आजरा(हसन तकीलदार )–
महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे. या महामार्गासाठी हजारो हेक्टर पिकावू जमीन संपादित होणारच आहे. याबरोबर पर्यावरणाची मोठी होणारी हाणी, नद्यांना येणारे पूर, जंगली पशु पक्ष्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न उभे करीत लाखो शेतकरी त्याविरोधात लढत आहेत. आजरा तालुक्यातून जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा असे निवेदन आज आजरा तहसीलदार यांना शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीने दिले.
निवेदनात म्हटले आहे की, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यातून व्हावा यासाठी पर्यायी चार मार्गाची मांडणी करत रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार यांची भेट घेऊन मागणी केली असल्याचे वर्तमानपत्रातून समजते. आ.शिवाजीराव पाटील यांनी रस्ते विकास महामंडळासमोर पीपीटी द्वारे सादर करून चार पर्यायी मार्ग सुचविले आहेत. त्यापैकी गारगोटी-पिंपळगाव-मडिलगे-आजरा-चितळे-इब्राहिमपूर-नागनवाडी-आसगाव-कोकरे-जांबरे-इसापूर ते गोवा या पर्यायाचा त्यांनी आग्रह धरला आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी या भागातील हजारो शेतकऱ्यांची जमीन संपादित होणार असून हजारो शेतकरी उध्वस्त होणार आहेत.
खरतरं शिवाजीराव पाटील यांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गाना घटप्रभा खोऱ्यातील चार नद्या पार करून जावे लागते. आधीच प्रचंड कोसळणारा पाऊस नद्यांची पात्रे उथळ झाल्याने दर दोनचार वर्षांनी इथल्या नागरिकांना पुराचा सामना करावा लागतो. त्यात नद्यांवर उभा केलेले पूल, त्यासाठी टाकलेले भराव यामुळे पाण्याचा फुगवटा वाढून दरवर्षी पुराचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागेल. शेतजमिनीत पुराचे पाणी घुसल्याने पिके पाण्याखाली जातील. नद्यांच्या प्रवाहामध्ये अडथळे निर्माण होऊन या विभागातील जनतेला सातत्याने पुराचा सामना करावा लागेल. चंदगड आणि आजार या दोन्ही तालुक्यांचा पश्चिम भाग हा सह्याद्रीच्या अतिसंवेदनशील पट्ट्यात येत असल्याने अनेक पर्यावरणीय प्रश्न नव्याने उभा राहणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करून हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
गडहिंग्लज विभागातील गडहिंग्लजसह आजरा, चंदगड तालुक्यातील कोणत्याही नागरिकाची शक्तीपीठ महामार्ग करावा अशी मागणी नाही. उलट आहेत ते रस्ते चांगले आणि मजबूत करावेत. या परिसरातील जल, जंगल, जमीन आणि सर्वच नैसर्गिक संसाधनावर इथल्या भूमिपुत्रांचा अधिकार आहे. पिढ्यानपिढ्या भूमिपुत्रांनी इथल्या मातीशी, जंगलाशी, नद्या – नाल्यांशी अत्यंत निखळ असा व्यवहार राहिला आहे. निसर्गाला ओरबडून, त्याला उध्वस्त करून जगण्याची इथे रीत नाही. उलट निसर्गात गरजेपुरता माफक हस्तक्षेप करत निसर्गपूरक जीवनशैली इथल्या भूमिपुत्रांनी विकसित केली आहे. त्यामुळे इथला निसर्ग, इथले पर्यावरण अजूनही टिकून आहे. शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांनी त्याला धक्का लागणार आहे म्हणूनच शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध आहे.
मुळातच शक्तीपीठ या महामार्गाची तशी गरजच नाही. ८६ हजार कोटी रुपये म्हणजे प्रत्येक किलोमीटरला साधारण १०५ कोटी रुपये इतका अवाढव्य खर्च करून सरकारला काय साध्य करायचे आहे. शक्तीपीठ महामार्गाला समांतर असलेला नागपूर रत्नगिरी हा महामार्ग पूर्णत्वाकडे आला आहे. तो कोल्हापूर जवळून रत्नागिरी येथे मुंबई गोवा महामार्गाला मिळतो. याबरोबरच कोल्हापूर येथून संकेश्वर बांदा या महामार्गातून खाली गोव्याला जोडणारा रस्ता असतांना शक्तीपीठ महामार्गाची गरजच नाही. अशी भूमिका घेऊन शक्तीपीठ विरोधात १२ जिल्ह्यातील हजारो शेतकरी लढताहेत. लाखो शेतकऱ्यांना उध्वस्त करून, महापुरास कारण ठरणारे नद्या, नाल्यांचे प्रवाह खंडित करून, पर्यावरणाची विशेषतः पश्चिम घाटाची प्रचंड हानी करणारा शक्तीपीठ महामार्ग हवाच कशाला असा आमचा प्रश्न आहे. म्हणूनच शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी सोमवार दि १८ ऑगस्ट २०२५ रोजी आम्ही सर्व शेतकरी मोर्चाने आपल्या कार्यालयावर येत आहोत, याची नोंद घ्यावी. असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक, श्रमुदचे कार्याध्यक्ष कॉ संपत देसाई, शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, शिवसेना तालुका प्रमुख युवराज पोवार, काँग्रेसचे संजय सावंत, रवींद्र भाटले, गिरणी कामगारचे शांताराम पाटील, कॉ. संजय तरडेकर, शिवाजी इंगळे, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे,युवराज जाधव, संजय देसाई, सुयश पाटील, प्रकाश शेटगे, गंगाराम डेळेकर, अमित गुरव आदींच्या सह्या आहेत
📢 अपडेट्स मिळवा – फक्त “लिंक मराठी” वर!
📲 आजच फॉलो करा आणि रहा अपडेटेड!
📺 यूट्यूब चॅनेल: 👉
https://youtube.com/@linkmarathi-news?si=esDLx1PYMWMRWxXk
📘 फेसबुक पेज:👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
💬 Follow the Link Marathi channel on WhatsApp: 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
🌐 वेबसाईट:
www.linkmarathi.com
🗣️ स्थानिक प्रश्न, जनतेचा आवाज आणि सत्य परिस्थिती – आता तुमच्या मोबाईलवर!
📌 “लिंक मराठी” – जे मराठी बोलतं, मराठी जगतं!

मुख्यसंपादक



