Homeमाझा अधिकारगैरवापर- आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा

गैरवापर- आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा

रविवारची मजा तर खऱ्या अर्थाने शनिवारीच वाटते. रविवारचा पूर्ण दिवस कामात आणि सोमवारच्या चिंतेतच जातो.
असो…
रविवारचा सुट्टीचा आनंद घेत सोमवारची पहाट उजाडली कधी ते कळलंच नाही. नेहमीप्रमाणे नाश्ता मुलांचे टिफिन आणि घरातले काम आवरून स्कुटीची चावी घेत लगबगीने बॅग खांद्याला टांगत दार ओढले. फटाफट जिना उतरले स्कुटीवर बसली आणि ऑफिसला जायला निघाले पण आज स्कुटीचीच इच्छा नव्हती असे वाटते तिने वेळेवर दगा दिला. चालूच नव्हती होत. खूप प्रयत्न केला पण काही केल्या सुरूच होईना. आजच्या दिवसाची सुरुवातच अशी होईल असं वाटलं नव्हतं. आज उशीर होणार बहुतेक असं मी पूटपूटले. चावी बॅगेत ठेवत झपाझप पाऊल टाकत बस स्टॉपवर आले. हल्ली बसने प्रवास करणे कमी झाले होते पण मला आवडते बसने प्रवास करायला. बसची वाट पाहत असताना ऑफिसमध्ये मला आज उशीर होईल हे कळवले आणि निवांत बसची वाट पाहत उभे राहिले. बसमध्ये जायचं म्हणजे निवांतच म्हणायचं नं स्टेशन आलं आपलं की उतरावं रोज रोज स्कुटी घेऊन जायचं तोही कंटाळाच येतो या सगळ्या विचारत असताना बस माझ्यासमोर कधी आली हे समजलेच नाही. बसमध्ये शिरले तर स्त्री करिता राखीव असलेल्या त्या सीटवर मी बसले. खिडकीपाशी सीट मिळाले म्हणून अजूनच आनंदात होते मी. मस्त वाऱ्याचा तो थंडगार स्पर्श जणू काही मनात सुखावत होता. वाहणारा तो वारा आणि खिडकीतून बाहेरचे ते दृश्य यात मी धुंद झाले हाेते.
तेवढ्यात दुसऱ्या स्टॉपवर दोन मुले दोन मुली चढले कंडक्टर काकांना म्हणाले, बस एवढ्या पुढे का थांबवायची हो ? तर त्यांना कंडक्टर काका सौम्य भाषेत म्हणाले, स्टॉपवरच थाबवणार न बस !
हे उत्तर ऐकून पूटपूटतच ते पुढे गेले. बस तशी गच्च भरलेली नव्हती पण बसण्यासाठी जागा नव्हती. नुकत्याच चढलेल्या त्या दोन मुलींनी समोर चाळिशीतले व्यक्ती बसले होते त्यांना सांगितले काका तुम्ही महिला राखीव सीटवर बसला आहात. तेवढ्यात ती व्यक्ती म्हणाली नाही बेटा ही महिला आरक्षित सीट नाही आहे, तसं मी कंडक्टरला विचारून बसलो आहे. तेवढ्यातच त्या मुलींसोबत चढलेला तो मुलगा त्या व्यक्तीला ओरडूनच म्हणाला, तुम्हाला कळत नाही का ?
ही महिलांची जागा आहेत तिकडे कसे बसले तुम्ही ? महिला उभ्या आहेत तरीही तुम्ही बसून कसे राहू शकता ? त्या व्यक्तीला सुद्धा खूप राग आला होता हे स्पष्ट दिसत होते पण, ते काही बोलणार तोच त्या दोन्ही मुलींनी पुढच्या सीटवरचे दोन ज्येष्ठ काकांना उठवले होते आणि महिला आरक्षित जागा म्हणून स्वतः बसल्या होत्या. मी हा प्रकार पाहात होते पण काही बोलावे असे वाटले नाही. कशी ही आजची तरुण पिढी !!
हा विचार करत नजर खिडकीच्या दिशेने फिरवली. ज्येष्ठ दोन्ही माणसांना उठून ते दोन मुली आणि मुलं जोराजोराने हसतायत काय ?
बोलतायत काय ?
गाणी गातात काय ?
कसली थेरं गं बाई !
तेवढय़ाच जोरात ब्रेक लागला आणि गाडी अचानक थांबली. गाडीत उभी असलेले ज्येष्ठ व्यक्तींना त्याचा भयंकर त्रास झाला ते त्या मुलीला कळवळतच म्हणाले, बेटा मला जरा वेळ बसू देते का ?
तेवढ्यात त्यांच्यावर वचपा घेत ती रागाने म्हणाली.
का ?
मी नाही उठणार !
आता मात्र मी हे सगळं पाहून नजर अंदाज करु शकत नव्हते; म्हणून मी उठले आणि त्या आजोबांना हात देत म्हणाले, या आजोबा इथे बसा. ते ही आभार व्यक्त करत माझ्या सीटवर बसले. तरीही ते दुसरे ज्येष्ठ व्यक्ती उभेच होते. मी कुठे जागा आहे का हे पाहण्यासाठी नजर इकडे तिकडे फिरली तेवढ्यात ती मुलगी म्हणाली आली मोठी समाजसेविका. असंच मला त्यांच्यी थेरं नकोशी झालेली, त्यात हे ऐकताच मी म्हणाले मी समाजसेविका नाही हो. पण एक चांगली नागरिक नक्कीच होण्याचा प्रयत्न करते. तरुण पिढी न तुम्ही तरुण म्हणवून घेता ना स्वत:ला. मग हे का तरुणपणाचं लक्षण. महिला आरक्षण सीट म्हणून या ज्येष्ठांना उठवताना लाज नाही का वाटली तुम्हाला?
असली थेरं करताना लाज काय घरी ठेवून येता काय ? माझ्या या वाक्यात त्या मुला मुलींचा अहंकार दुखावला गेला लगेच ते माझ्यासमोर उभी राहून म्हणाली महिलांसाठी आरक्षित सीट असताना पुरुषांनी बसायचंच का त्या सीटवर ? आमच्या जागी तू असती तर तू सुद्धा हेच केलं असतं !!
तेवढ्यात त्या मुलांनी पहिल्यांदा वाद घातलेला चाळिशीच्या वयातल्या त्या व्यक्तीने माझ्या शेजारी उभ्या असलेल्या ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा दिली. आता ते सुद्धा माझ्यासोबत होते. खरंच आजची तरुणपिढी ही अशी ही शोकांतिका आहे. हे ऐकताच इतक्या वेळ गप्प असलेले मुलं ती तावातावाने त्याच्या अंगावर आले आणि म्हणाले तू कोण आहेस आम्हाला हे सगळं बोलणारा ?
तेवढ्यात मी चिडका स्वरात त्यांना म्हणाले, तुमच्या घरात आई, बाबा, आजी, आजोबा आहेत का बाळांनो. त्यांच्यासोबत हे असं घडलं तर काय कराल.
तुमचे संस्कार ते तुमच्या वागण्यातून दिसतात बाहेर आपण कसे वागतो यावरून आपली ओळख होते. सार्वजनिक स्थानावर वाहनांमध्ये आपण कसे वागावे कसे वागायला हवे हेसुद्धा तुम्हाला माहित नाही.

तुमच्यासारख्या काही तरूणांमुळे सगळ्याच तरुण पिढीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला माणसांचा. मी त्या मुलीकडे पाहत म्हणाले. महिलांसाठी सीट राखीव म्हणून आपण मनाचा मोठेपणा दाखवत ज्येष्ठांना आजारी माणसांना तिथे बसवले तर काय गुन्हा दाखल होईल का महिलांवर ?
तुम्ही धडधाकट आहात सळसळत गरम रक्त अंगात वाहतं तुमच्या, त्या आजोबांना सीटवरून ऊठ बोलताना आपल्या बाबांचे विचार नाही का आला तुम्हाला ? त्यांच्या जागी ते असते तर हेच केलं असतं का तुम्ही ? सरकार कडुन आपल्याला जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकारांचा आदर करायला हवा, पण त्याचा गैरवापर कधीच करू नये. हे ऐकताच त्या मुली माझ्यावर धावतच आल्या. तिचे हात थांबवत मी म्हणाले आवरा स्वत:ला. तेवढ्यात परत तेच, तू ओळखत नाही आम्हाला, आम्ही कोण आहोत ते. कंडक्टर काकांना सुद्धा त्यांचा खूप राग आला होता पण ते पण काय करतील. बसमध्ये इतर प्रवासीसुद्धा आता त्यांना बोलू लागले तेवढ्यात त्यातला मुलगा उठला आणि म्हणाला आत्ताच्या आता बस थांबवा आणि यांना बसमधून उतरवा. बस काही थांबवलेलं नाहीये या मूर्ख मुलाचा नादी लागून बस थांबणारही कशी होती असे हावभाव आणत मी गालातल्या गालात हसले त्यावर तो म्हणाला तू स्वत: ला कोण समजते ?
आता मात्र माझी ओळख दाखवणे गरजेचे झाले होते. बॅगेतून पत्रकारितेचे ओळखपत्र दाखवून मी म्हणाले न्यूज रिपोर्टर ममता पाटील. आता मात्र त्यांची बोलती बंद झाली होती. त्या खाडकन जागच्या जागी उभे राहात म्हणाले काय ?
कंडक्टर काका बस थांबवा जरा. यांना बसमधून उतरून द्या. त्यातली एक मुलगी म्हणाली नाही उतरणार मी बसमधून. असं आम्ही काय केलं आहे तर आम्ही बसमधून उतरायला हवं ?
एवढं करून कसं म्हणू शकता तुम्ही काहीच नाही केलं !! माझ्या तोंडून रागात हे उद्गार निघाले. आत्ताच्या आत्ता बसमधून उतरला नाही तर तुमच्या फोटोसहित ही माहिती न्यूजवर प्रदर्शित करून तुम्हाला स्टार बनवते. लाज वाटली पाहिजे सरकार आपल्या सोयीसाठी आपल्याला राखीव जागा देतात आणि तुम्ही काहीजण असं वागता आत्ताच्या आत्ता बसमधून उतरा नाही तर . . . . . . माझा राग पाहून ते चौघे उठले तेवढ्यात मी त्यांना म्हणाले निघा आणि त्या आजोबांची माफी मागा पहिले मग जा. माझ्या बोलण्याने एक प्रकारची शांतता पसरली होती पूर्ण बसमध्ये. माफी मागून ते बसमधून बाहेर पडले त्या आजोबांनी माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत सुखी राहा असे आशीर्वाद दिले.
बस पुढे चालू लागली.

महिलांच्या बाबतीत खूप कायदे आहेत. खूप अधिकार महिला आहोत म्हणून सरकार आपल्याला देत असतात. पण कधी कधी काही जण याच अधिकारांचे इतका गैरवापर करतो की, खरंच हे अधिकार चांगले की वाईट हेच कळत नाही.
अहो जिथे गरज आहे तिथे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा वापर करावाच पण जिथे नाही तिकडे निस्वार्थी विचार नको करायला का आपण.
आता त्या आजोबांना सीट देऊन मी काही मोठेपणा नाही केला. पण त्यांना जागा दिली नसती तर त्यांना मात्र मला होणाऱ्या त्रासा पेक्षा जास्त त्रास नक्कीच झाला असता. काय ना खरंच कमाल वाटते ही आजची तरुण पिढी अशी असली तर काय भविष्य असणार. खरंच आता भीती वाटायला लागली आहे.
या प्रसंगावरून माझ्या मुलांवर काय संस्कार करायचे ते मी ठरवले या विचारात माझे स्टॉप आले आणि आजोबांकडे नजर फिरवली आणि गालातल्या गालात हसत बसचा निरोप घेतला.

लेखिका- नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular