Homeवैशिष्ट्येशिवकालीन ऐतिहासिक मालिका - झुंज -: भाग ३

शिवकालीन ऐतिहासिक मालिका – झुंज -: भाग ३

झुंज : भाग ३ –

रामशेजचा किल्लेदार हा अगदी अस्सल मर्द मराठा. सहा साडेसहा फुट रांगडा गडी. पाहताक्षणी हा माणूस किमान १० जणांना तरी लोळविल हे कुणीही सांगू शकत होते. त्याच्या चेहऱ्यावर असलेला करारीपणा ठळकपणे उठून दिसत होता. त्याचा जरी दरारा किल्ल्यावर असला तरीही त्यात कुठेही भीतीची भावना नव्हती. प्रत्येकजण त्याचा आदरच करत होता. रामशेज गडावरील कुणीही अजूनपर्यंत त्याला विनाकारण चिडलेले पाहिले नव्हते. कितीही मोठा प्रश्न असेल तरी त्याच्या चेहऱ्यावर झळकणारी शांतता आजपर्यंत कधीही ढळली नव्हती. कोणताही निर्णय असो, छोटा किंवा मोठा, सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि सगळ्यांशी सल्लामसलत करूनच घ्यायचा असेच त्याचे धोरण होते. आणि म्हणूनच गडावरील प्रत्येक जण किल्लेदारावर जीव ओवाळीत होता.

खलबत संपवून जेव्हा किल्लेदार माजघरात आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसत होती. किल्लेदाराच्या बायकोने यापूर्वी त्याला कधीही इतके काळजीत पाहिले नव्हते. किल्लेदारापुढे बोलायची हिम्मत तिच्यात नव्हती. काहीवेळ गंभीर शांततेत गेला. पण शेवटी तिने विचारलेच.

“काय सांगावा आलाय गडावरनं?” तिचा आवाज ऐकला आणि किल्लेदार काहीसा भानावर आला. तसे तिला सांगून किंवा न सांगून काही फरकही पडणार नव्हता. पण जर वेळ आली तर मात्र त्याला सगळ्यांचीच मदत घ्यावी लागणार होती. आणि म्हणूनच त्याने आपल्या बायकोला गरजेच्या गोष्टी सांगण्याचा निर्णय घेतला.

“बादशहाची वाकडी नजर हिकडं वळलीय..!” त्याने मोघम उत्तर दिले.

‘म्हंजी? म्या नाय समजले.” ती गोंधळली.

“राजानं खलिता धाडलाय. बादशहाची फौज येऊ ऱ्हायली. ज्ये शक्य आसंन त्ये करा.” हे बोलत असताना किल्लेदाराची नजर शून्यात होती.

तिच्या अंगावर सरसरून काटा आला. एकतर लहानपणा पासून तिने मुगल फौजांचा नंगानाच पाहिला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि जनतेला चांगले दिवस आले. शिवाजी राजांच्या रूपाने देवानेच अवतार घेतला आहे अशी तिची ठाम समजूत होती. पण आता महाराज हयात नव्हते. जरी संभाजी महाराजांनी मोठ्या महाराजांचे कार्य आपल्या हाती घेतले होते तरीही यावेळेस ते मदतीला येऊ शकणार नव्हते. तसा खलिताही त्यांनी पाठवला होता. बादशहाबद्दल ज्या गोष्टी तिच्या कानावर आल्या होत्या त्यात एकही गोष्ट समाधानकारक नव्हती. जो बादशहा स्वतःच्या बापाचा, भावांचा झाला नाही तो जनतेचा काय होणार अशीच तिच्या मनाची समजूत होती. मध्येच बादशाहने त्याच्या मुलुखात जिझिया कर लावल्याच्या बातम्या येत होत्या. मुघल सैन्याने हिंदूंची मंदिरे, पवित्र स्थाने यांची तोडफोड आणि लुट केल्याच्या बातम्याही वरचेवर तिच्या कानावर येत होत्या. आणि त्याच बादशहाची फौज आपल्या गडावर चालून येते आहे म्हटल्यावर तिचे मन शहारले. ती जितके आपल्या नवऱ्याला ओळखत होती तितके तो कोणत्याही परिस्थितीत किल्ला मुघलांच्या ताब्यात सहजासहजी देणार नाही याची तिला पूर्ण खात्री होती. म्हणजेच युद्ध अटळ होते. आणि जेव्हा मुघल सैन्य युद्ध करून किल्ल्यात प्रवेश करेल त्यावेळेस त्यांच्यात आणि राक्षसात काहीच फरक असणार नाही, हेही ती जाणून होती. त्यामुळेच काय बोलावे हेच मुळी तिला सुचेना.

“तुला काय वाटतं?” एकाएकी किल्लेदाराने आपल्या बायकोला प्रश्न केला. त्याचा आवाज ऐकताच ती गोंधळली. काय उत्तर द्यावे तिला सुचेना. किल्लेदाराने परत तोच प्रश्न विचारला आणि आपल्याला उत्तर देणे भाग आहे हे ती समजून चुकली.

“म्या काय बोलणार? तुमी ज्ये काय ठरवलं आसंन त्येच करनार… पन म्या काय म्हन्ते, कितीबी मोठी फौज असुदे, आपन त्यास्नी जवर आपल्या जीवात जीव हाये तवर रोखायचं.” तिने उत्तर दिले आणि किल्लेदाराला आपल्या बायकोचा अभिमान वाटला.

“हंग अस्सं… आता कितीबी फौजफाटा असू दे… जवर ह्यो किल्लेदार जित्ता हाय तवर एक बी सैनिक हितं येऊ देनार नाई…!” किल्लेदाराच्या चेहऱ्यावर आता मात्र काळजीचे कसलेही चिन्ह दिसत नव्हते.

किल्ल्यावर आता धावपळ दिसत होती. काही वेळापूर्वीच किल्ल्यावर दवंडी फिरली होती. सगळ्यांना सर्यास्ताच्या वेळी वाड्यासमोरील पटांगणात हजर होण्यास सांगण्यात आले. हळूहळू प्रत्येक जण हजर झाला. जवळपास सगळे जमले आहेत याची खात्री करून किल्लेदाराने बोलायला सुरुवात केली.

“येक उल्शिक वाईट बातमी हाये. कालच्याला संबाजी राजांकडनं खलिता आलाय. त्यांनी सांगावा धाडलाय, बादशाची फौज आपला गड ताब्यात घ्यायला येऊ ऱ्हायली. चार सा दिसात समदी फौज हितं यील. फौज लैच मोठी हाये. धा बारा हजाराचा फौजफाटा हाये. संबाजी राजांनी आपल्यालाच निर्नय घ्यायचा सांगावा धाडलाय. आपन हितं ५००/६०० लोकं आन बादशाची फौज धा हजाराची, त्यात हत्ती, तोफा आन घोडेबी भरमसाट. युध केलं त किती दिवस आपला निभाव लागन आजच्याला सांगता येनार नाई. हारलो त लुटालूट हुईल. काय करायचं म्या ठरीवलं हाये पर एकडाव तुमचा इचार घ्येतलेला बरा.” आपले म्हणणे सांगून किल्लेदाराने सगळ्यांवर नजर टाकली. हळूहळू चुळबुळ वाढली. आवाजही वाढत गेला आणि त्यांच्यातून एकजण पुढे आला.

“किल्लेदार…! हुब्या आयुश्यात म्या कदी माघार घ्येतली नाई. म्याच काय पन ह्ये समदेबी माघार घीनार नाईत. ह्ये आपलं राज्य हाये. शिवाजी म्हाराजांच. त्यांनी आपल्यासाठी जीवाची पर्वा केली नाई आनी आता आपली बारी हाये. बादशाची फौज धा हजार असो वा पन्नास हजार. जवर जीवात जीव हाये तवर त्यास्नी येक पाऊल बी फुड टाकू द्यायचं नाई. तुमी फकस्त आज्ञा द्या. आई भवानीचं आशिर्वाद हाये आपल्यासंग. आपन लढायचं… हर हर महादेव…!” समोर आलेल्या तरुणाने आपले मत दिले आणि आसमंतात हर हर महादेवचा जयघोष घुमला. किल्लेदाराच्या अंगावर मुठभर मांस चढलं. ज्या रयतेच्या राजाला कित्येकांनी नीटसं पाहिलं देखील नव्हतं त्याचं राजासाठी प्रत्येकजण आपल्या प्राणाची आहुती द्यायला एका पायावर तयार होता.

काही क्षणातच किल्लेदाराचा चेहरा कठोर बनला. अंगात वीरश्री संचारली आणि त्याने घोषणा दिली.

“हर हर महादेव ! जय छत्रपती शिवाजी म्हाराज..!! जय छत्रपती संबाजी म्हाराज…!!!” त्याने घोषणा दिली आणि सगळ्यांच्याच अंगात एक नवे चैतन्य संचारले.

“ठरलं…! आता लढायचं. जवर जीवात जीव हाये तवर लढायचं.” किल्लेदार बोलत होता आणि एक म्हातारा पुढे आला.

“मला उल्शिक बोलायचं हाये…” त्याने किल्लेदाराकडे पहात म्हटले.

“बोला तात्या… काय हुकुम हाये आम्हास्नी?” किल्लेदाराने आदबीने विचारले.

“आपन लढायचं म्हनतो पन निस्त म्हनलं आन झालं असं ऱ्हातं व्हय? पराक्रम असला तरीबी काई गोष्टी आपल्याला आदीच करून ठीवाया लागतीन.” त्याने आपले वाक्य पूर्ण केले. किल्लेदारालाही हे पटले.

“म्या काय म्हन्तो, आदी पोटाचा इचार केल्याबिगर काय उपयोग नाई.” त्याने मुख्य मुद्दा उपस्थित केला.

“तात्या… आपल्याकडं दोन तीन वर्ष पुरंल इतका धान्यसाठा हाये.” किल्लेदाराने सांगितले.

“आरं पर अनुभवानं येक गोष्ट मला म्हाईत हाये. बादशाच्या फौजेनं येढा दिला मंग त्यो कितीबी दिस तसाच ऱ्हाईल. येकदा का आपलं धान्य संपलं मंग आपन युध न करता उपासमारीनं मरू. त्याचा काय उप्योग?” त्याने आपला विचार बोलून दाखवला आणि त्यावर किल्लेदार गंभीर झाला. गोष्ट विचार करण्यासारखीच होती. प्रत्येक गोष्ट तपासून पाहणे तितकेच गरजेचे होते. शेवटी त्यांने तात्यांनाच प्रश्न केला.

“तुमी म्हंता त्ये समदं बरुबर हाये. पन मंग?”

“म्या काय म्हन्तो, बादशाची फौज आजूक चार दिस त हितं येत नाई. तवर धा बारा जनांनी त्रंबकगडाकडं जावं. तितंल्या लोकास्नी रानवनस्पती आन कंद ठावं हायती. त्याची माहिती घीवून हितं यावं. ते कंद एकदा खाल्ली की मंग दोनदोन दिस कायबी खान्याची गरज पडत नाई. आपन त्याचा वापर करू.” तात्याने आपला विचार सांगितला आणि किल्लेदार खुश झाला. त्याने लगेचच १० जणांची निवड करून त्यांना त्र्यंबकगडाकडे रवाना केले.

पुढचा प्रश्न होता तो प्रत्यक्ष लढाईचा. दोन वार आपण केले तर एकवार त्यांचाही झेलावा लागणार. शेवटी मानवी शरीर म्हटल्यावर जखमा होणारच. त्याने ताकद हळूहळू कमी देखील होणार. यावर काय उपाय करावा हाच किल्लेदारापुढे आता मोठा प्रश्न होता. इतक्या मोठ्या फौजेला आपण काही शेकडा लोकं कसे थोपवून धरणार? आणि एकाएकी त्याच्या डोक्यात विचार आला. समजा फौजेला किल्ल्यापर्यंत पोहचू दिलेच नाही तर? हाच विचार त्याने सगळ्यांपुढे मांडला आणि एकेक करत काही जण पुढे आले.

‘किल्लेदार… म्या दगड फोडून देतो. किल्ल्यावर लय साठा हाय बगा दगडांचा. आपन त्ये वरून टाकले तरी १०/१२ जन एकाच दगडात मरतीन.” रामा लोहार म्हणाला.

“आन म्या लाकडाची तोप करतू… पन त्यासाठी चामडं बी लागन…” तुका सुतार उत्तरला.

“आरं मंग म्या हाय ना. तू तोप बनव. चामडं म्या काढतो.” सदू म्हणाला आणि किल्लेदार आश्चर्यानं पहातच राहिला. संभाजी राजांनी पाठवलेला दारुगोळा तोफेविना काहीच कामाचा नाही असेच तो समजून चालत होता. पण मनात जिद्द असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही हेही त्याला हळूहळू समजत होते.

“म्या येक बोलू का?” जमलेल्या लोकांमधून एक पोरगं पुढं आलं. किल्लेदाराने आता पर्यंत प्रत्येक जण किती महत्वाचे योगदान देतो आहे हे पाहिले होते. आता हे लहानसं पोरगं काय सांगणार याचाच तो विचार करू लागला.

“हा बोल की…!” किल्लेदार कौतुकाने त्याच्याकडे पहात म्हणाला.

“आमी पोरं पिकांच राखन करन्यासाठी गोफन चालीवतो. येका दगडात येक पाखरू मारतो. त्येचा वापर केला तर? संग गलोरीबी हायेत.” त्याने आपला विचार बोलून दाखवला आणि जमलेल्या मंडळीत खदखद पिकली. एवढ्याशा गोफणीने आणि गलोरीने कुणी मरेल हा विचारच करणे तितकेसे योग्य वाटत नव्हते. लोकांना हसताना पाहून ते पोरगं काहीसं हिरमुसलं. किल्लेदार मात्र गंभीर झाला. गोफणीतून सुटलेला एक दगड जेव्हा वरून खाली जाईल तेव्हा त्याचा वेग आपोआपच वाढलेला असेल. तसेच दगड लागलेला माणूस स्वतःचा तोल सांभाळता न आल्याने खाली कोसळेल यात काहीच शंका करण्यासारखे नव्हते. गलोरीने एकेक जण टिपता येणार होता. मुलाच्या त्या विचाराने किल्लेदार अगदीच खुश झाला. त्याने मुलाला जवळ बोलावले. त्याच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारली आणि त्याचा विचार कसा उपयोगी आहे हे सगळ्यांना सांगितले. बरे गोफण फिरवायला आणि गलोरी वापरायला मुले, म्हातारे आणि स्त्रिया सगळ्याच सक्षम असल्याने हेच त्याने आपले प्रमुख हत्यार बनवले. किल्लेदाराच्या या निर्णयामुळे जे लोक प्रत्यक्ष युद्धात भाग घेऊ शकणार नाही असे वाटत होते तेही स्वराज्याचे शिलेदार बनले.

चार दिवसात लढाईसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या वाटत त्या सगळ्यांची पूर्तता करून किल्लेदार आणि त्याचे सगळे सैनिक बादशहाच्या फौजेची वाट पाहू लागले.

क्रमशः

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular