घेतल्यात. आता स्वराज्याच्या कार्यात कोनतीबी कसूर व्हायाची नाई…” किल्लेदाराचा हात तलवारीकडे गेला.
“तुम्हाला रामशेज ताब्यात घ्यायचा आहे… पण आता रामशेज पूर्वीपेक्षा बलाढ्य बनला आहे हेही लक्षात असू द्या…” महाराजांनी फर्मावले आणि किल्लेदाराचा चेहरा खुलला. आपल्यावर लागलेला फितुरीचा डाग धुवून काढण्याची नामी संधी किल्लेदाराकडे चालून आली.
“काळजी नसावी म्हाराज… ह्यो मराठा काय चीज हाये त्येच बादशहाला दाखिवतो…” असे म्हणून त्याने महाराजांचा निरोप घेतला.
बरोबर अगदी मोजकेच ३०० स्वार घेऊन किल्लेदार रामशेजच्या दिशेने निघाला. काहीही झाले तरी ही संधी सोडायची नाही अशी त्याने जणू प्रतिज्ञाच केली होती.
रहीमगडावरील बादशहाचा किल्लेदार अगदीच बेसावध होता. एकतर जो किल्ला फितुरीने आपल्याकडे आला त्यावर इतक्या लवकर आक्रमण होईल हे त्याला स्वप्नात देखील वाटत नव्हते. समजा तसे झाले तरी जवळपास एक हजाराची शिबंदी बादशहाने गडावर ठेवली होती. लहान मोठ्या अशा २० तोफा आणि मुबलक दारुगोळा याच्या जोरावर या किल्ल्याकडे पाहण्याचे कुणाचे धाडस होणार नाही असेच तो समजून होता.
रात्रीच्या किर्र अंधारात मराठा सैन्याची तुकडी गडाचा डोंगर चढत होती. स्वतः किल्लेदार सर्वात पुढे राहून या तुकडीचे नेतृत्व करत होता. तटबंदीखाली येताच किल्लेदाराने सगळ्यांना सूचना द्यायला सुरुवात केली. अगदी मोजक्या शब्दात सगळ्या सूचना दिल्या गेल्या आणि गडावर दोर फेकले गेले. ते व्यवस्थित अडकले आहेत याची खात्री केली गेली आणि काही जण तटबंदी चढू लागले.
तटबंदीजवळ पोहोचताच सगळ्यात आधी प्रत्येकाने कोणता आवाज तर होत नाही याचा कानोसा घेतला. नंतर हळूच एकेक डोके तटबंदी पलीकडे पाहू लागले. सगळीकडे भयाण शांतता पसरली होती. पहाऱ्यावरील सैनिक काही जण अर्धवट पेंगत होते. कित्येक जण तर तलवार बाजूला ठेवून चक्क झोपले होते. गडावर मशालींचा अगदी मंद उजेड दिसत होता. सैनिकाने हळूच इशाऱ्याचा आवाज केला आणि उरलेल्या तुकडीने भराभर दोराने वर चढायला सुरुवात केली.
संपूर्ण तुकडी गडाच्या तटबंदीवर पोहोचली तरीही मुगल सैन्याला त्याचा सुगावा लागला नाही. सगळे जसे वर आले तसा हर हर महादेवचा गजर आसमंतात घुमला. आपल्या समोर इतके मराठा सैन्य पाहून खडबडून जागे झालेले मुगल सैनिक पुरते भांबावले. त्यातील काहींनी आपल्या तलवारी उचलल्या पण त्या म्यानातून बाहेर काढण्याचीही संधी त्यांना मिळाली नाही. एकेका वारासरशी एकेक शीर धडावेगळे होऊ लागले. डोळे चोळत उठलेल्या सैनिकांना समोरचे दृश्य पाहून थंडीतही घाम फुटला.
“भागो… भागो… दगा… या अल्ला… मराठा आया…” या आणि अशा अनेक वेगवेगळ्या आरोळ्या आणि त्याच बरोबरील किंकाळ्यांनी आसमंत दणाणून गेला. मुगल किल्लेदार या सगळ्या प्रकाराने जागा झाला. हातात शमशेर घेऊन तोही मराठा सैन्याच्या समोर आला. तो पर्यंत गडावरील जवळपास दोनशे मुगल सैनिक गारद झाले होते. कित्येकांनी तर मराठ्यांना खरेच भूत वश आहेत असा समज करून घेतला होता. उरलेल्या मुगल सैन्याने हा हल्ला परतवून लावण्याचा नेटाने प्रयत्न केला पण मराठ्यांच्या जोरापुढे त्यांचे काहीही चालेना. आणि त्यातच अघटीत घडले. किल्लेदाराचा एक भयंकर वार अंगावर झाल्याने मुगल किल्लेदार धारातीर्थी पडला आणि मुगल सैन्याचा प्रतिकार संपला. या लढाईत जवळपास १०० एक मराठे सैनिकही वीरगतीला प्राप्त झाले पण तो पर्यंत किल्लेदाराने गडाचा ताबा घेतला.
सूर्य उगवल्याबरोबर गडावर शिवरायांच्या स्वराज्याची भगवी पताका फडकू लागली. एक दूत संभाजी महाराजांकडे ही शुभवार्ता देण्यास रवाना झाला.
औरंगजेब बादशहाला जेव्हा हे वर्तमान समजले त्यावेळेस त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला. जो किल्ला कोणतीही साधने नसताना पन्नास हजाराची फौज पाठवूनही त्याला ५ वर्षे घेता आला नाही तोच किल्ला मराठ्यांच्या अवघ्या ३०० शिलेदारांच्या तुकडीने फक्त एका रात्रीत पराक्रमाची शर्थ करत परत जिंकून घेतला. बातमी ऐकल्या बरोबर त्याच्या संतापाचा पारा चढला. पण चिडून काहीही होण्यासारखे नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव स्पष्ट दिसून येऊ लागले.
“या परवरदिगार… ये मरहट्टे कीस मिट्टीसे बने है?” तोंडातल्या तोंडात शब्द पुटपुटत बादशहा खाली बसला.
आणि रामशेज मात्र पुढील १३० वर्षांसाठी सुरक्षित झाला होता.
समाप्त
मुख्यसंपादक