मुंबई / प्रतिनिधी :
पत्रकारांना धमकी दिल्याचा आरोप झालेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरून राज्यातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या असून या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेसह विविध पत्रकार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे.
राजकीय घडामोडींविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून पत्रकारांशी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आणि धमकीवजा वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत आणि राज्य महासचिव विकास भोसले यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याचे नमूद करत संबंधित प्रकरणात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, या वादानंतर राज्यातील वरिष्ठ राजकीय नेतृत्वालाही भूमिका स्पष्ट करावी लागली. उपमुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी खासदारांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करावा, असे मत मांडले होते. त्यानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी सार्वजनिकरीत्या दिलगिरी व्यक्त करत कोणत्याही पत्रकाराचा अपमान करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या प्रकरणानंतर पत्रकार संघटनांनी केवळ माफी पुरेशी नसून लोकशाहीतील चौथ्या स्तंभाच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी ठोस यंत्रणा उभी राहण्याची गरज व्यक्त केली आहे. पत्रकारांवरील दबाव, धमक्या आणि अपमानास्पद वर्तनाच्या घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणीही विविध स्तरातून होत आहे.
लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे जनतेचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचविणारे माध्यम मानले जातात. त्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी धमकी किंवा दबावाचे राजकारण वाढत असेल, तर तो विषय केवळ पत्रकारांचा न राहता लोकशाहीच्या आरोग्याशी संबंधित ठरतो, अशी भावना पत्रकार वर्तुळातून व्यक्त होत आहे


मुख्यसंपादक



