आजरा (हसन तकीलदार ):-आजरा शहरात व उपनगरात मागील वर्षापासून कोट्यावधीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे. परंतु नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांच्यात समन्वयाचा आभाव दिसत असल्यामुळे या कामात गती व सुसूत्रता दिसून येत नाही. नळ कनेक्शनधारकांची संख्या व घातलेल्या पाईपची साईज यात सुद्धा मेळ व नियोजन नसलेने पाण्याचा दाबही कमी आहे त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. ठराविक ठिकाणी अजूनही नवीन पाईप लाईन अर्धवट असल्याने जुन्या कनेक्शनवरच पाणी पुरवठा सुरु आहे. आणि ज्या ठिकाणी नवीन पाईप लाईनचे काम पूर्ण झाले आहे त्याठिकाणी पाण्याची गळती तपासण्याआधीच तसेच इतर चाचण्या घेण्याअगोदरच पाईप मुजवल्या आहेत. पुन्हा त्याठिकाणी गळती दिसून येत आहे आणि हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यामध्ये नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. अशाच मुद्यांच्या आधारे आजरा अन्याय निवारण समितीने सुरळीत पाणी पुरवठा होणेबाबत तसेच सौर ऊर्जेची यंत्रणा कार्यन्वयित करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच याची पूर्तता वेळेत न झालेस 16जूनला उपोषण करणार असलेबाबत आजरा अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे यांनी सांगितले.

निवेदनात म्हटले आहे की, आजऱ्यातील सोमवार पेठ येथे योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही, गोठण गल्ली येथे मागील तीन महिने पुरेसे पाणी मिळत नसल्याने स्वखर्चाने टँकर मागवून तेथील नागरिक पाणी घेत आहेत. याबाबत वारंवार लेखी तक्रार देऊन व मोर्चा काढण्याबाबत सूचित करण्यात आले होते. परंतु योग्य दाबाने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देऊन मोर्चा रद्द करण्याचे षडयंत्र केले गेले. आजसुद्धा याबाबत योग्य कार्यवाही झालेली नाही. तसेच ज्या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम झाले आहे तेथील रस्ते खराब झालेले आहेत त्याठिकाणी रस्त्याची कामे सुरु करीत आहेत परंतु ज्या ठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेची पाईप टाकून कनेक्शन देऊन योग्य दाबाने पाणी पुरवठा होत आहे की नाही याची खात्री करूनच रस्त्याची कामे सुरु करावीत जेणेकरून नवीन केलेला रस्ता उकरण्याची पाळी येणार नाही आणि शासनाचा पर्यायाने जनतेचा पैसा वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी.नगरपंचायतीचा विद्युत खर्च कमी व्हावा यादृष्टीने शासनाकडून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी निधी देण्यात आला आहे परंतु ही सोलर यंत्रणा अद्याप कार्यन्वयित करण्यात आलेली नाही याचा खुलासा जनतेसमोर करावा.तेव्हा ही नवीन पाणी पुरवठा योजना केव्हा कार्यन्वयित होणार व ठेकेदारावर केलेल्या कारवाईची माहिती जनतेसमोर द्यावी असे या निवेदनात नमूद केले आहे. जर याची पूर्तता वेळेत झाली नाही तर 16जूनला उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले.निवेदनावर अध्यक्ष परशुराम बामणे, उपाध्यक्ष गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण, जावेद पठाण, संतोष बांदिवडेकर, सुमेध वालावलकर, संजय जोशी, मिनिन डिसोझा, महादेव जाधव, मदन तानवडे, गणेश डोणकर, सुमन हरमळकर, लक्ष्मी नाईक, अब्दुलमजीद नेसरीकर, आलिया नेसरीकर आदींच्या सह्या आहेत.
लिंक मराठी व्हॉट्सॲप चॅनल 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h
फेसबुक पेज लिंक 👇
https://www.facebook.com/profile.php?id=100063705265578&mibextid=ZbWKwL
लिंक मराठी वेबसाईट 👇
www.linkmarathi.com
वरील निळ्या रंगाच्या पट्टीवर क्लिक करून लिंक मराठी Live चे अपडेट पाहू शकता .
*Follow Us*

मुख्यसंपादक