काळी भुई ज्याची माय
त्याला निळ्या अंबराचं पांघरूनं
सर्जा राजाच्या जोडीनं करतो
शेताचं नांगरनं…..
त्याच्या भाळी लिहीलेल्या
दुष्काळाच्या झळा
कसं करपलं रान सारं
अश्रू वाहती घळाघळा….
कधी बरसतो वरूण राजा
मातीचा रे तो सोयरा….
रूजता बीज काळ्या भूईत
अंकुरली सारी रोपं ,हिरव्या
शालूत जणू नटल्या नवऱ्या….
बगून हिरवाई कशी डोळे दिपावली
फुटली क्षणीक त्याच्या आशेला पालवी…..
पोरा बाळांच शिक्षण,आणि आनंदाची दिवाळी….
पण कोपला असा निसर्ग अतिवृष्टी झाली….
सर्जा राजाची जोडी
अन् एक एक पिकाची काडी
कशी मातीमोल झाली…..
कसं करपलं रान ,स्वप्न त्याची जळाली….
हिरव्या शिवाराची जणू
स्मशानभूमी झाली….
सरकारची घोषणेबाजी, देवू
पिकास हमी भाव,नूकसान भरपाई,
पिक विमा….
जिवाच्या आकांतानं बोलतोय जगाचा पोशिंदा सांगा यात माझा काय गुन्हा?….
वाटतं त्यालाही माझ्या पोराला उच्च शिक्षण मिळावं…..
दुनियेचं या गणित त्यालाही थोडं कळावं…..
कवरं त्यानं असं फाटक्या कापडात आणि चिखलात आयुष्य काढावं…
वाटतं त्यालाही चार चाकीत कारभारणीला फिरवावं…..
प्रत्येक कुणबी इथं सन्मानानं जगला पाहिजे…
गळ्याचा फास त्याच्या कायमचा तुटला पाहिजे…..
तो मेल्यावर काय करता मदत?
करा त्याच्या मागण्या जिवंतपणीच पूर्ण….
तो जगला तर तुम्ही जगाल
जिवंतपणीच त्याला तारा…..
नाही दिसणार तूम्हाला कधी
झाडाला लटकलेला त्या निष्पाप जिवांचा बाप म्हातारा….
(आज दिनांक २३डिसेंबर शेतकरी दिनानिमित्त माझी कविता)
-सौ.भाग्यश्री एम.एस.आपेगांवकर
ता-अंबेजोगाई
जि-बीड
मुख्यसंपादक