Homeवैशिष्ट्येघटस्थापना आणि नवरात्र उत्सव

घटस्थापना आणि नवरात्र उत्सव

हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते.

  1. वासंतिक नवरात्र – वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत व
  2. शारदीय नवरात्र – शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्रात `घटस्थापना’ हा मुख्य विधी असतो.

घटस्थापना –
नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या प्रतिमेची व कुलदेवाच्या टाकांची प्रतिष्ठापना करून घटाभोवती पसरलेल्या निवडक मातीच्या (वारुळाची माती) गादीवाफ्यात गहू, ज्वारी, मका अशी सप्त धान्य पेरली जातात. ही पहिली रात्र असते. या दिवशी घटाजवळ एकदा शिलगावलेला नंदादीप पुढे नऊ दिवस-रात्र तेवता राहणार असतो. (प्राचीन अखंड अग्निहोत्र व्रताचच हे बाळप्रतीक होय.) हा घटस्थापनेचा दिवस.

नवरात्र –
नवरात्र म्हणजे नऊ दिवस, नऊ माळा, जागरण, गोंधळ, देवी उपासना, गरबा नृत्य असते. परंतु, तिथीचा क्षय किंवा वृद्धीमुळे कधी आठ किंवा दहा दिवस नवरात्र असते. नऊ दिवस किंवा नऊ रात्रीचा कुलाचार असा, या शब्दाचा अर्थ नाही, तर अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करण्याचे कर्म म्हणजे ‘नवरात्र’ होय.

इतिहास –

  1. नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्या नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे.ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.
  2. देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी –
    पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होत. तो सर्वांनाच फार त्रास देत होता. तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली. त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नांव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.
  3. तर कोण्या एकेकाळी देवांच्या नाशासाठी ‘दुर्गम’ नावाच्या असुरान घनघोर तपश्चर्या मांडून ब्रम्हदेवाला प्रसन्न करून घेतल. वर म्हणून त्यान, देवांच्या नाडया आखडणारे प्रत्यक्ष चारी वेदच मागून घेतले. परिणामी सर्व यज्ञ बंद पडले. सर्वत्र अनावृष्टीच भय पसरल. जागोजागीच्या आश्रमातील ब्रम्हवृंदांनी व्याकुळतेन आदिमायेची करूणा भाकली. ती शतनेत्रयुक्त रूप धारण करून प्रकटली. तिन उन्मत दुर्गम असुराला वधल. दुर्गमला वधल म्हणून ही दुर्गा.

देवीची साडेतीन शक्तीपीठे –
आपल्या महाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत.

देवीची रूपे –
सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले. दैवीशक्ती हि दुर्गा, भवानी, रेणुका, काली, अंबा, महालक्ष्मी , सरस्वती, संतोषी, महिषासुरमर्दिनी, चामुंडा, चंडिका, कालिका, एकविरा, वज्रेश्वरी, हरबसणी, जीवदानी इ. विविध नावांनी उपासली जाते.

देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात.
सौम्य रूपे – उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य रूपांची नावे असून
उग्र रूपे – दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र रूपे आहेत.

देवी दुर्गाचे 108 नावं –

सती, साध्वी, भवप्रीता, भवानी, भवमोचनी, आर्या, दुर्गा, जया, आद्या, त्रिनेत्रा, शूलधारिणी, पिनाकधारिणी, चित्रा, चंद्रघंटा, महातपा, मन, बुद्धि, अहंकारा, चित्तरूपा, चिता, चिति, सर्वमंत्रमयी,
सत्ता, सत्यानंदस्वरुपिणी, अनंता, भाविनी, भव्या, अभव्या, सदागति, शाम्भवी, देवमाता, चिंता, रत्नप्रिया, सर्वविद्या, दक्षकन्या, दक्षयज्ञविनाशिनी, अपर्णा, अनेकवर्णा, पाटला, पाटलावती, पट्टाम्बरपरिधाना, कलमंजरीरंजिनी, अमेयविक्रमा, क्रूरा, सुंदरी, सुरसुंदरी, वनदुर्गा, मातंगी, मतंगमुनिपूजिता, ब्राह्मी, माहेश्वरी, ऐंद्री, कौमारी, वैष्णवी, चामुंडा, वाराही, लक्ष्मी, पुरुषाकृति, विमला, उत्कर्षिनी, ज्ञाना, क्रिया, नित्या, बुद्धिदा, बहुला, बहुलप्रिया, सर्ववाहनवाहना, निशुंभशुंभहननी, महिषासुरमर्दिनी, मधुकैटभहंत्री, चंडमुंडविनाशिनी, सर्वसुरविनाशा, सर्वदानवघातिनी, सर्वशास्त्रमयी, सत्या, सर्वास्त्रधारिणी, अनेकशस्त्रहस्ता, अनेकास्त्रधारिणी, कुमारी, एककन्या,कैशोरी, युवती, यति, अप्रौढ़ा, प्रौढ़ा, वृद्धमाता, बलप्रदा, महोदरी, मुक्तकेशी, घोररूपा, महाबला, अग्निज्वाला, रौद्रमुखी, कालरात्रि, तपस्विनी, नारायणी, भद्रकाली, विष्णुमाया, जलोदरी, शिवदुती, कराली, अनंता, परमेश्वरी, कात्यायनी, सावित्री, प्रत्यक्षा,
ब्रह्मावादिनी.

नवरात्रातील नऊ माळा –
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.

  1. पहिली माळ – शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ
  2. दुसरी माळ – अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ.
  3. तिसरी माळ – निळी फुले. गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळ
  4. चौथी माळ – केशरी अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
  5. पाचवी माळ – बेल किंवा कुंकवाची वाहतात..
  6. सहावी माळ – कर्दळीच्या फुलांची माळ.
  7. सातवी माळ – झेंडू किंवा नारिंगीची फुले.
  8. आठवी माळ – तांबडी फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ.
  9. नववी माळ -कुंकुमार्चन करतात.

नवरात्रातील नऊ रंग –
नवरात्र उत्सवातील साड्यांचे रंग ही एक नवी सामाजिक संकल्पना नवरात्र उत्सवाशी अलीकडील काही वर्षात (केव्हापासून?) जोडली गेल्याचे दिसून येते. नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची साडी नेसवली जाते. महाराष्ट्रातील अनेक शहरांतील स्त्रियाही अशाच प्रकारे नवरात्रातल्या दिवसांत त्या ठरावीक रंगाच्या साड्या नेसतात.

रंगांची संकल्पना –
या संकल्पनेची सुरुवात २००४ सालापासून झाली. –
२००४ साली मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरात देवीला नऊ दिवस नेसवल्या जाणाऱ्या साड्यांचे रंग ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाले. मुंबईतील महिलांनी नऊ दिवस त्या त्या रंगांच्या साड्या नेसून त्याला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर हे दरवर्षी घडत गेले. उत्सव आणि सणाचे बदलते सामाजिक आयाम या संकल्पनेतून दिसून येतात.

रंगांची कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही अस्तित्वात होती. (१८१८ सालचे पंचांग पहावे).
रविवार – उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी,
सोमवार – चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा,
मंगळवार – मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल.
बुधवार – बुधवारचा निळा,
गुरुवार – गुरुवारचा पिवळा,
शुक्रवार – शुक्रवारचा हिरवा आणि
शनिवार – शनिवारचा रंग करडा असतो.
आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे दोन दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी, हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत.

देवीचा गोंधळ –
शारदीय नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा गोंधळ घालण्याची पद्धती विविध समाजगतात प्रचलित आहे. देवीचे उपासक ज्यांना गोंधळी असे म्हटले जाते ते गोंधळी संबळ या वाड्याच्या साथीने देवीची स्तुती असणारी कवने देवीसमोर सादर करतात. या क्लाप्रकाराला गोंधळ घालणे असे म्हटले जाते. भगवान परशुराम यांनी बेटासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्याचे शीर धडापासून वेगळे केले. त्याच्या शिराच्या तंतूंना ओवून त्यापासून एक वाद्य तयार केले आणि आपली माता रेणुका हिच्यासमोर हे वाद्य वाजवून त्यांनी आपल्या आईला वंदन केले. त्यावेळेपासून गोंधळ परंपरा सुरु झाली असे मानले जाते.

देवीचा जोगवा –
जोगवा मागणे हा एक प्रकारचा देवीची उपासना करण्याचा प्रकार आहे. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो. परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. हे उपासक गळ्यात कवड्यांची माळ घालतात. अहंकाराचे विसर्जन करावे असा यामागचा हेतू असावा असे वाटते.

हादगा –
मुलींना आवडणारा हादगा हा सुद्ध ह्याच दिवसांत करतात. मुली पाटावर हत्ती काढून त्याचे भोवती फेर धरतात. हादग्याची गाणी म्हणतात. नवनव्या खिरापती केल्या जातात.

गरबा –
नवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच विविध मनोरंजनाचे स्पर्धा महिलांसाठी भरविल्या जातात. मुलां-मुलींसाठी अनेक स्पर्धात्मक कार्यक्रम राबविले जातात. शेवटच्या दिवशी देवीची फार मोठी मिरवणूक काढली जाते. शक्ती उपासनेचा हा नवरात्रीला उत्सव फार महत्त्वाचा आहे.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

आपल्याला अजूनही काही माहिती असेल तर आम्हालास कॉमेंट बॉक्समध्ये सांगावे आम्ही योग्य शहानिशा करून ती update करू .

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular