निवडणुका आल्या की सत्तांतराचे वारे वाहू लागतात विरोधातील लोक सत्तेतील लोकांना कसे पराभूत करता येईल व आपणास सत्ता कशी मिळेल याविषयीचे कार्यक्रम आखतात. व तयारीला लागतात ही तयारी करत असताना त्यांच्याकडे काही मुद्दे असतात काही संकल्पना असतात त्या सर्व गोष्टींचे भांडवल करून सत्तेच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि आपण म्हणजे गरीब व कर्जबाजारी शेतकऱ्यांची मुलं याच गोष्टींना बळी पडतो खरं म्हणजे सत्तेत असणारे लोक आपल्याला आपले दुश्मन वाटतात व विरोधातली लोकं आपले जवळचे वाटून आपली बाजू मांडणारे चांगले व स्वच्छ प्रतिमेचे भासतात. मात्र ज्या वेळेस हे विरोधातले सत्तेत होते तेव्हा ती असेच वागत होते नेमके हेच आपण विसरून जातो. आपण सूड भावनेने पेटून सत्तेतल्या लोकांना पराभूत करण्यासाठी विरोधकांशी सलगी करतो इथेच आपला घात होतो. कारण आपण फक्त सरकार बदलतो व्यवस्था नाही खरं म्हणजे सरकार कोणाचेही असो ते शेतकरी विरोधी भूमिका घेऊन शेती व शेतकऱ्याला दुय्यम स्थान देतात त्यांची चुकीचे ध्येयधोरणे शेतीला मारक ठरतात. या सर्व गोष्टींना जबाबदार कोण असेल ती म्हणजे व्यवस्था आपल्याला तीच बदलायची आहे .त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील जसे आपण आपल्या नेत्यासाठी जीव द्यायला तयार असतो आपल्या बापाच्या मारेकऱ्यांची झेंडे खांद्यावर घेऊन मिरवत असतो आपल्या नेत्याला सर्वस्व मानून त्याच्यासाठी काही पण करायला तयार होतो .त्याच्यातील एक टक्का जरी आपण आपल्या बापासाठी वेळ काढला तर नक्कीच आपण ही परिस्थिती बदलू शकतो. या देशातील महाराष्ट्रातील आतापर्यंत होऊन गेलेले सर्व पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचा बारकाईने अभ्यास केला तर (काही सन्माननीय अपवाद सोडून) सर्वांनी शेतीला दुर्लक्षित केलेला आहे. आपण स्वातंत्र्यपूर्व काळात पारतंत्र्यात होतो आणि आत्ता ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पारतंत्र्यातच आहोत. याला कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये असलेले कायदे इंग्रजांच्या काळातले जसेच्या तसे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ठेवण्यात आले उलट अजून या कायद्याच्या विरोधात कोर्टात जाता येणार नाही न्याय मागता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली (परिशिष्ट 9 31b ) म्हणजे आपण आजही स्वतंत्र नाही. जेव्हा काही शेतीतज्ञ कायदेतज्ञ शेतकऱ्यांचे हितचिंतक यांच्या लक्षात आलं तेव्हा लोकांनी याच्यासाठी लढा सुरू केला. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या लढ्यामध्ये शेतकऱ्यांची पोर सामील झाले नाहीत म्हणून हा लढा पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही आपल्या गावातील एखादी लाभार्थी कार्यकर्ता असतो तो आपल्या आमदाराकडून खासदाराकडून नेत्याकडून छोटं मोठं काम मिळवून स्वतःभले करून घेतो. त्याच्यासोबत काही शेतकरी पुत्रांसह मोठं जाळं विणलेलं असतं शेतकर्याच्या पोरांना एकत्रित करून आपल्या नेत्यासाठी व्होट बँक तयार करतो. म्हणजे आपसूकच त्यांना निवडून येण्यासाठी फारसे प्रयत्न करावे लागत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे गाव खेड्यांमधून देश, स्वातंत्र्य, संविधान ,व्यवस्था, या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जात नाही या सर्व गोष्टींपासून हा गरीब दुबळा शेतकरी दूर असतो फक्त एखाद्या पक्षाचा रुमाल गळ्यामध्ये घालून पूर्णवेळ कार्यकर्ता बनतो. पर्यायानं आपल्या बापाचं या कृषक समाजाचं तो फार मोठे नुकसान करतो. आमदार-खासदारांची पोरं घरामध्ये बसून टीव्हीवर बातम्या पाहत असतात अन गरीबाची पोरं नेत्याला कुणी काही बोललं की आंदोलन करून रस्त्यावर पोलिसांचा मार खात असतात कधीकधी नेत्यासाठी स्वतःच्या अंगावर केस घेतात मात्र आपल्या बापासाठी रस्त्यावर येत नाहीत हेच मोठे दुर्दैव आहे म्हणून शेतकऱ्याच्या पोरांना आवाहन करतो की मित्रहो तुम्ही या पक्षातून त्या पक्षात गेला तरी बापाची परिस्थिती बदलणार नाही कारण आमदार-खासदार बदलल्यानं हे शक्य होणार नाही. त्यासाठी आपल्याला व्यवस्था बदलावी लागेल व्यवस्था बदलण्यासाठी एकत्र यावे लागेल याशिवाय तरूणोपाय नाहीच.
संतोष पाटील
7666447112
मुख्यसंपादक