माझ्याकडे एक बाबा त्याच्या दोन्ही मुलांना तपासणीसाठी घेऊन आला होता.
“डॉक्टर यांना जरा सांगा न दात नीट घासायला. आम्ही किती वेळा सांगूनही ऐकतच नाहीत.”
मी मुलांना म्हणाले, का रे ऐकत नाही? असं करू नये. रोज दोन वेळा दात स्वच्छ करावेत. काही खाल्ल्यानंतर चूळ भरावी. “
मी काही पुढे बोलणार तेवढ्यात त्या दोघांमधली धाकटी चिवचिवली,” डॉक्टर, आमच्या बरोबर आईबाबांना पण दोन वेळा ब्रश करायला सांगा नं”.
बाबांचा चेहरा पडला. ते खजीलही झाले.त्यांनी आपली चूक सुधारण्याचे कबूलही केले.
आपण पालक अनेकदा घरासाठी काही नियम बनवतो आणि ते स्वतःच पाळायचे विसरतो.
कधी अनवधानाने कधी कधी सोयिस्करपणे.
आपण एक गोष्ट नेहमीच ध्यानात ठेवायला हवी. मुले पालकांच्या अनुकरणातून बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी शिकतात. ती टीपकागदासारखी असतात. जे जे प्रवाही असेल ते ते टीपकागद टिपून घेतो तसेच ही मुलेही आजूबाजूच्या वातावरणातून संस्कार शोषून घेत असतात. मग ते बरे असो वा वाईट.
काही घरांमध्ये जेवताना पानात काहीही नास करायचे नाही. जे की बनवलेले असेल ते विनातक्रार खायचे. असे नियम असतात. मुलांना कधी रागावून वा धाक दाखवून ते नियम पाळायला लावले जातात.स्वतः मात्र एकतर न आवडणाऱ्या भाज्या बाजारातून आणतच नाही किंवा अशा भाज्या कधी समोर आल्या तर चक्क खातच नाही वर आम्हाला लहानपणी सगळ्या भाज्या खायची सवय नव्हती म्हणून तुम्हाला शिस्त लावतोय असे लंगडे समर्थन करायचे.
तसे पाहिले तर सगळ्या भाज्या खायला हव्यात. जेवणाला नावे ठेऊ नयेत. हे अगदी योग्यच नियम आहेत. पण जर मुले दहापैकी आठनऊ भाज्या खात असली आणि एखादी भाजी नसतील खात तर त्याला न आवडणारी भाजीच खायला लावण्यात काय हशील आहे? विशेषतः जर आपण आपल्याला न आवडणारी भाजी केल्यास ती खात नसू तर आपल्यालाही मुलांवर जबरदस्ती करण्याचा काहीच हक्क नाही.
आपल्या मुलांना ज्या चांगल्या सवयी लागाव्यात असे आपल्याला वाटते त्या सवयी आपण पहिल्यांदा स्वतःला लावून घ्याव्यात.
- डॉ. समिधा गांधी
मुख्यसंपादक
अत्यंत उपयुक्त माहिती सांगितला आहात..