Homeमुक्त- व्यासपीठसौभाग्यालंकार जोडवी का घालावीत ?

सौभाग्यालंकार जोडवी का घालावीत ?

सौभाग्यालंकारांतील एक महत्त्वाचा अलंकार म्हणजे पदांगुलीतील ‘जोडवी’ किंवा ‘बिछवा’ (टो रिंग). ती म्हणजे पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालावयाची चांदीची किंवा इतर धातूंची वळी असतात.

प्राचीन काळापासून सुवासिनी स्त्रिया याचा वापर करत असाव्यात. वाल्मीकिरामायणामध्येही ‘वलय’ या अर्थी जोडव्यांचा उल्लेख आढळतो. जुट्-जुड् या धातूपासून जोडवी हा शब्द बनला असून त्याचा अर्थ बंधन असा आहे. हा अलंकार विवाहोत्तर घालावयाचा असल्याने सौभाग्याचे किंवा पातिव्रत्याचे बंधन असाही त्याचा एक अर्थ मानला जातो. जोडवी संपूर्ण भारतातील स्त्रियांच्या नित्य वापरात आहेत. तथापि प्रदेशपरत्वे त्यांना नावे मात्र वेगवेगळी आढळतात. उदा., महाराष्ट्रामध्ये जोडवी तेलुगूमध्ये मीत्तिलु तमिळमध्ये मीत्ती कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहारमध्ये बिछवा किंवा बीछीया इत्यादी.

सुवासिनी स्त्रियांचा हा पदांगुलीतील अत्यंत महत्त्वाचा सौभाग्यालंकार मानला जातो. जोडव्यांबरोबरच विरोल्या (विरोद्या) नावाचा आणखी एक चांदीचा अलंकार पायाच्या बोटात घालण्याची प्रथा आहे. मात्र हे जोडव्यासारखे पूर्णवर्तुळाकृती वळे नसते, तर अर्धवर्तुळाकृती वळ्याला निम्मे उभे बोट झाकले जाईल असा लंबवर्तुळाकृती पत्रा असतो. यास विरवदी-विरवधी, विरवली असेही म्हटले जाते. माशाच्या आकाराचा, पायाच्या करंगळी शेजारील बोटात घालावयाचा सुवासिनी स्त्रियांचा आणखी एक सौभाग्यालंकार म्हणजे मासोळी.

कोणत्याही प्रौढ पुरुषाकडे पहिले की तो विवाहित असेल किंवा नाही, हे खात्रीपूर्वक सांगता येणे तसे कठीण असते. पण गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि पायांच्या बोटांमध्ये जोडवी पाहिली, की ते धारण करणारी महिला विवाहित असते, हे ज्ञान सर्वमान्य आहे. पण हे धारण केले जाणारे अलंकार केवळ सौभाग्याची लक्षणे नसून ते धारण करण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत. ती कारणे लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी किती विचार करून काही पद्धती सुरु केल्या हे आपल्या लक्षात येईल. पायांच्या बोटांमध्ये जोडवी घालण्यामागे देखील वैज्ञानिक कारणे आहेत.

आजकाल पायांच्या कुठल्याही बोटांमध्ये जोडवी घालण्याची फॅशन आहे. तर्‍हेतर्‍हेची जोडवी आजकाल बाजारामध्ये उपलब्ध असतात. पण परंपरेनुसार पायांच्या अंगठ्यांच्या शेजारील, म्हणजेच दुसर्‍या बोटामध्ये जोडवी घातली जायला हवीत.

१) पायांच्या अंगठ्याशेजारील बोटामध्ये जी नस असते, तिचा संबंध महिलेच्या गर्भाशयाशी आहे. ही नस महिलेच्या गर्भाशयाला नियंत्रित करते आणि रक्तदाबही संतुलित ठेवते. ह्या नसेवर, पायांमध्ये जोडवी घातल्याने दबाव पडतो व त्यामुळे या नसेशी निगडित अवयवांचे कार्य सुरळीत चालते.
२) पायांमध्ये ज्या बोटांध्ये जोडवी घातली जातात त्या बोटामध्ये असलेल्या नसेचा थेट संबंध गर्भाशयाशी असतो. त्यामुळे पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने महिलांच्या शरीरातील प्रजनन क्षमता चांगली राहते.
३) जोडव्यामुंळे सायटिक नर्व्हवर दबाव येऊन त्याच्या आसपासच्या नसांमधील रक्ताभिसरण सुधारून गर्भाशय, मूत्रपिंड आणि आतड्यांमधील रक्तस्राव सुरळीत राहतो.
४) पायांच्या बोटांमध्ये जोडवी घातल्याने प्रजनेन्द्रियांचे कार्य सुरळीत चालत राहून मासिक धर्म नियमित होतो.
५) हृदयाची गती नियंत्रित करण्यासाठी जोडवी उपयुक्त असल्याचे म्हटले गेले आहे.
६) दोन्ही पायात जोडवी घातल्याने हार्मोनल सिस्टम योग्य रित्या कार्य करतं.
७) जोडवी घातल्याने थायरॉईडचा धोका कमी असतो.
८) जोडवी ऍक्युप्रेशर उपचार पद्धतीवर कार्य करतात ज्याने शरीराचे खालील अंगाचे मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात.

चांदी ऊर्जावाहक आहे. त्यामुळे जमिनितली ऊर्जा पायांमधील चांदीच्या जोडव्यांमार्फत शरीरामध्ये येते. त्या ऊर्जेने शरीरामध्ये सतत उत्साह व स्फूर्तीता अनुभव होतो.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular